भाषा संवर्धनाची भरारी!

    10-Feb-2025   
Total Views | 26

meta
 
कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या काळाची अनिवार्यता आहे. बुद्धिमत्तेच्या या तंत्रामुळे, सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवी दालने खुली होत आहेत. माणसाला ज्याप्रकारे स्वत:च्या विकासासाठी शिक्षणाची गरज असते, त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेला टिकून राहण्यासाठी, सर्वव्यापी अद्ययावत माहितीची आवश्यकता असणार आहे. काही काळापूर्वी इंटरनेटवर एखाद्या साहित्याचे भाषांतर केल्यास, त्यातील असंख्य चुका आपल्याला नजरेस येत होत्या. योग्य त्या जागेवर योग्य तो संदर्भ न आढळल्यास, अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यताच अधिक होती. परंतु, भविष्यात भाषांतराची हीच प्रक्रिया सुलभ होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. दि. ७ फेब्रुवारी रोजी मार्क झुकेरबर्ग यांच्या ‘मेटा’ या कंपनीने, ‘लॅन्गवेज टेक्नोलॉजी पार्टनर’ प्रोग्रामची घोषणा केली. भाषांतर हे एक मानवी कौशल्य आहे. भाषांतर करण्यासाठी मानवामध्ये जी आकलन क्षमता आहे, त्याच पद्धतीची आकलन क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेतसुद्धा विकसित व्हावी हा यामागचा उद्देश. भाषांतर कौशल्याचा विकास यासोबतच एक व्यापक भूमिका घेऊन, ‘मेटा’ने या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
 
जगाच्या पाठीवर अशा असंख्य भाषा आहेत, ज्यांच्याशी आपला परिचय होत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’च्या प्रारूपांमध्ये नजीकच्या काळात, याच भाषांचा समावेश व्हावा व कुठलीही भाषा डिजिटल विश्वापासून वंचित राहता कामा नये, हा यामागचा विचार आहे. ‘युनेस्को’ आणि ‘मेटा’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जातो आहे. डिजिटल विश्वामध्ये भाषिकदृष्ट्या सर्वसमावेशकता असावी, हे धोरण ‘मेटा’ अवलंबणार आहे. बोलीभाषेमध्ये असणारी विविधता, त्यांचे वेगळेपण आदि गोष्टींचा समावेश डिजिटल विश्वामध्ये होणार आहे. ‘युनेस्को’ ही संस्था २०२२ ते २०३२ ही वर्षे, आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषांचे दशक म्हणून साजरा करते आहे. या उपक्रमाला ‘मेटा’ने पाठिंबा दर्शवला आहे. भाषांतराची प्रणाली विकसित व्हावी म्हणून ‘मेटा’ अशा भागीदारांच्या शोधात आहेत, जे कोणत्याही स्थानिक भाषेतील दहा तासांपेक्षा जास्त मजकूर ध्वनिमुद्रित करून देऊ शकतील. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लिखित साहित्याची आणि भाषांतरीत मजकूराची माहितीसुद्धा त्यांनी मागवली आहे. हे भागीदार ‘मेटा’च्या कर्मचार्‍यांसहित सदर भाषेतील, कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रारूपे विकसित करतील. या संदर्भातील मार्गदर्शन त्यांना ‘मेटा’कडून केले जाईल असे त्यांनी म्हटले. कॅनडामधील केंद्रशासित प्रदेश असलेल्या नुनाव्हुत सरकराने, ‘मेटा’सोबत काम करायला होकार दिला आहे.
 
त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपांची तपासणी करण्यासाठी, ‘ओपन सोर्स ट्रान्सलेशन बेंचमार्क’ या प्रणालीचा वापर केला जाणार असल्याची माहिती ‘मेटा’ने दिली आहे. ही प्रणाली सर्वांसाठी खुली असणार आहे. या प्रणालीमुळे भाषांतरीत साहित्याची योग्यता तपासता येणार असून, सदर तंत्रज्ञान यामुळे जास्त सुलभ होत जाणार आहे. सध्या ही प्रणाली सात भाषांमध्ये उपलब्ध आहे. डिजिटल विश्वामध्ये बहुभाषिक भाषांतराची एक अभूतपूर्व प्रणाली विकसित होणार आहे. ‘मेटा’ने दिलेल्या माहितीनुसार, २०२२ साली ‘नो लँग्वेज लेफ्ट बिहाइंड’ या प्रकल्पाची त्यांनी घोषणा केली होती. या अंतर्गत ‘ओपन सोर्स मशीन ट्रान्सलेशन इंजिन’ची निर्मिती झाली. या प्रणालीनेच भविष्यातील संशोधनाचा आणि विकासाचा पाया रचला. त्याचबरोबर ‘मेटा’ने ‘मॅसिव्हली मल्टीलिंग्युअल स्पीच’ हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या अंतर्गत, हजारो भाषांमधील ध्वनिफिती गोळा करण्यात आल्या.
 
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जगातील भाषिक विविधता कशी टिकवता येईल, यासाठी ‘मेटा’चा हा नवा प्रयत्न अभूतपूर्व आहे. भाषा हे संवादाचे माध्यम आहे. माणसाला भाषेमध्ये संवाद साधता येतो, या वैशिष्ट्यामुळे तो इतर प्राणिमात्रांपेक्षा वेगळा आहे. माणसाला जोडणार्‍या अनेक भाषा, काळाच्या ओघात नष्ट झाल्या. आजमितीलासुद्धा स्थानिक भाषांचे संवर्धन, हा अनेक राष्ट्रांसाठी कळीचा मुद्दा आहे. भारतासारख्या विविधता असलेल्या देशात, भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात आली. भाषेचा संबंध केवळ अस्मितेशी नसून अस्तित्वाशी आहे, हेच यातून स्पष्ट होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे आगमन झाल्यावर रोजगार नष्ट होणे, इथपासून ते तंत्रज्ञानाचे सर्वव्यापी वर्चस्व यावर विचारविमर्श आज केला जातो आहे. पण, याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून, नष्ट होत असलेल्या भाषांच्या संवर्धनाचाही विचार केला जातो आहे, ही बाब सकारात्मक म्हणावी लागेल.
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121