प्रभू श्रीरामांची अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या मंदिरनिर्माणाची वाट कित्येक पिढ्यांनी पाहिली, तो क्षण ‘याचि देहे याचि डोळा’ आपण अनुभवला. या घटनेचे असंख्य कंगोरे आहेत. या कंगोर्यांचा घेतलेला हा मागोवा.
पौष शुद्ध द्वादशी शके १९४५च्या शुभमुहूर्तावर भगवान श्रीराम यांच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा इंग्रजी तारखेप्रमाणे, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली. आपल्या सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे तिथीनुसार यावर्षीची पौष शुद्ध द्वादशी (त्यादिवशी प्राणप्रतिष्ठा केली गेली म्हणून आता त्या तिथीला ‘प्रतिष्ठा द्वादशी’ असे संबोधित केले आहे.) दि. ११ जानेवारी रोजी होती. म्हणून त्यादिवशी अयोध्येत, प्राणप्रतिष्ठा महोत्सवाची प्रथमवर्षपूर्ती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी केली गेली. लाखो भाविकांनी त्यावेळी दर्शनाचा लाभ घेतला. देशभरातील याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले.
इंग्रजी कॅलेंडरनुसार, दि. २२ जानेवारी रोजी वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परिणामांचा थोडक्यात आढावा घ्यायचा हा छोटासा प्रयत्न.
राम मंदिर निर्माण आणि प्रभूरामचंद्र यांच्या विग्रहाची अर्थात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. त्यामागे जवळपास ५०० वर्षांच्या संघर्षाचा इतिहास आहे. मुघल बाबराने भगवान श्रीराम यांच्या जन्मभूमीवरील मंदिराचा विध्वंस करून, त्याजागी विवादास्पद वास्तू निर्माण केली. त्याच्या विरोधात रामजन्मभूमी मुक्तीसाठी अनेक लढाया झाल्या, अनेक संघर्ष झाले आणि यामध्ये पाच लाखांहून अधिक योद्ध्यांनी आपले बलिदान दिले. न्यायालयीन लढाईसुद्धा निकराने लढावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने न्याय दिला आणि रामजन्मभूमी मुक्त झाली. मोठ्या जल्लोषात पण संयमाने, समस्त हिंदूंनी या निर्णयाचे स्वागत केले. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची निर्मिती झाली. देशभरातून सर्व स्तरातील हिंदूंनी प्रचंड निधी यासाठी दिला. नंतरचा बाकी सर्व तपशील सर्वांना ज्ञात आहेच. जवळपास ७० एकरमध्ये हा सर्व प्रकल्प पसरलेला आहे. यामध्ये केवळ मंदिर असे नसून, त्यात संशोधन केंद्र, अत्याधुनिक ग्रंथालय, प्रदर्शन केंद्र, स्वास्थ्य केंद्रे इत्यादींचा समावेश आहे. हे सर्व पूर्णत्वाला येण्यासाठी, अजून दोन वर्षांचा कालावधी लागेल असा प्राथमिक अंदाज आहे.
राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सांस्कृतिक परिणाम
सनातन हिंदू संस्कृतीचे भगवान राम हे आदर्श राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या आदर्शांचे संस्कार आतापर्यंतच्या सर्व पिढ्यांवर होत गेले. या संस्कारातून, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या विभुतींची जडणघडण झाली. भारताच्या दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, सर्वत्र श्रीरामांचाच वावर पाहायला मिळेल. राम मंदिर नाही असे ठिकाण अभावला सुद्धा सापडणार नाही. अगदी नावातसुद्धा श्रीराम सापडेल. ‘राम जन्मभूमी मुक्ती आंदोलना’त, भारतातील प्रत्येक ठिकाणाहून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा सहभाग होता. यानिमित्त पारतंत्र्यापासून हिंदू समाजाची थोडीशी उसवत चाललेली सांस्कृतिक विण, पुन्हा एकदा घट्ट होताना आपण पाहिली. भारतारील सर्व हिंदूच श्रीराम या एकाच तीन अक्षरी मंत्रात बांधले गेल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. या मंदिर निर्माणासाठी उद्योजक आणि मध्यमवर्गीय यांनी जसा निधी दिला, तसाच पालावर राहणार्यांनीसुद्धा अगदी कृतज्ञता भावाने दिला. या मंदिर निर्माणाच्या वेळचे जे वातावरण होते, त्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहेच. भारतभरात सर्वत्र दि. २२ जानेवारी रोजी पालखी, आरती, फेर्या यांचे आयोजन झाले आणि हिंदू स्वयंस्फूर्तीने उपस्थिती दाखवत होते. संपूर्ण भारत राममय झाल्याचा चैतन्यमयी अनुभव आपण घेतला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच सांस्कृतिक जागृती एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली, हे एक मोठे फलित म्हणावे लागेल. आपण हिंदू एक आहोत, आपली संस्कृती आपणच जपायला हवी, हा भाव जागृत झाला ही महत्त्वाची उपलब्धी!! याचाच एक परिणाम असेल कदाचित, ‘महाराष्ट्रात संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्यावतीने दि. १६ जानेवारी २०२५ रोजी, ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यावर आधारित परीक्षा घेण्यात आली. यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून दोन हजारांहून अधिक शाळांमधील, दोन लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे यात मुस्लीम आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. वर्षपूर्तीनिमित्त दि. ११ जानेवारी रोजीसुद्धा, मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाने कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सामाजिक परिणाम
हिंदू सनातनी समाज हा, मूलतः राम आणि कृष्णाच्या आदर्शांनी बांधला गेलेला समाज आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भलेही नैसर्गिक संपदा वेगवेगळ्या असतील, भाषा वेगवेगळ्या असतील, पूजापद्धतीत थोडाफार फरक असेल, पण, धर्म आणि संस्कृती म्हणून आपण एकच आहोत ही भावना होती. भारतीय समाज हा एकसंध होता. इस्लामी राजवटीचा परिणाम म्हणून, थोड्या प्रमाणात दुभंग पडू लागला आणि इंग्रजांनी तर हिंदूंमध्ये फोडण्याचे कारस्थान, यशस्वीरित्या अमलात आणले. जातीनिहाय गणना प्रथम त्यांनीच केली आणि हे भेद समाजात, सरकारी स्तरावरही कायमचे रूढ केले. दुर्दैवाने राजकीय स्वातंत्र्यानंतर या भेदांना अधिक गती दिली गेली. जातीपातीचे राजकारण करून समाजातील दुभंग अधिक वाढवण्याचे काम, स्वतःला सेक्युलर म्हणवणार्यांनी सुरूच ठेवले. ‘राम मंदिर मुक्ती आंदोलना’ने आणि राममंदिर उभारणीने, हा दुभंग जोडण्याच्या कामाला गती दिली असेच म्हणावे लागेल. या आंदोलनात सर्व स्तरातील समाज सहभागी झाला. आपण सर्वच जण हिंदू आहोत, ही भावना जागृत झाली. त्यानिमित्त हिंदूंवरील अत्याचार आणि अतिक्रमण यांची जाणीव निर्माण झाली. निरनिराळ्या स्वरूपात हिंदू धर्मावर होणार्या आक्रमणांना, वाचा फुटू लागली. प्रभू श्रीराम यांचा आदर्श जागविण्याचे काम सुरू झाले. समाजातील सर्व स्तरातील बांधवांना जोडण्याचे काम सुरू झाले. अर्थात ही एक प्रक्रिया आहे. दोन हजार वर्षांच्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेला दुभंग लगेच सांधला जाईल, असे शक्य नाही. परंतु, या प्रक्रियेला सुरुवात मात्र झाली आहे. धर्मांतरित झालेल्यांची, घरवापसीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सनातन धर्मासाठी हे एक सुचिन्हच आहे.
याचा आणखीन एक सुपरिणाम म्हणजे, हिंदू समाज आता जागृत व्हायला लागला आहे. हिंदू समाजाचे प्रश्न आता तो ठामपणे मांडू लागला आहे. स्थानिक ठिकाणी काही प्रमाणात गरज पडेल, तेव्हा रस्त्यावरही उतरू लागला आहे. नुकत्याच बांगलादेशातील घडलेल्या हिंदू संहाराच्या, अत्याचाराच्या घटनांविरोधात भारतभर लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेला हिंदू समाज, ‘वक्फ बोर्ड’संबंधी हिंदू समाजाने उठवलेला आवाज, आणि अगदी आता बांगलादेश सीमेवर आपल्या सैन्याच्या मदतीला, हजारोंच्या संख्येने धावून आलेला जागृत हिंदू समाज आपल्याला दिसतो आहे. अटलजी एकदा संसदेतील भाषणात म्हणाले होते की, “अब हिंदू मार नाही खायेगा” याची यानिमित्त आठवण होते. अर्थात अजूनही हे प्रमाण वाढण्याची आवश्यकता आहे. हिंदूंचा आत्मविश्वास राम मंदिर उभारणीमुळे वाढला आहे. त्यामुळेच आता काशी आणि मथुरा या श्रद्धास्थानांच्या मुक्तीच्या प्रयत्नांना, गती मिळाली आहे. जिथे जिथे पुरावे सापडत आहेत, तिथे तिथे हिंदू आपली श्रद्धास्थाने परत मिळविण्यासाठी आक्रमक होताना दिसत आहे. संभलचे उदाहरण अगदी ताजे आहे.
राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आर्थिक परिणाम
राममंदिराच्या मुक्तीचा मार्ग सुकर झाल्यानंतर, देशातील परिस्थितीने नवे वळण घेतले. राम मंदिरासोबतच निरनिराळ्या धार्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास सुरू झाला. उज्जैनचा ‘महाकाल धाम कॉरिडोर’, वाराणसी येथील ‘काशी विश्वनाथ धाम कॉरिडोर’ यांच्यामुळे, स्थानिक विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे येणार्या भाविकांची संख्या कैक पटीने वाढली. त्याचा स्वाभाविक परिणाम मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीत झाला. ओडिशा येथील पुरी हेरिटेज कॉरिडोरमुळे असेच परिणाम पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत कामाख्या मंदिर आसाम, महाराष्ट्रात पंढरपूर इथेही अशाच कॉरिडोरचे काम, प्रस्तावित आहे. यानिमित्त संस्कृती आणि अर्थकारण एकमेकांसोबत वाटचाल करताना दिसत आहे.
राम मंदिराच्या पुननिर्माणाआधी, वर्षभरात काही लाख भाविक दर्शनासाठी अयोध्येत यायचे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आतापर्यंत, अंदाजे १५ कोटी भाविकांनी दर्शनासाठी भेट दिली आहे. आता भारतातील आध्यात्मिक पर्यटनात, अयोध्या पहिल्या क्रमांकावर आहे. जसे मंदिर निर्माण पूर्णत्वास जाईल, तेव्हा अयोध्या जगाच्या क्षितिजावर सर्वात महत्त्वाचे आध्यात्मिक स्थान म्हणून उदयास येईल. एवढे भाविक येणार म्हणून, त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा यामुळे स्थानिक विकास होतच आहे. परंतु, येणार्या भाविकांना ज्या सुविधा पुरवाव्या लागतात, त्यातून निर्माण होणारे हजारो रोजगार आणि त्यातून येणारी आर्थिक स्थिरता दिसून येत आहे. यातून सरकारलाही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असेल.
आध्यात्मिक पर्यटनामुळे, भारताच्या आर्थिक प्रगतीत मोठी भर नक्कीच पडू शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे. आता सुरू असलेल्या महाकुंभामध्ये २५ हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. देशभरातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा योग्यरित्या प्रगत केल्या गेल्या, तर भारतभरातील आध्यात्मिक पर्यटनास चालना मिळू शकते. प्राचीन सनातन हिंदू संस्कृतीत म्हणूनच, मंदिरांना महत्त्व होते. मंदिरांच्या विकासामुळे आजूबाजूच्या परिसराचाही विकास सहज साध्य होता. मागील काही काळात परकीय आक्रमणे आणि इंग्रजांचे भारतीय संस्कृती नष्ट करण्याचे धोरण, यामुळे त्यात खंड पडला होता. राम मंदिर उभारणीमुळे या संकल्पनेला पुन्हा ऊर्जा प्राप्त करून दिली आहे.
राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे राजकीय परिणाम
‘राम मंदिर आंदोलन’ हे हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून लढले गेले, राजकीय सत्ताप्राप्तीसाठी नाही. परंतु, हिंदू समाज जागृत झाल्याचा राजकीय पटलावरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. जेव्हा पहिली कारसेवा झाली, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये हिंदू वारसा सांगणार्या भाजपचे सरकार आले. बाबरी पतनानंतर मात्र, आश्चर्यकारकरित्या तिथले भाजप सरकार पडले. मात्र, त्यानंतरच्या काळात रस्त्यावरील आंदोलनाची जागा न्यायालयीन लढ्याने घेतली. त्यानंतर जवळपास २५ वर्षांनंतर, सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर मुक्तीचा निर्णय दिला. हिंदू समाजाने याचे जल्लोषात स्वागत केले. मंदिर उभारणीसाठीही हिंदू समाजाने भरभरून साहाय्य केल्याचे दिसते. त्यासाठी लाखो कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क केला. यामुळे स्वाभाविकच हिंदू समाजात, एकत्वाची भावना पुन्हा जागृत व्हायला मदत झाली. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत, या सारख्या राज्यात हिंदू उदासीन राहिला. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्षांच्या जागा मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसले. मात्र, आपली चूक लक्षात आल्यावर, महाराष्ट्रात आणि हरियाणात हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्याचे दिसत आहे. देशात सर्वत्र हिंदू मतांचे ध्रुवीकरण सुरू झाल्याचे दिसत आहे.
राम मंदिर लढ्याच्या विजयाने जो आत्मविश्वास दिला, त्यातून धर्म आणि देश यांचा सकारात्मक विचार करणार्या हिंदूंची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे लक्षात येते. याचसोबत काँग्रेस आणि सेक्युलर पक्षांची उघड राष्ट्रविरोधी आणि हिंदू विरोधी भूमिका, यामुळेसुद्धा हिंदू समाज राजकीयदृष्ट्या सजग झाला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये जातीपातीच्या राजकारणणाविरोधात, हिंदू समाजाने एकत्वाची भावना दाखवून दिली. ही राजकीय हिंदू जागृतीची सुरुवात आहे. अजूनही बराच मोठा समाज जागृत करण्यासाठी, प्रयत्नांची आवश्यकता आहे.
राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम
आतापर्यंत भारत हे एक कमकुवत समाजाचे राष्ट्र म्हणून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा. त्यामुळे कुणीही या आणि टपली मारून जा अशी धारणा. काहीही झाले तरी अपमान सहन करत राहायचा हेच धोरण. मात्र, राममंदिर मुक्ती लढ्याने आणि विजयाने, जगभरात भारताची ओळख पूर्ण बदलून गेली. आपल्या श्रद्धास्थानासाठी ५०० वर्षे लढा देऊन, त्यात यश मिळवणारा समाज अशी जगभर ख्याती पसरली. जगभरात कदाचित असे उदाहरण नाही. जगभरात सध्या मुस्लीम समाजाच्या समस्यांचा अनुभव सर्वजण घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, हिंदूंनी केलेला संघर्ष आणि त्यात मिळवलेले यश, याचे सर्वांना जणू अप्रूप वाटले असावे. जगभरातील अनेक राष्ट्र प्रमुखांनी, राम मंदिराला शुभेच्छा दिल्या आणि हिंदू समाजाचे अभिनंदन केले. अगदी सौदी अरब राष्ट्रात भव्य हिंदू मंदिरांचे निर्माण तेथील, शेख यांच्या उपस्थितीत होऊ लागले. अर्थात काही तथाकथित लिबरल माध्यमांनी टीका टिपण्णी सुरूच ठेवली आहे. कारण, हिंदू समाज एकत्रित होणे, त्यांना पाहवणारे नाही.
‘रामजन्मभूमी मुक्ती लढा’ आणि प्रत्यक्ष मंदिर निर्माण याचे सकारात्मक परिणाम, भारतीय संस्कृती, सामाजिक सद्भाव याचबरोबर आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. पू. सरसंघचालक म्हणूनच म्हणतात की, “भारताला राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाले. पण, खर्या अर्थाने स्वतंत्र, ज्याचे स्वरूप स्वसन्मान, स्वसंस्कृती, स्वधर्म यावर आधारित आहे. असे स्वातंत्र्य, राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे मिळाले. राम मंदिर उभारणीमुळे आत्मविस्मृत हिंदू समाज, जागृत होऊ लागला आहे. मात्र, अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. प्रभू श्रीराम यांचा आदर्श, नक्कीच याचे दिशादिग्दर्शन करेल यात शंका नाही.
अरविंद जोशी