विलेपार्ल्यात 'उत्तुंग महाखादी प्रदर्शन'! खादी वस्त्रांसह सेंद्रिय उत्पादने उपलब्ध होणार
14-Feb-2025
Total Views | 85
मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने विलेपार्ले येथे 'उत्तुंग महाखादी प्रदर्शन' आयोजित करण्यात येणार असून मुंबईकरांना खादी वस्त्रांसह विविध सेंद्रिय उत्पादनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीस्कर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.
मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामीण कारागीर तसेच उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विलेपार्ले येथे 'उत्तुंग महाखादी प्रदर्शन' आयोजित करण्यात येणार आहे. महालक्ष्मी नारायण हॉल लॉन्स, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे दि. १८ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होणार आहे. सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत मुंबईकर या प्रदर्शनाला भेट देऊ शकतात.
या प्रदर्शनात खादी वस्त्र, खादी साड्या, शुद्ध सेंद्रिय 'मधुबन' मध, हळद, मसाले, कोल्हापूरी चप्पल, गूळ यासह इतर ग्रामोद्योग उत्पादनांचे ५० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. खादीच्या स्वदेशी वस्त्रांसोबतच सेंद्रिय उत्पादने आणि ग्रामीण भागातील कारागिरांनी साकारलेली दर्जेदार उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होतील. दरम्यान, या प्रदर्शनाला जास्तीत जास्त मुंबईकरांनी भेट देण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.