कोल्हापूरमधील वन्यजीवांच्या संरक्षणाचा वसा उचलून त्यांच्यासाठी खर्या अर्थाने रक्षक ठरलेले प्रदीप अशोक सुतार यांच्याविषयी...
कोल्हापूरमधील वन्यजीवांच्या बचाव कार्यामध्ये हातखंडा असलेले, प्रसंगी त्यासाठी जीवाची बाजी लावणारे, वन्यजीवांच्या बेवारस अवस्थेत सापडणार्या पिल्लांना पुन्हा मायेच्या कुशीत विसावण्यासाठी प्रयत्नशील असणारे आणि वन्यजीव रक्षणासाठी तळमळीने काम करणारे एक तरुण म्हणजे, कोल्हापूरच्या शीघ्र बचाव दलाचे प्रमुख प्रदीप अशोक सुतार.
प्रदीप यांचा जन्म दि. 28 जून 1991 साली कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यातील हेरले या गावी झाला. मात्र, त्यांचे बालपण आणि माध्यमिक शिक्षण हे सांगलीतील आजोळी झाले. आजोळी खेडेगावामधील असलेली शाळा ही चौथ्या इयत्तेपर्यंतच होती. त्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी, साधारण दहा किलोमीटर पायपीट करून दुसर्या गावात जावे लागे. जंगलामधून जाणार्या या वाटेवरून, प्रदीप रोज पायपीट करून जात असत. या वाटेवर कधीतरी त्यांना फांद्यांवर पहुडलेले साप दिसायचे, तर कधीतरी लपत लपत जाणारे विंचू दिसायचे. या जीवांचा वेध घेत घेत प्रदीप आणि त्याचे सवंगडी, शाळेत ये-जा करायचे. वन्यजीव आणि निसर्गप्रेमाची आवड प्रदीप यांना तिथूनच जडली. त्यानंतर वन्यजीवांचा शोध सुरूच राहिला. दहावीचे शिक्षण घेण्यासाठी, प्रदीप आई-वडिलांसोबत कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले. मात्र, तिथेदेखील वन्यजीवांविषयी लागलेला लळा शांत बसू देत नव्हता. शहराच्या आसपासच्या वस्तीत शिरणारे साप दिसले किंवा एखादा पक्षी दिसल्यावर, प्रदीप तिथे लगेच धाव घ्यायचे.
महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच प्रदीप यांनी कोल्हापूर शहर आणि आसपासच्या भागात, प्राणिमित्र आणि सर्पमित्र म्हणून काम करण्यास सुरुवात केली. साप पकडणे, त्यांच्याविषयी जनजागृती करणे, वन्यजीवांच्या बचावासाठी वन विभागासोबत समन्वय साधणे, असे त्यांचे काम सुरू झाले. काम वाढत गेल्यावर वन विभागासोबत चांगला समन्वय निर्माण झाला. कोल्हापूर जिल्ह्यात जखमी प्राण्यांना ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, कोणत्याही प्रकारचे केंद्र किंवा सामुग्री नव्हती. त्यामुळे वन विभागाच्या रोपवाटिकेमध्येच तात्पुरता निवारा केंद्रात, प्रदीप जखमी प्राण्यांवर उपचार करून घेत असे. कोल्हापूरचे तत्कालीन मुख्य वनसंरक्षक डॉ. बेन क्लेमेंट यांनी कोल्हापूरात, ‘वन्यजीव बचाव केंद्र’ सुरू केले आणि बचाव करण्यासाठी वन विभागाचे शीघ्र बचाव दल तयार केले. प्रदीप यांचे काम पाहता, 2018 साली बेन यांनी या दलामध्ये त्यांना वन्यजीव बचाव कर्ता म्हणून नियुक्त केले. तेव्हापासून प्रदीप यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.
सुरुवातीच्या काळात प्रदीप यांनी, कोल्हापूर प्रादेशिक क्षेत्रात येणार्या पाचही जिल्ह्यांमध्ये वन्यजीव बचावाचे महत्त्वपूर्ण काम केले. वन्यजीव बचावाचे काम म्हणजे जिकरीचे काम. त्यात कोल्हापूरामधील सह्याद्रीच्या पट्ट्यात वावरणारे गवे, अस्वल आणि किंग कोब्रा यांसारख्या जीवांच्या बचावाचे काम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. 2018 साली काम सुरू केल्यावर, प्रदीप यांच्यासमोर विहिरीमध्ये पडलेल्या गव्याला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान मिळाले. प्रदीप हे निर्भीड होते. त्यामुळे 80 फूट विहिरीत पडलेला गवा, सुखरूपरित्या बाहेर काढण्याचा त्यांनी प्रण घेतला. सुरुवातीला त्यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने, गव्याच्या शिगांमध्ये दोरी अडकून त्यांना बांधले आणि गव्याला स्थिरस्थावर केले. त्यानंतर स्वत: 80 फूट खाली उतरून, क्रेन बेल्टच्या साहाय्याने गव्याला बांधून विहिरीबाहेर काढले. अशा प्रसंगामधून जवळपास 18 ते 17 गव्यांना, प्रदीप यांनी सुखरूपरित्या बाहेर काढले आहे. अगदी महाबळेश्वरपर्यंतदेखील त्यांना या कामासाठी धाडण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने, उस तोडणीवेळी बिबट किंवा वाघाटीची पिल्लं सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा बेवारस अवस्थेत सापडलेल्या पिल्लांची, त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवण्याचे काम प्रदीप आपल्या सहकार्यांच्या मदतीने करतात. बिबट्या, वाघाटी आणि कोल्ह्याच्या बेवारस अवस्थेत सापडलेल्या, जवळपास 40 ते 50 पिल्लांची पुनर्भेट त्यांनी घडवून आणली आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा या तालुक्यातील हत्तींच्या व्यवस्थापनाचेदेखील ते काम करतात. हत्ती गवताची लागवड करणे, हत्तींची ओळख पटवणे, प्रसंगी गावात शिरलेल्या हत्तींना सुखरूपरित्या जंगलात परतवणे, अशी कामे ते करतात.
बिबट्यांसंदर्भातही प्रदीप यांनी पुढाकार घेतला आहे. गावात शिरणार्या बिबट्यांची ओळख पटवून, त्यांची सूची करण्याचे काम उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्यांनी केले आहे. तसेच, कॅमेरा ट्रॅपिंगच्या मदतीने जनावरांच्या हल्यास कारणीभूत असणार्या बिबट्याची ओळख पटवणे, घटनेची कारणमीमांसा करण्याचे कामदेखील ते करतात. सर्प बचावाची अंदाजे चार हजार बचाव कार्य त्यांनी पार पाडली आहेत. सध्या कोल्हापूरच्या वन्यजीव शीघ्र बचाव दलाचा विस्तार हा 11 वनपरीक्षेत्रांमध्ये असून, त्या माध्यमातून 55 स्थानिक वन्यजीव बचाव कार्यकर्ते काम करतात. या दलाचे प्रमुख म्हणून, प्रदीप सध्या काम करत आहेत. प्रदीप यांच्यासारख्या निडर बचावकर्त्यांमुळेच, आज कोल्हापुरातील वन्यजीव सुखरूप आयुष्य जगत आहेत. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!