महाकुंभ - हिंदुत्वाचे शक्तिप्रदर्शन

    24-Jan-2025   
Total Views |
Maha Kumbha


भारतातील महाकुंभची चर्चा अगदी सातासमुद्रापारही असून, विदेशी पर्यटकही जगातील या सर्वांत भव्यदिव्य अशा अध्यात्मिक पर्वणीत सहभागी झाले आहेत. शिवाय एक भगवेधारी राज्यशकट कसा हाकणार, असा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून खोचक प्रश्न उपस्थित करणार्‍यांनीही महाकुंभतील प्रशासकीय व्यवस्था, तत्परता पाहून तोंडात बोटे घातली आहेत.

प्रयागराजमध्ये हिंदूंच्या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यात अर्थात महाकुंभात सहभागी होण्यासाठी भाविक त्रिवेणी संगमावर येत आहेत. आतापर्यंत तब्बल दहा ते १२ कोटी भाविकांनी पवित्र संगमात अमृतस्नान केले. देशाच्या कानाकोपर्‍यातूनच नाही, तर परदेशातूनही भाविक स्नान करण्यासाठी संगमावर दाखल झाले. यावर्षीच्या कुंभमेळ्याला केवळ धार्मिक महत्त्वच मिळाले नाही, तर राजकीय प्रयोगशाळेचेही स्वरुप आले आहे. ’पंचायती आखाडा महानिर्वाणी’चे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी म्हणाले, “आजचे सरकार सनातन धर्माने चालणार आहे, आजचे राज्यकर्ते संत आहेत, म्हणूनच व्यवस्था चांगली आहे.” विशेष म्हणजे, विश्वेश्वरानंद गिरी हे १९७८ सालापासून कुंभमेळ्यामध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या या टिप्पणीस विशेष महत्त्व प्राप्त होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः गोरक्षधाम पीठाचे महंत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना हिंदुत्वासह विकास हे ध्येय साध्य करण्याचे तंत्र चांगलेच उमगले असल्याने यंदाचा कुंभमेळा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरत आहे.

साधू, संत आणि महात्म्यांचे अनुयायी असतात, ते समाजात सतत वावरत असतात. जेव्हा ते महाकुंभाच्या चांगल्या व्यवस्थेमुळे आनंदी होतील, तेव्हा ते उत्तर प्रदेशबद्दल एक सकारात्मक संदेश घेऊन जातील. हाच संदेश ’ब्रॅण्ड युपी’ला बळकटी देईल. महाकुंभ हा असा कार्यक्रम आहे, जो जात, पंथ आणि प्रदेशातील भेद मिटवतो. भगवान मुरुगनची भूमी असलेल्या तामिळनाडूहून, कश्यप ऋषींची भूमी असलेल्या काश्मीरमध्ये आणि कामाख्या मातेच्या भूमी असलेल्या आसाममधील हिंदू येथे येत आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, दलित, वनवासी असे वर्गभेद येथे नष्ट होत असून येथे येणारा प्रत्येकजण केवळ हिंदू म्हणूनच अमृतस्नान करत आहेत. कोट्यवधींच्या संख्येने हिंदू साधू, संत, महंत आणि महात्मे आणि त्यांच्याजोडीने जातपात आणि अन्य भेद सोडून एकत्र आलेला हिंदू समाज हे चित्र येथे सुखावणारे आहे. हिंदूंची ही धार्मिक एकजूट हिंदू धर्म संपविण्याचे स्वप्न पाहणारे इस्लामी कट्टरतावादी, पेरियारवादी आणि अन्य अनेक वादींना जोरदार चपराक लावणारी ठरली. विशेष म्हणजे, या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे उत्तर प्रदेश. ज्या उत्तर प्रदेशास नेहरूवाद्यांनी नेहमीच ‘गायपट्टा’ म्हणून हिणवले, त्याच उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ नामक साधू कुंभमेळ्याचे अतिशय यशस्वी आणि आधुनिक पद्धतीने आयोजन करतो आणि उत्तर प्रदेशही आता विकासाच्या मार्गावर वेगवान घोडदौड करत असल्याचे दाखवून देतो. त्याचवेळी नेहरूवाद्यांच्या लाडक्या काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आर्थिक अस्थैर्य निर्माण होते, हा नेहरूवाद्यांचा पराभवच म्हणावा लागेल.

राजकारण बाजूला ठेवून, महाकुंभ हा हिंदूंसाठीदेखील एक विशेष प्रसंग म्हणून आला आहे. महाकुंभात अमृत स्नानाचे विशेष महत्त्व आहे, ज्याला पूर्वी ‘शाही स्नान’ म्हटले जात असे. यावेळी दि. १३ जानेवारी (पौष पौर्णिमा), दि. १४ जानेवारी (मकरसंक्रांती), दि. २९ जानेवारी (मौनी अमावस्या), दि. ३ फेब्रुवारी (वसंत पंचमी), दि. १२ फेब्रुवारी (माघी पौर्णिमा) आणि दि. २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री) रोजी अमृत स्नान आहे. हे स्नान फक्त कुंभमेळ्यातच होते, म्हणूनच संत-महंत याला प्राधान्य देतात. या महाकुंभात आपल्याला सनातन हिंदू धर्माची वेगवेगळी रुपे दिसत आहेत. एकीकडे ४५ किलो वजनाचे २.२५ लाख रुद्राक्ष परिधान करून १२ तास ध्यानात मग्न असलेले साधू आहेत, तर दुसरीकडे आपल्या बासरीने सुमधुर संगीत ऐकवणारे साधू. केवळ पुरुषच नव्हे, तर महिला साधू-संन्यासींची संख्यादेखील यंदा लक्षणीय आहे. सध्या ज्या पाश्चिमात्य ‘वोक कल्चर’चा बोलबाला आहे, त्याच्या अनुयायांनी तर महाकुंभामध्ये येऊन किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची तर आवर्जून भेट घ्यायला हवी. यंदा किन्नर आखाड्याने ११ लाख रोपांचे वाटप करून पर्यावरण रक्षणाचे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळे ‘वोकिझम’च्या नावाखाली ‘बिनडोक प्राईड परेड’ काढणार्‍यांसाठी कुंभमेळा उत्तम उदाहरण आहे.

तसेच यावेळी सुरक्षेची तयारीही खूप कडक आहे. २०१३च्या घटनेपासून धडा घेत, यावेळी प्रयागराज रेल्वे स्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई करण्यासाठी ‘स्नायपर्स’ तैनात करण्यात आले आहेत. स्टेशनवर पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि ‘आरपीएसएफ’, ‘आरपीएफ’ आणि ‘जीआरपी’च्या अतिरिक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची कसून तपासणी केली जात आहे; जाईल. चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी ‘मॉक ड्रिल’ आयोजित केले जात आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’ आणि ‘आरएएफ’ पथके सज्ज आहेत. त्यामुळेच एका भागात तीन दिवसांपूर्वी लागलेली आग लगोलग विझवण्यात आणि प्राणहानी-वित्तहानी टाळण्यात यश आले. याशिवाय, प्रयागराज रेल्वे स्थानकाचे आधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे.

यावेळी महाकुंभ सात सुरक्षा वर्तुळांत विभागण्यात आला आहे. पहिल्या वर्तुळात प्रयागराजमध्ये प्रवेश करणार्‍या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. त्याचवेळीस संगमस्थळी उच्च सुरक्षा अधिकार्‍यांच्या तैनातीने अंतिम सुरक्षा रिंग सुनिश्चित केली आहे. हजारो सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवतील. आकाशातून ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात असून आणि गंगा-यमुना प्रवाहात विशेष कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. सायबर गुन्हे पथकांकडून सोशल मीडियावर कडक नजर ठेवली आहे. यात्रेकरूंना ११ भाषांमध्ये माहिती दिली जात आहे. ४४ घाटांवर इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि इंटरनेटचा वेग सुधारण्यात आला आहे.

ज्यावेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सत्तेत होता, तेव्हा आझम खान यांना कुंभमेळ्याचे आयोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी बसेसची व्यवस्था व्यवस्थित नव्हती. प्रवास करताना यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यावेळी रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीमुळे ४२ भाविकांचा मृत्यू झाला होता. तथापि, यानंतरही आझम खान यांचे कौतुक झाले आणि त्यांचा राजीनामाही फेटाळण्यात आला. अखिलेश यादव दोन दिवसांनी प्रयागराजला पोहोचले, पण त्यांनी त्यांचे अधिकारी आणि मंत्री दोघांचाही बचाव केला. त्यानंतर मुलायम सिंह यादव यांचा ७५वा वाढदिवस आझम खान यांच्या जौहर विद्यापीठात साजरा करण्यात आला होता. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ७५ फुटांचा केकही कापण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा योगी सरकारने आयोजनाची वेगळीच उंची गाठली आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीस अद्याप दोन वर्षे आहेत. मात्र, यंदाच्या कुंभमेळ्याच्या आयोजनाची छाप त्यावरही निश्चितच पडणार आहे. त्याचप्रमाणे कुंभाच्या यशस्वी आयोजनामुळे उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था व प्रशासन किती कार्यक्षम आहे, याचीही पावती मिळाली आहे. याद्वारे उत्तर प्रदेशात होत असलेल्या बदलांना देशभरात प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्वही अधिक मजबूत होत आहे, यात शंका नाही!