महाकवी कालीदासांचे अभिज्ञान शाकुंतलात एक श्लोक आहे, ‘आयुष्मन एष खलु हेमकूटी नाम किंपुरुष पर्वतस्तपः संसिद्धिक्षेत्रम’, स्वामी विवेकानंदांबद्दल रामकृष्ण परमहंस असेच सांगत असत. स्वामी विवेकानंद नारायणाचा अवतार आहेत, असे त्यांचे अनुभव मत होते. महाभारतातील द्रोणपर्वात एक कथा आली आहे. त्यात योगमार्गांतील गूढ अनुभवांचे निवेदन कथारुपाने आले. द्रोणपर्वांतील अध्याय 52 ते 55 पर्यंतच्या मृत्यू आख्यानात ती आली आहे. कथेतील नावेसुद्धा त्या अतिसूक्ष्म आणि दिव्य अवस्थांची बिनचूक वर्णने करणारी आहेत. प्रकृतीची मूलावस्था स्पंदनरहित आहे. त्यात स्पंदन उत्पन्न होऊन सर्व प्रकृतीचा संसार विस्तारतो.
कथा अशी
सत्ययुगात अकंपन (स्पंदनरहित) नावाचा राजा होता. त्याला हरी नावाचा मुलगा झाला. याचा अर्थ मूल निःस्पंदावस्थेला चल लागून त्यापोटी हरी म्हणजे, गती उत्पन्न झाली. जेथे गती आहे, तेथे ती पुन्हा निःस्पंद अवस्थेत जाणारच. म्हणून, अकंपन पुत्र हरीला मरण आले. राजा अकंपन पुत्रशोक करीत बसला. देवर्षी नारद अकंपनाचे खालीलप्रमाणे सांत्वन करतात,
एषा मृत्यूदैवदिष्टा प्रजानाम्। प्राप्ते काले संहरंती यथावत् ॥ स्वयंकृत्या प्राणहरा प्रजानाम् । आत्मानं वै प्राणिनो ध्वन्ति सर्वे ॥
नैतात् मृत्यूर्दण्डपाणिर्हिनास्तिं । तस्मान्मृतान् नानुशोचन्ति धीरा॥ मृत्युं ज्ञात्वा निश्चयं ब्रह्मसृष्टम् ॥ म.भा. द्रोणपर्व 54/49-50॥
अर्थ सुरेख आहे. ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू लागलाच. ब्रह्म प्रजा उत्पन्न करतो, एवं स्वतःच त्यांचा नाश करतो. मृत्यु हा निश्चयाने ब्रह्माने उत्पन्न केला असल्यामुळे, धीरपुरुषाने शोक करू नये. ब्रह्म प्राण्यांच्या रूपाने स्वतःचाच विध्वंस करतो. यातील अकंपन राजा म्हणजे, प्रकृतीची मूल अवस्थाच होय. त्यालाच थोड्याफार फरकाने महाकारणदेह म्हणता येईल. या महाकारण देहाला संकल्प कारणाचा स्पर्श वा संस्कार झाला की, कारणदेहावस्था उत्पन्न होत असते. तेथून जीव जड जगतात, जन्म घेऊ शकतात. या अतिश्रेष्ठ अवस्थेत गेलेला जीवात्मा साधारणतः अकंपन म्हणजे, जन्म घेत नाही. परंतु, नियतीच्या क्रमाला धरुन काही जीवांना येथूनही, जड जगतात येऊन जन्म घ्यावा लागतो आणि समाजाचे कार्य करावे लागते. म्हणूनच गुरू गोविंदसिंग म्हणतात, तप साधत हरी मोही बुलायो। इम कहि कै इहलोक पठायो। स्वामी विवेकानंद, गुरूजी गोळवलकरांना असेच यावे लागले.
महाकारण देह अवस्था
संकल्पाच्याही वर अशी केवळ स्वतःच्याच स्थानी स्पंदन करून, स्वस्थ असलेली अशी महाकारण अवस्था आहे. या अवस्थेतील व्यक्ती स्वतःत पूर्णपणे रममाण असून, ती आत्मरूपाने असते. संस्कारांचा परिणाम झाल्याबरोबर या आत्मरूपाला, जीवात्मा दशा प्राप्त होते. म्हणजे महाकारण देहातून कारणदेह उत्पन्न होतो. नासदीय सुक्तात या स्वयंधन्य आत्मावस्थेचे सुंदर वर्णन आहे, ‘आनिदवातं स्वधया तदैकं’ म्हणजे, ते आपल्यातच स्फुरण पावत होते. शब्दापलीकडील वर्णन, शब्दात अंकित करण्याचा ऋषींनी प्रयत्न केला आहे. या महान अवस्थेचे वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात, ‘अवघे विश्वचि माझें घर। एैसी जयाची मति स्थिर। किंबहुना चराचर। आपणची जाहला ॥’ ही केवळ अवस्था आहे. मुक्ती मिळण्याकरिता, याही स्वयंस्पंदनात्मक केवल अवस्थेचा त्याग करावा लागतो. मगच शून्यत्व लाभते. त्या शून्य अवस्थेतून मग परत येणे नाही. गीता सांगते, ‘यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमंमम’.संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे नये परते । तुझ्या दर्शने मागुते ॥ परंतु असली अवस्थारहित अवस्था, फार थोड्यांना प्राप्त होते. बरेच जीवात्मे कारणदेहापर्यंत येऊन सूक्ष्म गहन कारणास्तव, पुनः केव्हातरी जड जगतात जन्म घेतात. त्या अवस्थेचेही वर्णन गीतेने केले आहे.
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ 8, अ. 9 ॥
या प्रकारच्या सूक्ष्म सूक्ष्मतर देहावस्थेचे अनुभव, अतिशय दिव्य आणि आनंददायक असतात. परंतु, वरिष्ठ आनंद खालील अवस्थेचा म्हणजेच देहांचा मृत्यू झाल्याशिवाय येत नाही. यातील मृत्यू याचा अर्थ मायातीत होणे असा आहे. खर्या अर्थाने चारी देहांना मरण आल्यास, तो जीवात्मा आत्मदशेत जाऊन परमात्मस्वरूप बनतो. म्हणजे तो मृत्यूच्याही वर जाऊन, स्वतः परमात्मा बनतो. काही तार्किक मुक्ती नावाची अवस्थाच नाही, असे प्रतिपादन करतात. ते म्हणतात, कल्पांतरानंतर जर जीवात्म्याला परमेश्वरासह परत सृष्टीक्रमाद्वारे जन्म घ्यावा लागत असेल, तर मग जीवात्म्याला मुक्तीच कशी? परंतु, हा केवळ तर्कवाद आहे. समजा मुंबईच्या सागरात एखाद्याने एक घागर पाणी ओतले. काही कालानंतर त्याचे त्याच सागरातून पुनः एक घागर पाणी काढले, तर त्याला त्याने ओतलेले पूर्वीचे पाणी मिळेल काय? जीवात्मा परमात्मा स्वरूप झाल्यावर, त्याच जीवात्म्याला पुनर्जन्म कसा? तार्किक तर्क करीत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करून स्वतः अनुभव घ्यावेत म्हणजे, त्यांना सत्य कळेल. केवळ तार्किकवादात काय ठेवले आहे.
वास्तविक प्रत्येक जीव, वैज्ञानिकदृष्ट्या प्रकृतीतील प्रत्येक अवस्थेशी संलग्न असतो. पण, असे असतानाही, जीवात्म्याला इतर जीवात्म्यांच्या मृत्यूची जाणीव होत नसते. याचे कारण त्याच्या स्वतःचे शरीराबद्दलची माया विस्तारित नसते. ती विस्तारित असलेल्या योग्याला इतर प्राण्यांचे मृत्यूमुळे अनंत वेदना होत राहतील. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. पण, अशी माया वाढविल्याने कोणताच लाभ नाही. त्यामुळे ती माया कमी करत स्वतःच्या देहासकट शून्य करावी लागते. देहधर्मांच्या तो वर असतो. त्यामुळे जिवंतपणी वा मृत्यूनंतर तो मुक्तच असतो.
अशातर्हेने प्रत्येक देहस्तरावर जे अनुभवानंद येतात, ते अती आनंदमय आणि विलक्षण असतात. नचिकेतसाप्रमाणे, मृत्यूवर विजय प्राप्त करून त्यापलीकडील दिव्य अनुभव घेणारा व आनंदाच्या दिव्य, अतिदिव्य अवस्था अनुभवणारा साधकच मृत्युंजय असतो. जडजीवनातील कोणत्याही परावलंबी एवं भंगूर आनंदापेक्षा, वरील आनंदानुभव दिव्य असतात. येथील जीवन दिव्य, विशाल एवं आनंदमय असते. परंतु, त्याकरिता अधिकाधिक कष्ट उपसावे लागतात आणि सतत चिकाटीने दिव्यतर अनुभव घ्यावे लागतात. ज्यांची इच्छा असेल, त्यांना त्या मार्गातील योग्य गुरू मिळतात व त्यांची प्रगती होत असते. गुरूकृपा त्याकरिता अतिशय आवश्यक असते. असल्या गुरूकृपेचे वर्णन संत वारंवार करतात. ‘सद्गुरूवाचूनी सापडेना सोय’।
योगिराज हरकरे