केईएम एक हे कुटुंब! रुग्णालयात आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करण्याच्या सूचना
22-Jan-2025
Total Views | 55
मुंबई : केईएममध्ये येणाऱ्या रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी रुग्णालयात आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, २१ जानेवारी रोजी दिले. केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात ते बोलत होते.
सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या ९९ वा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, सुनील शिंदे, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "केईएम रुग्णालय हे रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. केईएमने घेतलेले रुग्णसेवेचे व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. ते आहेत म्हणून सामान्य मुंबईकर आज जगतो आहे. घरातल्या आधारवडासारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल आपल्याला आदरभाव असतो, आपुलकी असते. तशीच भावना केईएमबद्दल आहे. आज केईएम रुग्णालय हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. केईएम हे कुटुंब आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि आंतरराष्ट्रीय मानके केईएमने स्थापित केली आहेत," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "केईएम सारखी रुग्णालये ही सर्वसमान्यांसाठी देवदूतासारखी आहेत. या रुग्णालयात झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी. केईएममध्ये येणाऱ्या रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी शताब्दी महोत्सवी वर्षात आयुष्मान टॉवर उभे करावे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांची परवड होवू नये यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याठिकाणी डॉक्टरांचे म्युझियम करण्यात यावे," अशा सूचना त्यांनी दिल्या.