मु. पो. बोंबिलवाडी

एक सुखद नाट्यचित्राविष्कार

Total Views | 70

Mukkam Post Bombilwadi
 
26 वर्षांपूर्वी रंगभूमी गाजवणारे परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हे नाटक आता मोठ्या पडद्यावर आले आहे. दि. 1 जानेवारी रोजी ‘विवेक फिल्म्स’, ‘मयसभा करमणूक मंडळी’ निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रशांत दामले यांनी हिटलरची, तर आनंद इंगळे यांनी विन्स्टन चर्चिलची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात काम करण्याचा अनुभव आणि प्रवास कसा होता, याबाबत आनंद इंगळे आणि या चित्रपटात विशेष भूमिका साकारणारा अभिनेता प्रणव रावराणे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी साधलेला सुसंवाद.
 
नंद इंगळे यांनी ‘मु.पो. बोंबिलवाडी’ या नाटक आणि चित्रपटाविषयी बोलताना मत मांडले की, “मी परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मु. पो. बोंबिलवाडी’ हे नाटक पाहिले होते. मुळात कथा ही काल्पनिक असल्यामुळे त्यात काय गमती आहेत आणि विनोद काय सांगू पाहतो, हे मला प्रेक्षक म्हणून नाटक पाहताना माहीत होते आणि त्यानंतर कालांतराने जेव्हा परेश मोकाशी यांनी त्या सुपरहिट नाटकाचा चित्रपट करण्याचा विचार मला सांगितला आणि त्यात मी चर्चिल ही भूमिका साकारणार, असे सांगितले, त्यावेळी नाटक पाहिले असल्यामुळे त्यात चर्चिल हे पात्र नव्हते, हे मला ठाऊक होते. पण, त्यावर उत्तर देताना मोकाशी म्हणाले की, नाटकाचे माध्यमांतर चित्रपटात करताना आवश्यक ते बदल करून काही नवी पात्रे आणणार आहे आणि त्यांपैकीच एक पात्र आहे चर्चिल. त्यामुळे अभिनेता म्हणून माझ्यासाठी एक नवे पात्र साकारायला मिळणे आणि त्यात पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्यासोबत काम करण्याची मिळणारी संधी म्हणजे पर्वणीच होती, तर अशा प्रकारे ‘मु. पो. बोंबिलवाडी’त चर्चिल आला आणि नाटकाचा चित्रपट यशस्वीपणे संपूर्ण झाला.”
 
प्रणव रावराणे तो चित्रपटाचा भाग कसा झाला, याबद्दल बोलताना म्हणाला की, “मी नाटक पाहिले नव्हते. ज्यावेळी चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली, त्यावेळी मोकाशी यांच्यासोबत काम कधीच न केल्यामुळे संधी हातातून जाऊ द्यायची नव्हती. त्यामुळे माझे पात्र कोणते, किती मोठे आहे की लहान आहे, असा कोणताही प्रश्न न करता, मी लगेच होकार दिला. शिवाय, बर्‍याच वर्षांनंतर मला आनंद इंगळे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार होती, तीदेखील मला हातून जाऊ द्यायची नव्हती. ‘वार्‍यावरची वरात’, ‘वस्त्रहरण’ या नाटकांत आम्ही एकत्र काम केले होते. पण, चित्रपटात एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे प्रशांत दामले, आनंद इंगळे, गीतांजली कुलकर्णी, वैभव मांगले अशा दिग्गज कलाकारांच्या सान्निध्यात काम करायला मिळणे म्हणजे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट होती.”
 
अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत जवळपास ‘गोळा बेरीज’ या चित्रपटानंतर 13 वर्षांनी पुन्हा एकदा आनंद इंगळे यांनी काम केले आहे. त्यांच्यासोबच काम करतानाचा अनुभव सांगताना इंगळे म्हणाले की, “सध्या मराठी नाट्यसृष्टीत प्रशांत दामले यांनी खर्‍या अर्थाने प्रेक्षकांना पकडून ठेवले आहे. प्रेक्षक आधी दामलेंच्या नाट्यकलाकृती पाहतात आणि मग आम्हा इतर कलाकारांच्या नाटकांना येतात, ते पाहून खरेच फार आनंद होतो. शिवाय, दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा एखाद्या विनोदी प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तो समजून घेत प्रशांत दामले त्यावर अमलात आणणारी अभिनयातील कृती हे दृश्य पाहण्यातही अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे नक्कीच चर्चिल आणि हिटलर ही दोन पात्रे प्रेक्षकांना चित्रपटातून अनेक गोष्टी सांगून जातील.”
 
तसेच, सध्या मराठी चित्रपटसृष्टीकडे काही अंशी मराठी प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ यावर आपली मते मांडताना आनंद इंगळे म्हणाले की, “कोणताही मराठी चित्रपट यशस्वी तेव्हाच होईल, जेव्हा प्रेक्षक तो पाहतील आणि प्रेक्षकही चित्रपट पाहण्यासाठी आवडीने त्याचवेळी येतील, जेव्हा त्यांच्या आवडीचे विषय मोठ्या पडद्यावर मांडले जातील. त्यामुळे मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस पुन्हा नक्कीच येतील. त्यासाठी कला क्षेत्रातूनही तितकेच जोरदार प्रयत्न झाले पाहिजेत,” तर प्रणव म्हणाला की, “प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येतात, तेव्हा त्यांचा अनमोल वेळ ते खर्च करत असतात. त्यामुळे पैशांपेक्षा वेळ वसूल होईल, याची खबरदारी प्रत्येक कलावंताने घेतली, तर नक्कीच प्रेक्षक कलाकृती डोक्यावर घेतील आणि घेतातच, यात शंका नाही.”
 
तर दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी आपले मत मांडताना म्हटले की, “ ‘मु.पो. बोंबिलवाडी’ चित्रपटाच्या निमित्ताने वेगळा विनोदाचा प्रकार प्रेक्षकांना आवडतो आणि पचतो की नाही, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तसेच, ‘विवेक फिल्म्स’ निर्माते स्वरुपात आमच्यासोबत जोडले गेल्यामुळे नव्या वर्षातील हा चित्रपट एक नवी पहाट मराठी चित्रपटांसाठी घेऊन आला आहे.”
 
चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या की, “मला ‘मयसभा करमणूक मंडळी’ला ‘विवेक फिल्म्स’ची साथ लाभल्यामुळे ‘मु. पो. बोंबिलवाडी’ चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास फार सुखकर गेला. अडचणी जरी आल्या, तरी ‘विवेक फिल्म्स’च्या साथीने त्यामागे टाकत चित्रपट अखेर 2025 या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाला आहे, याचा विशेष आनंद आहे.”

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. 
अग्रलेख
जरुर वाचा
कराची हल्ल्याचे वास्तव काय? कराची पोर्ट ट्रस्ट ऑफिशिअलचे सूचक ट्विट!

कराची हल्ल्याचे वास्तव काय? कराची पोर्ट ट्रस्ट ऑफिशिअलचे सूचक ट्विट!

जम्मू आणि काश्मिरच्या कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये निरपराध नागरिकाना लक्ष्य केल्यामुळे पाकिस्तानने स्वतःला अडचणीत आणले आहे. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईबाबत पाकिस्तान सरकारने अपेक्षाही केली नसेल. यावेळी १०० नाही तर थेट ३०० किलोमीटरच्या आत असलेल्या बहुतेक महत्त्वाच्या ठिकाणांवर भारताकडून मोठे हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, भारतीय नौदलाच्या युद्धनौके आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात करण्यात आले असून कराची ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121