आत्मज्ञान आणि ब्रह्मानुभूतीसाठी सत्संगती करावी, हे आतापर्यंतच्या श्लोकांतून स्वामींनी स्पष्ट केले आहे. रोजच्या व्यवहारात आचरण सुधारण्यासाठी, सत्संगतीचे महत्त्व आपण मान्य करतो. प्रपंचापेक्षा परमार्थ क्षेत्रातील साध्य अतिसूक्ष्म वृत्तींशी जोडले गेले असल्याने, तेथे तर सत्संगतीला विशेष महत्त्व प्राप्त होते. मनाच्या श्लोकांतील या पुढील सर्व श्लोकांना, कै. ल. रा. पांगारकर यांनी ‘सगुण निर्गुणातील शुद्ध स्वरुपाचे वर्णन’ असे नाव दिले आहे. तर आचार्य विनोबा भावे यांनी त्या श्लोकांना, ‘गुरुकृपालब्धी’ म्हटले आहे. शंकरराव देव यांच्या मते हे सर्व श्लोक ‘ज्ञानपर’ आहेत.
मनाच्या श्लोकांतील पुुढील श्लोक असा आहे.
देहबुधि हे ज्ञानबोधें तजावी ।
विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी ॥
तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें।
म्हणोनी सदा तें
चि शोधीत जावें॥170॥
जन्मापासून आपला आपल्या देहाशी कायमचा संबंध आल्याने, मी देहच अशी ठाम कल्पना होणे स्वाभाविक म्हणता येईल. देह म्हणजेच मी, या समजुतीला देहबुद्धी असे म्हणतात. देहाच्या पलीकडे ‘मी’ला अस्तित्व नाही, असे देहबुद्धी मानते. याउलट मी देह नसून, माझे खरे अस्तित्व चिरंतन आत्मा आहे, असे समजणे याला आत्मबुद्धी म्हणतात. परमार्थात चिरंतन म्हणजेच शाश्वत आत्म्याच्या अस्तित्वाची जाणीव, याला ज्ञान म्हटले आहे. अर्थातच अज्ञानातून देहबुद्धी तयार होते हे उघड आहे. हे अज्ञान दूर सारल्याशिवाय सत्याचे, सद्वस्तूचे दर्शन होणार नाही. त्यासाठी काय करावे, हे समर्थ येथे सांगत आहेत. यापूर्वीही स्वामी श्लोक क्रमांक 163 मध्ये म्हणाले होते की, ‘देहबुधि ते आत्मबुधि करावी’. आता देहबुद्धी कशी नाहीशी करता येईल हे सांगताना स्वामी म्हणतात की, ज्ञानाची उपासना केल्याशिवाय देहबुद्धी जाणार नाही. देहबुद्धी कमी करण्यासाठी सर्वप्रथम, ‘मी देह आहे’ ही भावना सोडून द्यावी आणि चिरंतन आत्म्याचा विचार करावा. आत्म्याच्या प्रेरणेवर देहाचे अस्तित्त्व टिकून आहे. म्हणजेच, या देहाला कायम स्वरुपी अस्तित्व नाही. देह त्रिगुणांनी तयार झाला असल्याने, आज ना उद्या त्याचे विघटन अटळ आहे. तेव्हा विवेकाने खर्या ‘मी’चा शोध घ्यावा.त्यातच मानवी जीवनाचे खरे हित आहे.
तथापि, मन वर्षानुवर्ष देहाची संगत करीत आल्याने ते सहजासहजी देहाचा विचार सोडून देऊ शकत नाही आणि आत्म्याशी एकरुप होऊ शकत नाही. मनाने इंद्रियाद्वारा मिळणारे ज्ञान सत्य मानले असल्याने, आत्मा ही केवळ कल्पना आहे असे मनाला वाटते. इंद्रियज्ञानाने मन देहाला ओळखते. आत्म्याचा संबंध अतींद्रिय ज्ञानाशी असल्याने, त्याची ओळख व्हायला वेळ लागतो. यावर उपाय म्हणून स्वामी सांगतात की, सारासार विवेक बोधाच्या ज्ञानाने म्हणजे ज्ञानबोधाने, देहबुद्धी ओळखून तिचा त्याग करावा. ज्ञानाने देहबुद्धीचे मिथ्यात्व समजून येते. तसेच, ज्ञानाने आत्मबुद्धीची ओळख करुन घ्यावी. परंतु, मन आत्म्याशी तदाकार होत नाही. असे असले तरी आपण सतत आत्मबुद्धीचा शोध घेत राहिल्याने, आणि त्यावर चिंतन केल्याने देहबुद्धी हळूहळू कमी होऊ लागते. क्षीण होऊ लागते. देहबुद्धी मावळल्यावर आत्मबुद्धीचा, आत्मज्ञानाचा उदय होतो. माणसाचे जीवनच बदलून जाते. आत्मज्ञानाने परमात्मस्वरुप समजू लागते. आत्मसाक्षात्काराची वेळ अजून दूर आहे. खरोखरचे मूल-परमात्मतत्त्व प्रकटपणे अनुभवायचे ते कसे, हे स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
असे सार साचार तें चोरलेंसे ।
येहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे ।
निराभास निर्गुण ते आकळेना अहंतागुणे कल्पितां
ही कळेना ॥171॥
तसे पाहिले तर परब्रह्म हे गुप्त आहे, असे म्हणावे लागते. सर्वांचे सार असलेले परब्रह्म अर्थात परमात्मस्वरुप हे चोरले गेले आहे, असे स्वामी म्हणतात. चोरी गेलेली वस्तू आपल्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, म्हणजेच ती अदृश्य आहे, गुप्त आहे असे स्वामींना म्हणायचे आहे. चोरलेले दिसत नसले, तरी त्याचे अस्तित्व असते. आपली मानसिकता अशी असते की, जे डोळ्यांना दिसते ते सत्य. त्यामुळे ‘देव आहे ना, मग तो दाखवा’ असे म्हणणारी माणसे, अज्ञानी असतात. डोळ्यांनी जे दिसते ते मूळ स्वरुप असत नाही, तर त्याचे बाह्यांग दिसते. देहांहकार असणार्या माणसाने कितीही कल्पना केल्या, तरी त्याला सद्वस्तुचा बोध होणार नाही. कारण, सद्वस्तू निराभास त्रिगुणातीत आहे, इंद्रियांनी वस्तू पाहाणे हे मर्यादित असते. त्यामुळे अमर्याद अनंत निर्गुण निराभास परमात्मतत्त्व, इंद्रियांद्वारा ओळखता येत नाही. ते जाणण्यासाठी अतींद्रिय अनुभूतीची गरज असते. विश्वातील अनेक दृश्य वस्तू डोळ्यांनी पाहून, मन कल्पनेचे राज्य निर्माण करते. त्याला अज्ञान असे म्हटले जाते. तथापि, आत्मवस्तूला समोर ठेवून जी कल्पना केली जाते, त्याला ज्ञानाचे लक्षण समजतात. कारण, ते आपल्याला अतींद्रिय ज्ञानापर्यंत घेऊन जाण्याची शक्यता आहे. अहंतागुण असलेल्या मनाला, या ज्ञानकल्पनेचे महत्त्व समजणार नाही. याचा अधिक उलगडा स्वामींनी पुढील श्लोकांत केला आहे.
स्फुरे वीषयीं कल्पना ते अविद्या ।
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या।
मुळी कल्पना दों रुपें ते चि जाली।
विवेके तरी सस्वरुपीं मिळाली॥172॥
ब्रह्मवस्तू जाणण्यासाठी कल्पनाशक्तीचा उपयोग करुन घेता येतो. या जगात वावरताना दिसणार्या दृश्यवस्तू खर्या आहेत असा समज करुन घेऊन, त्याविषयी कल्पना करणे आणि ती दृश्यवस्तू सर्व बाजूंनी जाणण्याचा प्रयत्न करणे, याला शास्त्रीय भाषेत अविद्या म्हटले आहे. कारण, डोळ्यांनी दिसणारी दृश्यवस्तू विघटनशील असल्याने, तिला खर्या अर्थाने अस्तित्व नाही. म्हणून त्याविषयीची कल्पना अविद्या गटात मोडते. आता हीच कल्पनाशक्ती जेव्हा आत्मस्वरुप खरे आहे, हे मान्य करुन आपले कार्य करु लागते, तेव्हा ती डोळ्यांनी दिसणार्या ऐहिक दृश्यवस्तूंकडून माघारी फिरते व सद्वस्तूंचा विचार करु लागते. तेव्हा तिला विद्या म्हणून संबोधले जाते. याला समर्थ ‘कल्पना दों रुपे तेचि जाली’ असे म्हणतात. विवेकाच्या साहाय्याने आपल्या ठायी असलेल्या कल्पनाशक्तीला योग्य दिशेने वळवून, आत्मज्ञानाचे अतींद्रिय क्षेत्र पाहता येते, अनुभवता येते. ही जाणीव ठेवून आपण खर्या अर्थाने त्यात समाविष्ट होऊन जावे. यातच मानवी जीवनाचे हित आहे. असे असले तरी, कल्पनेने आत्मज्ञान जाणताना स्वरुपात अहंकार उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्या विषयी स्वामी पुढील श्लोकांत विचार मांडत आहेत.
सुरेश जाखडी