नव्या दमाचा दिग्दर्शक

    10-Feb-2025   
Total Views | 22
 
vrishank kavathekar
 
स्वत:मधील कलेच्या आवडीला करिअर म्हणून बघत, त्यामध्ये देदिप्यमान कामगिरी करणार्‍या रंगभूमीवरील कला क्षेत्रातील नव्या दमाचा दिग्दर्शक असलेल्या वृशांक कवठेकर यांच्याविषयी...
 
वृशांकचा जन्म भिवंडी येथे झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीमधील वाटद. त्यांचे सर्व बालपण डोंबिवलीमध्ये गेले. प्राथमिक शिक्षण डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण, मॉडेल महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यांचे वडील तुषार हे शासकीय कर्मचारी असून, आई ऋचा गृहिणी आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या वृशांकने, आतापर्यंत ५०हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. कवठेकर घराण्यात सर्वांनाच कलेची आवड आहे. त्यामुळे वृशांकने जेव्हा दिग्दर्शनाकडे करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला त्यांच्या आईवडिलांनी पाठिंबाच दिला. वृशांकने शाळेत असताना एका नाटकात सहभाग घेतला होता. हे नाटक दिपाली काळे यांनी बसविले होते.
 
वृशांकने २०१३ साली नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. ‘देवरुखे ब्राह्मण संघ’ डोंबिवलीच्या एकांकिका स्पर्धेत त्याने, पहिल्यांदाच बाल एकांकिका दिग्दर्शित केली आणि त्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातूनच आपण रसिकांना एक चांगली कलाकृती बघण्याचा आनंद देऊ शकतो, याची दिशा वृशांकला मिळाली. त्यानंतर त्याचा नाट्य क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्याच्या नाटकांना एका मागून एक पारितोषिक मिळत गेले. नाट्य दिग्दर्शनाचा प्रवास सुरू असतानाच, त्याला गुरूकुल द डे स्कूल या शाळेत नाट्य प्रशिक्षक आणि कलासंचालक म्हणून नोकरी मिळाली. कला क्षेत्रात काम करताना, कायमस्वरूपी वेतन मिळणारी नोकरी सांभाळूनच दिग्दर्शनाची आवड जोपासायची असा निश्चय वृशांकने केला होता. २०१६ साली गुरूकुल द डे स्कूलमध्ये तो रुजू झाला. कलेच्या क्षेत्रातच नोकरी मिळाल्याने, नोकरी आणि आवड या दोन्ही गोष्टी वृशांकला जोपासता येत आहेत.
 
वृशांकला २०१४ साली देहराडून येथे झालेल्या १२व्या भारत संस्कृती दर्पण नाट्य महोत्सव, देहराडून या राष्ट्रीय महोत्सवामध्ये ’मॉडर्न रामायण’ या बालनाट्यास ‘सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटिका पुरस्कार’ मिळाला. २०१५ साली प्रथमच, बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक त्याला मिळाले. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, मुंबईतर्फे सोलापूर येथे आयोजित पहिल्या बालनाट्य संमेलनात, ज्येष्ठ लेखक योगेश सोमण लिखित ‘झेप’ हे बालनाट्य सादर करण्याची संधी त्याला मिळाली. दरवर्षीच्या डोंबिवली जिमखाना आयोजित सांस्कृतिक महोत्सवात, आंतरशालेय स्पर्धेत सादर केलेल्या एकपात्री प्रयोगांना आजपर्यंत अनेक पारितोषिके ही मिळाली. थिएटर मुव्हमेंट, ओडिशा आयोजित केलेल्या राष्ट्रीय महोत्सवामध्ये दिग्पाल लांजेकर लिखित ‘आरंभ’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक तसेच वृशांकाला उत्कृष्ट दिग्दर्शनाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
 
‘रविकिरण मुंबई’ या संस्थेने आयोजित केलेल्या स्मृतिगत सुलभाताई देशपांडे बालनाट्य स्पर्धेत, २०१६ साली अश्विनी मुकादम लिखित ‘नभी उमटे इंद्रधनू’ या नाटकास प्रथम क्रमांकाचा मानाचा ‘फिरता सुवर्ण चषक’ पटकावण्याचा मान आणि वृशांकला उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. डोंबिवली रोटरॅक्ट क्लब आयोजित मूकबधिर बालनाट्य स्पर्धेत, ‘जिद्द’ या बालनाट्यासाठी उत्कृष्ट पार्श्वसंगीताचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. २०१८ साली १५व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून ‘अ‍ॅक्ट १९७२’ या नाटिकेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच वृशांकला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. याप्रमाणेच महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत २०१९ आणि २०२२ मध्ये दिग्दर्शनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, २०२३ साली दिग्दर्शनाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आणि यंदा २०२४-२५ च्या २१व्या बालनाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. विविध ‘राष्ट्रीय महोत्सवामध्ये, दिग्दर्शनाची ४०हून जास्त पारितोषिके वृशांकाने पटकाविली आहेत. २१व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत वाशी, नवी मुंबई केंद्रातून ‘गुरूकुल द डे स्कूल’ या संस्थेच्या वृशांकच्या ‘न्यूटनचा लायन’ या नाटकाने, प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
 
२०२२ साली ‘श्रीकला संस्कार’ या संस्थेची संपूर्ण धुरा दिपाली काळे यांनी, सर्व तरुण कार्यकत्यांकडे सोपवली. यावेळी ‘श्रीकला संस्कार न्यास’ ही नवीन संस्थेची स्थापना करून, त्याची कार्यवाह पदाची जबाबदारी स्वीकारली. या संस्थेमार्फत मराठी वर्षाचा अभिमान बाळगणारी दिनदर्शिका, नाट्यशिबिरे, बालनाट्य स्पर्धा असे अनेक उपक्रम राबविले जातात. यामध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात ही संस्था अग्रस्थानी असते. वृशांक डोंबिवलीमधील ‘श्री गणेश मंदिर संस्थान’च्या सांस्कृतिक समितीमध्ये कार्यरत आहे. ‘देवरुखे ब्राम्हण संघ, डोंबिवली’च्या हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यवाह पदी, वृशांकची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष्यातील अनेक सहकार्‍यांमुळे आजवर यशाची शिखरे गाठता आली, अशी प्रांजळ कबुली वृशांक देतो.
 
वृशांकला विविध ठिकाणी परीक्षक, प्रमुख पाहुणा आणि नाट्य प्रशिक्षक म्हणून निमंत्रित केले जाते. वृशांकला आतापर्यंत ‘श्रीकला संस्कार’ संस्थेतर्फे दिला जाणारा ‘कलाश्री पुरस्कार’, देवरुखे ब्राह्मण संघ आयोजित दर्शन निमकर स्मृती एकांकिका स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट रंगकर्मी पुरस्कार’, बालोत्सव २०१७ साली ज्येष्ठ रंगकर्मी अनंत वेलणकर स्मृती बालनाट्य क्षेत्रात विशेष कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार आणि २०२०-२१ सालचा ‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कारा’ने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. कला क्षेत्रातील उगवत्या दिग्दर्शकाच्या पुढील वाटचालीसाठी दै. मुंबई तरुण भारत’ कडून हार्दिक शुभेच्छा!
अग्रलेख
जरुर वाचा
वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अ‍ॅड. दुशिंग यांच्यावर मारहाणीचा गुन्हा; जुनं प्रकरण काय?

वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अ‍ॅड. दुशिंग यांच्यावर मारहाणीचा गुन्हा; जुनं प्रकरण काय?

(Vipul Dushing) पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी न्यायालयात हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू मांडणारे वकील विपुल दुशिंग हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे त्यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप करणाऱ्या या वकिल दुशींग यांच्यावरच सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. काही वर्षांपूर्वीचं हे प्रकरण असून आता पुन्हा चर्चेत आलं आहे...

मुंबई शिक्षक विकास मंडळाचे महायुवा संमेलन उत्साहात संपन्न!

मुंबई शिक्षक विकास मंडळाचे महायुवा संमेलन उत्साहात संपन्न!

मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात दि. २८ मे रोजी मुंबई शहर शिक्षक मंडळाचे महायुवा संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर यांनी युवा शिक्षकांना मार्गदर्शन केले. या महासंमेलनात १६०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विविध समस्या, मार्गदर्शनपार सत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या महायुवा संमेलनाचे आयोजन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विशाल कडणे यांच्या नेतृत्वात करण्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121