'गोराई कांदळवन पार्क'चे होणार लोकार्पण; बोर्डवाॅक, ६० फूटी पक्षी निरीक्षण मनोरा आणि....
Total Views | 303
छाया - आर्य पाटील
मुंबई (अक्षय मांडवकर) - गोराई खाडीत बांधण्यात आलेले गोराई कांदळवन पार्कचे लोकार्पण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे (Gorai Mangrove Park). पार्कच्या निर्मितीची कामे अंतिम टप्प्यात आली असून या पार्कचे लोकार्पण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी करण्याचा प्रयत्न 'कांदळवन कक्षा'चा आहे (Gorai Mangrove Park). साधारण आठ हजार हेक्टर क्षेत्रावर पसरलेले हे भारतामधील पहिले कांदळवन पार्क आहे. (Gorai Mangrove Park)
कांदळवन आणि किनारी परिसंस्थेतील जैवविविधतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने गोराई खाडीत कांदळवन पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत साधारण ३० कोटी रुपये खुर्चुन या पार्कची निर्मिती सुरू आहे. वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये १ हजार ६०० चौ.किमी क्षेत्रामध्ये 'नेचर इंटरप्रिटेशन सेंटर'ची दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. 'महाराष्ट्र सागरी किनारा विकास प्राधिकरणा'च्या नियमांच्या अधिन राहून कमीत कमी सिमेंटचा वापर करुन ही इमारत तयार करण्यात आली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर निसर्गपूरक भेटवस्तू केंद्र, पहिल्या मजल्यावर कार्यशाळा कक्ष आणि ग्रंथालय, दुसऱ्या मजल्यावर आॅडियो व्हुजुअल कक्ष आणि माहिती केंद्र असणार आहे. तर इमारतीच्या गच्चीवर उपहारगृह असणार आहे. गच्चीवर सोलर यंत्रणा बसविण्यात आली आहे. इमारतीची ८० टक्के विजेची गरज या सोलर यंत्रणेमुळे पूर्ण होणार आहे.
'नेचर इंटरप्रिटेशन सेंटर'शिवाय ७४० मीटरचा बोर्डवाॅक तयार करण्यात आला आहे. लाकडाचा वापर करुन कांदळवनामधून तयार करण्यात आलेल्या या बोर्डवाॅकमधून पर्यटकांना कांदळवनाची परिसंस्था जवळून पाहण्याचा अनुभव मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे एकाही कांदळवनाच्या झाडाची तोड न करता हा बोर्डवाॅक तयार करण्यात आला आहे. या बोर्डवाॅकवर विविध ठिकाणी बैठक व्यवस्था तयार करण्यात आली आहे. बोर्डवाॅकच्या एका वाटेच्या अंतावर खाडीचे दर्शन घडवणारा सज्जा तयार करण्यात आला आहे. तर दुसऱ्या अंतावर १८ मीटर उंच पक्षी निरीक्षण बुरुज बांधण्यात आला आहे. या बुरुजावरुन गोराई खाडीत पसरलेल्या कांदळवनाचे दर्शन तर होणारच आहे, शिवाय वेगवेगळ्या पक्ष्यांचे देखील निरिक्षण करता येणार आहे.
गोराई कांदळवन पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्कचे लोकार्पण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. - एस.व्ही.रामाराव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष
https://www.mahamtb.com/authors/Akshay_Mandavkar.html
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.