विदेशी चाररू शिंपल्यांचा ठाणे खाडीला विळखा; फ्लेमिंगोच्या खाद्य क्षेत्राला धक्का

    08-Jan-2025
Total Views | 228
thane creek mudflat



मुंबई (अक्षय मांडवकर) - पाणथळ जागेच्या आंतरराष्ट्रीय रामसर दर्जा मिळलेल्या ठाणे खाडीत दक्षिण अमेरिकेतील चाररू शिंपल्यांनी बस्तान बसवले आहे (thane creek mudflat). ज्याप्रमाणे विदेशी झाडे ही स्थानिक पर्यावरणीय परिसंस्थेच्या मुळावर उठली आहेत, त्याचप्रमाणे या चाररू शिपल्यांनी ठाणे खाडीतील किनारी परिसंस्थेला धक्का देण्यास सुरुवात केली आहे (thane creek mudflat). त्यामुळे विदेशी शिंपल्यांचा वाढत्या अधिवासावर रोख लावून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस) आणि वन विभागाच्या 'कांदळवन प्रतिष्ठान'मध्ये सामंजस्य करार झाला आहे. (thane creek mudflat)
 
चाररू शिंपले याला 'मायटेला स्ट्रिगाटा' या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. ही प्रजात मूळची दक्षिण अमेरिकेतील आहे. मात्र, आता इंडो-पॅसिफिक प्रदेशांमध्ये ती पाय पसरू लागली आहे. जलवाहतूकीमुळे या विदेशी शिंपल्याने भारतात प्रवेश केल्याची शक्यता आहे. भारतात सर्वप्रथम ही प्रजात केरळ राज्यात २०१८ मध्ये आढळून आली होती. त्यानंतर २०१९ साली 'बीएनएचएस'च्या शास्त्रज्ञ रेश्मा पितळे यांना या प्रजातीचे काही नमुने ठाणे खाडीत आढळून आले. त्यावेळी या प्रजातीचा खाडीतील चिखलाच्या मैदानावर फारसा पसारा नव्हता. मात्र, २०२० सालच्या कोव्हिड लाॅकडाऊनंतर पितळे यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये त्यांना खाडीतील चिखलाच्या मैदानावर या प्रजातीचा विस्तार झाल्याचे आढळून आले. अधिक क्षारतेच्या प्रदेशात राहण्याची क्षमता, विविध अधिवासांसोबत जुळवून घेण्याचे कसब आणि जलदरित्या होणाऱ्या शारीरिक वाढीमुळे या विदेशी शिंपल्यांनी आता ठाणे खाडी व्यापून टाकली आहे.
 
 
ठाणे खाडीतील पूर्वेकडील किनारपट्टीप्रदेशातील चिखलाच्या मैदानावर या विदेशी शिंपल्याचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झालेले दिसून येत आहे. वाशी, सानपाडा, अटल सागरी सेतू आणि शिवडीच्या चिखलाच्या मैदानावर या प्रजातीचे अस्तित्व मोठ्या संख्येने दिसून येते. सागरी सेतूचे खांब देखील या प्रजातीच्या आक्रमणाने व्यापून गेले आहेत. तसेच पूर्वी घारापुरी (एलिफंटा) बेटावरील चिखलाच्या मैदानावर ही प्रजात आढळली नव्हती. मात्र, आता त्याठिकाणी देखील या प्रजातीने मोठ्या संख्येने आपले पाय पसरले आहेत. त्यामुळे या प्रजातीच्या वाढत्या अधिवासावर सखोल अभ्यास करुन त्यासंदर्भातील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 'बीएनएचएस' आणि 'कांदळवन प्रतिष्ठान'मध्ये सामंजस्य करार झाला असून लवकरच अभ्यासाला देखील सुरुवात होणार आहे.
 
 
विविध घटकांच्या अभ्यासाची गरज
या प्रजातीच्या वाढत्या संख्येमुळे चिखलाच्या मैदानावरील गाळाचा पोत कसा बदलत आहे, त्यांची संख्या विशिष्ट अधिवासामध्येच का वाढत आहे आणि त्यांच्या वार्षिक प्रजनन साखळीचा उलगडा करण्याचा प्रयत्न आम्ही अभ्यासाद्वारे करणार आहोत. तसेच या शिंपल्यांचा रोजगाराच्या अनुषंगाने खतर्निर्मिती किंवा मत्स्यव्यवसाय उद्योगामध्ये उपयोग होऊ शकतो का, याची देखील चाचपणी करण्यात येईल. - रेश्मा पितळे, शास्त्रज्ञ, बीएनएचएस

 
फ्लेमिंगोच्या खाद्य क्षेत्राला धोका
ठाणे खाडी पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या अनेक प्रजातींसाठी ती खाद्य भूमी म्हणून काम करते. खाडीत लाखोच्या संख्येने दाखल होणारे फ्लेमिंगो हे चिखलाच्या मैदानावरील गाळामधील हरित शैवालावर अन्नग्रहण करतात. या अन्नग्रहणासाठी त्यांना चिखलाची सपाट मैदाने आवश्यक असतात. मात्र, खाडीत ज्याठिकाणी चाररू हे विदेशी शिंपले आहेत, तेथील चिखलाच्या मैदानावर गाळाचे पुंजके तयार झाल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. त्यामुळे गाळाच्या पुंजक्याचे प्रमाण वाढल्यास चिखलाची सपाट मैदाने राहणार नाहीत. ज्याचा फ्लेमिंगोच्या अन्नग्रहणावर परिणाम पडेल.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121