पॅरिस : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एआय अॅक्शन समिटला हजेरी लावली. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. या समिटनंतर काल दि. १२ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सेला येथील माझारग्युस वॉर सेमेटरी (mazargues war cemetery) येथे भेट दिली.
यावेळी त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि पुष्पचक्र अर्पण केले. तसेच फ्रान्स दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे मार्सिली येथे नव्याने उघडलेल्या भारतीय महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना उजाळा
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहसाचं स्मरण पंतप्रधानांनी केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ८ जुलै १९१० रोजी मार्सेली बंदरात बोटीतून समुद्रात उडी मारून ब्रिटीशांच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सावरकरांना ब्रिटीशांच्या तावडीत पुन्हा देऊ नये, अशी मागणी मार्सेलीच्या नागरिकांनी आणि फ्रेंच कार्यकर्त्यांनी केली होती. या सर्वांबद्दल पंतप्रधान मोदींनी आपल्या एका पोस्टमध्ये कृतज्ञताही व्यक्त केली आहे.