अमेरिकेतील ‘स्ट्रॉ’वॉर

    12-Feb-2025   
Total Views |

STRAW WAR
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच, एकामागोमाग एक निर्णयांचा धडाकाच लावला आहे. अमेरिकन जनता आणि राजकारण्यांना ट्रम्प यांचे निर्णय पटो अथवा न पटो, आता त्यांच्या पालनाशिवाय गत्यंतर नाहीच. असाच एक निर्णय म्हणजे, पेपर स्ट्रॉऐवजी पुन्हा प्लास्टिक स्ट्रॉच्या सरसकट वापराची अंमलबजावणी. या निर्णयामुळे ट्रम्प हे पर्यावरणविरोधी असल्याची त्यांच्यावर सडकून टीकादेखील सुरू झाली. पण, टीकेला भीक घालतील ते ट्रम्प कसले? त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत, पेपर स्ट्रॉची घडीच मोडली आणि ‘पुन्हा प्लास्टिक’कडे असाच संदेश दिला. पण, त्यामुळे अमेरिकेसह जगभरात पेपर स्ट्रॉ की प्लास्टिक स्ट्रॉ की आणखीन काही, अशी चर्चा सध्या रंगलेली दिसते.
 
कोल्ड कॉफी, ज्यूस असो अथवा नारळपाणी, घोट घोट स्वाद घेत ही पेयं पिण्यासाठी स्ट्रॉचा वापर हा ओघाने आलाच. त्यात पाश्चिमात्य देशांमध्ये तर स्ट्रॉचा वापरही भारतापेक्षा कैकपटीने अधिक. शीतपेयांच्या अक्षरश: आहारी गेलेली अमेरिकाही त्याला अपवाद नाहीच. म्हणूनच एकट्या अमेरिकेत प्रतिदिवशी ५०० टन प्लास्टिक स्ट्रॉचा कचरा जमा होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावरून अमेरिकेतील एकल वापर (सिंगल युझ) प्लास्टिकच्या प्रदूषणाच्या समस्येचा अंदाज यावा. म्हणूनच २०२४ साली तत्कालीन बायडन प्रशासनाने सरकारी कार्यक्रमांतून प्लास्टिकचे स्ट्रॉ हद्दपार केले, तसेच २०३५ सालापर्यंत सरकारी वापरातून पूर्णपणे प्लास्टिकला बेदखल करण्याचे आदेश बायडन यांनी दिले. परंतु, ट्रम्प सत्तेवर येताच, त्यांनी बायडन यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, पेपर स्ट्रॉचीच भलावण केली. एवढेच नाही, तर पेपर स्ट्रॉ अजिबात टिकाऊ नसून, ते कुठल्याही पेयात टाकल्यावर मान टाकतात, असे म्हणत ट्रम्प यांनी प्लास्टिकच्या पारड्यात वजन टाकले. एवढेच नाही, तर २०२० सालच्या निवडणूक प्रचारादरम्यानही ट्रम्प यांनी त्यांचे नाव लाल रंगाच्या प्लास्टिक स्ट्रॉवर कोरून रिपब्लिकन पक्षाचा जोरदार प्रचार केला होता आणि आता राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी थेट पेपर स्ट्रॉ हद्दपार करण्याचीच भाषा केलेली दिसते. यामुळे साहजिकच प्रश्न निर्माण होतो की, पेपर स्ट्रॉ की प्लास्टिक स्ट्रॉ, नेमका पर्यावरणपूरक पर्याय कोणता?
 
या प्रश्नाच्या खोलात जाऊन दोन्ही स्ट्रॉच्या प्रकारांचा अभ्यास केला असता, असे आढळून येते की, खरं तर दोन्ही स्ट्रॉचे प्रकार हे जैविक अवनती योग्य (बायोडिग्रेडेबल) नाहीत. साहजिकच प्लास्टिकच्या स्ट्रॉना विघटनासाठी काहीशे वर्षे लागतात, तर पेपरच्या स्ट्रॉसाठी हा अवधी काही वर्षांचा आहे. तसेच, पेपर स्ट्रॉच्या विघटन प्रक्रियेत उत्सर्जित होणार्‍या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाणही जास्त असल्याचे संशोधनाअंती समोर आले. प्लास्टिक हे मानवी शरीरासाठी अपायकारक असल्याचे यापूर्वीच्या संशोधनांतून सिद्ध झाले आहे. पण, त्याचबरोबर पेपरचे स्ट्रॉही मानवी आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे बेल्जियमच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात प्रकर्षाने दिसून आले. त्या संशोधनानुसार, पेपर स्ट्रॉमध्येही मानवी आरोग्यासाठी अपायकारक असलेले ‘पॉली’ आणि ‘पेरफ्लूरोएल्काइल’ (पीएफएएस) हे घटक आढळून आले होते. ‘पीएफएएस’ हा घटक निसर्गात दीर्घकाळ टिकून राहतो आणि जलस्रोतही दूषित करतो. त्यामुळे ‘पेपर स्ट्रॉ’ हा वरकरणी पर्यावरणपूरक पर्याय वाटत असला, तरी प्रत्यक्ष विचार करता, त्याचाही मानवासह निसर्गाला धोका असल्याचे स्पष्ट होते. मग आता पेपरचेही स्ट्रॉ नको, प्लास्टिकही नको, तर मग पर्याय तरी कोणता, असा प्रश्न उद्भवणे साहजिकच. पण, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुनर्वापर करण्यायोग्य सामग्रीपासून स्ट्रॉची निर्मिती केल्यास पर्यावरणीय प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो. पण, अमेरिकेचा विचार करता, सध्या तरी पेपर स्ट्रॉऐवजी प्लास्टिकलाच ट्रम्प यांनी पसंती दिलेली दिसते.
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेताच, विविध आंतरराष्ट्रीय संघटनांना दणका देत, अमेरिकेचा सहभाग काढून घेतला. पॅरिस करारातून माघारीची घोषणाही त्यापैकीच एक. त्यामुळे येत्या काळात अमेरिका ‘मेरी मर्जी’नुसारच, धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करेल, ज्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम जगासाठी निश्चितच चिंतेची बाब ठरू शकतात. अमेरिकेतील ‘स्ट्रॉ’वॉर हा त्याचच प्रथम अध्याय!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची