एकदा सृजनाची क्षमता संपली की, लैंगिकतेचे वावडे राहत नाही. सांस्कृतिक तुटलेपण आणि स्वैराचारातले पुरोगामित्त्व हे या अभद्र अभिव्यक्तीमागचे गुंतागुंतीचे मानसशास्त्र आहे.
रणवीर अलाहाबादिया हा एकेकाळचा गुणी पॉडकास्टर व ज्या भांगेच्या जुडीत ही तुळस परवा सापडली तो सगळा कंपू... ही सगळीच मंडळी त्यांच्या घाणेरड्या विधानांमुळे चर्चेत आली आहेत. खरं तर सृजनाच्या विश्वात यात धक्कादायक असे काहीच नाही. कारण, एकदा अभिव्यक्तीच्या क्षेत्रात मान्यता मिळाली की, ही माणसे वाटेल तसे बरळू लागतात. काहीही बरळण्याचा अधिकार म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असा त्याचा त्यांनी सोयीचा अर्थ लावलेला असतो. नटांचे तत्त्वज्ञ होतात. अपयशी नटांचे पर्यावरणवादी कार्यकर्ते होतात. या गणंगपणाला काही मर्यादाच नाही. माध्यमात एकदा जागा मिळाली की, आपला वकुब नसतानाही इतिहास, मानवी संबंध, श्रद्धा, परंपरा, समाज, जाती, अणुविज्ञान, ऑईल रिफायनरी, जैवविविधता, पर्यावरण या आणि अशा कितीतरी विषयांवर ही माणसे भाष्य करताना दिसतात. ही माणसे आपल्यासारखीच हाडामासाची माणसे आहेत. देवाने त्यांना बरे रुप, सादरीकरणाचे कौशल्य भरभरून दिले, तेवढाच काय तो फरक! ‘म्हैस’ या पुलंच्या गाजलेल्या प्रयोगात मधु मालुष्टे या पदवीधर तरुणाची टोपी उडवताना ग्रामस्थ म्हणतो, “पोस्ट वायले आणि आऊटपोस्ट वायले, तुमच्यासारख्या झंटलमन माणसाला पण हे कळत नाय.” खरी गोची इथेच आहे. दर मोसमात जुन्या बायकोला सोडणारा नट आपल्याला त्याच्या एका शोमुळे तत्त्वज्ञ वाटायला लागतो. माळरान ही परिसंस्था आहे, हे वैज्ञानिक सत्य मान्य न करता, झाडे लावत सुटलेले नट हे ‘पर्यावरणरक्षक’ म्हणून प्रख्यात होतात. मूळ मुद्दा येतो, साठाव्या वर्षी निवृत्त होणारा सर्वसामान्य माणूस निवृत्तीपर्यंत आपल्या जबाबदार्या न सोडता आपले क्षेत्र बदलत नाही व ही माणसे सिनेमांत, माध्यमांत भूमिका बदलाव्यात तशी इथे का बदलतात?
याचे सरळ उत्तर म्हणजे, या मंडळींची सृजनाची किंवा निर्मितीची क्षमता संपलेली असते. एकदा निर्मितीची क्षमता संपली की, ही माणसे लैंगिकता, हिंसाचार, गुन्हेगारी, लुटमार याकडे जायला लागतात. माध्यमे बदलत असली, तरी अभिव्यक्तीच्या क्षेत्रात काम करणार्या लोकांसमोरचा हा तसा जुनाच पेच. मागणी तसा पुरवठा, हा बाजाराचा नियम सृजनाला लागू होत नाही. मात्र, तसे केले नाही, तर आपण संदर्भहीन होऊन जाऊ, अशी भीती या लोकांना वाटत राहते. सृजन संपले की, श्रोता दुरावतो. श्रोता दुरावला की, व्यासपीठही मिळत नाही. मग मिळेल त्या व्यासपीठावर जाऊन वाटेल ते बरळत फिरण्याशिवाय या लोकांना पर्याय राहत नाहीत.
मजकुरातली लैंगिकता हा तर जुनाच प्रकार. ‘अभय’ या सिनेमात किंवा ‘पीके’ साकारताना नागवा उभा राहिलेला कमल हसन किंवा आमिर खान ही त्याचीच उदाहरणे. मराठी, हिंदी सिनेमा तर पुरेपूर गंडला आहे. कारण, नवसंकल्पनांसाठी लागणारी त्यांची सृजनाची क्षमताही संपली आहे. मराठीतले हे दारिद्य्र तर फारच भीषण आहे. मराठी सिनेमांत, नाटकांत गंडलेले दोन- तीन नट अशाप्रकारच्या छोट्या वेबमालिका आजही करत आहेत. रणवीर अलाहाबादिया किंवा समय रैना यांच्या इतका त्यांना श्रोतावर्ग नसल्याने ही मंडळी कधीही चर्चेत येत नाहीत. मराठीतले हे दारिद्य्र भीषण होण्यासाठी मराठी साहित्याच्या जडणघडणीतली किंवा प्रवासातली डावी-समाजवादी विचारसरणी खूप कारणीभूत आहे. देवादिकांची चेष्टा करणारे पु.ल. देशपांडे, ‘देवाला रिटायर करा’ सांगणारे डॉ. श्रीराम लागू, अंधश्रद्धा निर्मुलनाच्या नावाखाली श्रद्धेला धक्का लावत गेलेले असंख्य मराठी नट, साहित्यकार, कवी, लेखक यांनी हे काम अव्याहतपणे केले आहे. यातून एक भीषण सांस्कृतिक तुटलेपण मराठीत निर्माण झाले. ‘कांतारा’, ‘बाहुबली १’, ‘बाहुबली २’, ‘आरआरआर’, ‘पुष्पा १’, ‘पुष्पा २’ हे सारे सर्वच निकषांवर (अर्थकारणासह) यशस्वी झालेले सिनेमे व त्यांच्या मुळाशी आपण गेलो तर त्यांची मातृभाषा, उपासना पद्धती, जनसामान्यांच्या श्रद्धा याबाबत पटकथा लिहीत असण्यापासून ते पात्र साकारण्यापर्यंत सजगता किंवा साहचार्याची भावना दिसते. गळ्यात लिंबाची माळ घालून कालीमातेचे रुप धारण करून अवतरणारा अल्लु अर्जुन मराठीत होऊच शकत नाही. कारण, अशी पटकथा लिहिण्यापूर्वी अंधश्रद्धावाले आपल्याला काय म्हणतील, हा प्रश्नच पटकथाकाराला किंवा नटाला अस्वस्थ करत राहील. तेलुगूला हे नवे नाही. लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेले व नटाचे राजकारणी होऊन मुख्यमंत्री झालेल्या एनटीआरनी ही वाट तेलुगू सिनेमात निर्माण केली. आपल्या निळ्याशार मेकअपमध्ये दोन देखणे नंदी हंबरताना कृष्ण बनून जोरदार एन्ट्री घेणारे एनटीआर तेलुगू भाषिकांनी डोक्यावर घेतले. त्यांचा सालंकृत महाविष्णु, गोविंदा बालाजी आजही तामिळ भाषिकांच्या मनःपटलावर कोरलेला आहे. असे प्रयोग एमजीआरनी तामिळ सिनेमातही केले. दक्षिणेतील सिनेमाचा पाया हा अशा सांस्कृतिक मूल्यांमध्ये दडलेला आहे.
सिनेमाच्या ओपनिंग सिनलाच मॉडर्न कपड्यात मद्यपान करणारी पात्रे, चित्रविचित्र मानवी संबंध हे सध्याचे मराठी सिनेमाचे विषय आहेत. अर्थात, याला प्रेक्षक मिळत नाहीत. कारण, असे सिनेमात चालेलही; पण आपल्या घरात चालणे कुणालाही आवडणार नाही. ‘कांतारा’ यशस्वी होतो, सर्व भारतीय भाषांत भाषांतरित होतो. मात्र, मराठीत देवचार किंवा वेताळ, वेतोबा या लोकदेवतेवर सिनेमा काढण्यासाठी कुणी मायचा लाल पुढे येत नाही. हे दारिद्य्र असे आहे. मग मराठी प्रेक्षक अन्य सिनेमा बघतो. पण, आपले बघत नाही, अशी रडारड आहेच. मराठी माणसाने पदरचे पैसे खर्च करून त्याच्या श्रद्धा, रितीभाती, नातेसंबंध याला धक्का लावणारे अभिव्यक्तीचे आचरट प्रकार का पाहावे? खरंतर मराठीत लोकदेवता, जातककथा, पुराणकथा यांमध्ये भरपूर ‘फॅण्टसी’ आहे. मात्र, त्यात आपल्या मंडळींना आशय दिसत नाही. कारण, सृजनापेक्षा पुरोगामित्त्वाचे सर्टिफिकेट जास्त महत्त्वाचे आहे. मग सिनेमा चालला नाही तरी चालेल. त्यातून तेलुगू, तामिळ सिनेसृष्टी जशी हजारो लोकांना रोजगाराच्या संधी देते, त्या मिळाल्या नाही तरी चालतील, असा हा सगळा अट्टाहास. त्याहून मोठी भीती आपल्याला पवार साहेबांच्या चव्हाण सेंटरमध्ये किंवा नेहरू सेंटरमध्ये व्यासपीठ मिळणार नाही, याची आहे. जोवर सृजनाचा खरा अर्थ लावून, भारतीय जनमानस समजून आशयनिर्मिती केली जाणार नाही, तोवर सांस्कृतिकच काय, पण कोणत्याही प्रकारची समृद्धी नांदू शकत नाही!