भारतीय वाहन उद्योग तंत्रज्ञानात क्रांतिकारी बदल घडवत आहे. ग्राहककेंद्री बदलामुळे ग्राहकांकडूनही या बदलांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय तंत्रज्ञान आणि वाहने यांची मागणी वाढताना दिसते. या जगभरातील ग्राहकांना भूरळ पाडण्याचे काम ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’ करत आहे.
जागतिक महामारीचे संकट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’साठी देशवासीयांना साद घातली. संपूर्ण देशाने यात सहभागी होत, आपापल्या दृष्टीने खारीचा वाटा उचलला. परंतु, याचे खरे प्रदर्शन घडले ते म्हणजे नवी दिल्लीत सुरू असलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’मध्ये. परिणामी उद्याच्या वाहन उद्योग क्षेत्राचे भविष्य भारत असेल आणि जगातील गरज ओळखून उत्पादन करेल, असा विश्वास आहे.
पहिल्या सीएनजी स्कुटीपासून ते अवाढव्य अशा औद्योगिक वाहनांपर्यंत प्रत्येक वाहनांसाठी, एकाच छताखाली आणणार्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’चे आयोजन राजधानी दिल्लीत करण्यात आले. प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स या सर्वांसाठीच या एक्स्पोची द्वारे खुली करण्यात आल्यानंतर, प्रदर्शनाच्या शुभारंभाच्या अवघ्या काही कालावधीतच इथल्या उत्पादनांची चर्चा जगभरात होऊ लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना, भारताला वाहन उद्योग क्षेत्रात असलेल्या संधी अधोरेखित केल्या. दहा वर्षांपूर्वी केवळ २ हजार, ६०० पर्यंत असणार्या ई-वाहनांची विक्री, २०२४ सालापर्यंत १६.८० लाखांवर पोहोचली आहे.
फक्त दुचाकी किंवा चारचाकीच नव्हे, तर या उद्योगाशी निगडित प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करणार्या या प्रदर्शनामुळे, गुंतवणूकदार आणि या क्षेत्रातील संबंधित भागीदारांचा उत्साह द्विगुणित होणारा आहे. या संपूर्ण प्रदर्शनात, शंभरहून अधिक नव्या उत्पादनांचे अनावरण करण्यात आले आहे. एव्हाना इथल्या प्रत्येक उत्पादनाला, सोशल मीडियाचा मंच मिळाला आहे. त्याबद्दलची उत्सुकता ग्राहकवर्गात आधीच ताणली गेली आहे. उदा. टाटाची ‘सिएरा’ असो वा ह्युदाईची ‘क्रेटा इलेक्ट्रिक’, टीव्हीएसची ‘ज्युपीटर सीएनजी’ या कंपन्यांनी स्वीकारलेल्या या नव्या बदलांची ग्राहकांना भूरळ पडेल, यात शंका नाही. मारुती सुझुकीही यात मागे नाही. याच प्रदर्शनात मारुती सुझुकीने, ‘ई-विटारा’ ही कार ग्राहकांसाठी प्रदर्शनात उपलब्ध केली होती. पर्यायी इंधनासाठी चर्चेचा पाया गेल्या काही वर्षांत रचण्यात आला, तो यंदाच्या २०२५ या वर्षासाठी. हे वर्ष पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि पर्यायी इंधनाच्या वाहनांचे असणार आहे असा विश्वास, या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतो.
अर्थव्यवस्थेने कोरोनानंतर झटकलेली मरगळ आणि देशातील स्थिर सरकार, याला आणखी मूर्त रूप देईल. या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’मध्ये, ,सहभागी कंपन्यांनी औद्योगिक वाहनांमध्येही इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मारूती सुझुकी सारख्या कंपनीने, सुमारे शंभर शहारांमध्ये ‘सर्व्हिसेस सेंटर’ देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ई-वाहन कंपन्यांना लागणार्या चार्जिंग स्टेशन्ससाठी लागणार्या पायाभूत सुविधांची उभारणीही त्याचवेळी केली जाणार आहे. याच सोबत, जगभरातील प्रत्येक बाजारपेठेत पोहोचण्याचे लक्ष्य भारतीय कंपन्यांनी ठेवले आहे. २०२४ वर्षात एकूण २.५५ कोटी वाहनांची विक्री झाली. यंदा हे लक्ष्य १२ टक्क्यांनी वाढून, आता ‘मेक इन इंडिया’ ते ‘मेक फॉर वर्ल्ड’पर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
मध्यमवर्गीयांची वाढती संख्या, शहरीकरण, वाहन क्षेत्राला दिले जाणारे प्रोत्साहन आणि या सगळ्याला पुढे नेणारे नेतृत्व याला पूरक ठरणार आहे.
इलेक्ट्रोनिक वाहन क्षेत्रासाठी, वाहन कंपन्या अद्याप निमशहरी आणि ग्रामीण भागांची चाचपणीच करताना दिसत आहेत. महिंद्रा कंपनीच्या ‘बीई ६ ई’ आणि ‘एक्सईव्ही ९ई’बद्दलही असाच आणखी एक प्रयोग झाला होता. कंपनीने लॉन्च केल्यानंतर, सोशल मीडियावर या दोन्ही वाहनांच्या ‘रिल्स’ प्रचंड व्हायरल झाल्या. कंपनीने वाहनांचे अनावरण करताना, वाहनांच्या ‘गतीशक्ती’चा अनोखा थरार कॅमेर्यात कैद करण्यात आला. ‘टेस्ला’सारख्या स्वप्नवत दिसणार्या वाहनाला, भारतीय कंपनी पर्याय उपलब्ध करुन देते आणि भारतीयांची गरज समजून घेऊ शकते, ही संकल्पना प्रचंड लोकप्रिय ठरली. परिणामी आता भारतातील तेजपूर, कोटा, गुलबर्गासारख्या शहरांमध्येही या वाहनांची मागणी होऊ लागली. याचे आश्चर्य स्वतः कंपनीलाही आहे. अर्थात संपूर्ण भारताचा विचार केला असता, या तुलनेतील कित्येक शहरांमध्ये व्यवसाय विस्ताराला वेग आहे, हे लक्षात येऊ शकेल.
पेट्रोल, डिझेल वाहनांना पर्याय उपलब्ध करू इच्छिणारा मोठा वर्गही, याला कारणीभूत आहे. नव्या तंत्रज्ञानाची जोड असल्याने, ई-वाहनांकडे वळताना ग्राहक मागेपुढे पाहाणार नाही, याची खात्री कंपन्यांनाही आहे. जसजसा हा कल वाढत चालला आहे, चार्जिंग आता ग्राहकांना समस्या वाटत नाही. भारतात आजही काही ठिकाणी, २०० ते ३०० किमी अंतर दररोज कापणार्यांची संख्या जास्त आहे. बदलती जीवनशैली, आरामदायी प्रवास, असे अनेक कंगोरे यासाठी कारणीभूत आहेत. ज्याप्रकारे पायाभूत सुविधांचा होणारा विकास, पारंपरिक उर्जेवरील वाहनांची वाढती विक्री शहराबाहेर उर्वरित महाराष्ट्रात आहे, तसाच हा ट्रेंड पुढील काळात इलेक्ट्रिक वाहनासंदर्भात बदलताना दिसेल, असा विश्वास कंपन्यांना वाटत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान ‘इ-ड्राईव्ह योजने’अंतर्गत, रस्त्यांच्या दुतर्फा चार्जिंग व्यवस्थेच्या निर्मितीवर दिला जाणारा भर, हा ‘ईव्ही’बद्दल ग्राहकांचा विश्वास व्यक्त करण्यास कारणीभूत आहे.
भारतीय ब्रॅण्डचे ‘गुडविल’ हे परदेशातील मागणीला कारणीभूत ठरणार आहे. सर्वच कंपन्यांचा, जागतिक बाजारपेठेकडे सकारात्मकदृष्ट्या पाहाण्याचा कल वाढू लागला. भारतीयांचा तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढता प्रभाव जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची, केंद्रातील सरकारची हातोटी पथ्थ्यावर पडू शकतो. वाहनांच्या सुट्या भागांसाठी आत्मनिर्भर पाऊल उचलण्याच्या दृष्टीने, सरकार प्रयत्नशील आहे. ज्या देशांच्या बाजारपेठा पारदर्शक नाहीत, त्यांच्यावर अवलंबून राहाण्यात अर्थ नाही, असे विधान नुकतेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी याच एक्स्पो दरम्यान केले. “सुट्या वाहनांच्या निर्मितीसाठी एकूण शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांचा रोडमॅप तयार करुन, भारताला २०३० सालापर्यंत या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करुन दाखविण्याची संधी आहे,” असेही ते म्हणाले. भविष्यात या क्षेत्रातही, तुल्यबळ स्पर्धा निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. कुठल्याही बाजारपेठेसाठी ही चांगली संधीच आहे. त्यामुळे ई-भरारीचा तो दिवस दूर नाही.