दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेपासून एकत्र असाणार्या ‘इंडी’ आघाडीतील बेबनाव समोर आला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये पुढे जाण्यास ‘इंडी’ आघाडीमधील इतर पक्ष तयार नाहीत. ‘आप’ने तर काँग्रेसशी उभा दावा मांडला आहे. त्यामुळे काँग्रेसला देखील मुस्लीम मतांवर डोळा ठेवत, त्यांची वेगळी चूल मांडावी लागली आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पण, या निवडणुकीत विरोधी पक्षांची ‘इंडी’ आघाडी, सक्रिय असल्याचे दिसत नाही. ‘इंडी’ आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने, दिल्लीची निवडणूक स्वबळावर लढण्याचे ठरविले असल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांचे नेतृत्व स्वीकारण्यास ‘इंडी’ आघाडीमधील समाजवादी पक्ष, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, हनुमान बेनिवाल यांचा राजस्थान राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष यांच्यासह अन्य काही घटक पक्षांनी विरोध केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षास पाठिंबा घोषित करून, आघाडीतील घटक पक्षांनी आपणास काँग्रेसचे नेतृत्व अमान्य असल्याचे दाखवून दिले आहे. ‘इंडी’ आघाडीतील कोणताच पक्ष काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेला नाही. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानेही काँग्रेसला पाठिंबा द्यायचा की नाही, याबद्दल मौन बाळगले आहे.
‘इंडी’ आघाडीचा एकंदरीत सूर लक्षात घेऊन, राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सीलमपूर मतदारसंघात जी निवडणूक प्रचारसभा घेतली त्या सभेद्वारे, आपण दिल्लीची निवडणूक स्वबळावर लढवत असल्याचे लक्षात आणून दिले. तसेच, ज्या सीलमपूर येथे ही सभा घेण्यात आली, तो सीलमपूर परिसर मुस्लीमबहुल आहे. मुस्लीम मतदारांना आपल्या बाजूला वळविण्याच्या हेतूनेच, काँग्रेसने त्या भागात सभा आयोजित केली होती हे स्पष्ट आहे. सीलमपूर विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदार ५० टक्क्यांहून जास्त आहेत. एवढे मुस्लीम मतदार, दिल्ली विधानसभेच्या अन्य कोणत्याच मतदारसंघात नाहीत. सीलमपूरनंतर मतिया महल मतदारसंघात, मुस्लीम मतदारांचे प्रमाण अधिक आहे. तेथे ४९ टक्के मुस्लीम मतदार आहेत. सीलमपूर मतदारसंघात आम आदमी पक्षातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या, अब्दुल रहमान यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसची अनामत रक्कमही जप्त झाली होती. पण, अब्दुल रहमान काँग्रेसकडून उभे असल्याने ही जागा आपल्या पदरात पडेल, असे काँग्रेसला वाटत आहे.
काँग्रेस पक्षाकडून विधानसभा प्रचारासाठी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना, उतरविले जाणार हे स्पष्ट आहे. काँग्रेस आपले लक्ष मुस्लीमबहुल मतदारसंघांवर केंद्रित करणार हे उघड आहे. बल्लीमारन, बाबरपूर, गोकुलपुरी, ओखला, सीलमपूर, मतिया महल, चांदणी चौक आणि मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघांवर, काँग्रेस विशेष लक्ष देण्याची चिन्हे आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत यंदा आपले खाते उघडले जाईल, असा विश्वास काँग्रेस पक्षाला वाटत आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुका आणि दोन विधानसभा निवडणुकांमध्ये, काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नव्हते. या निवडणुकीत आपली मतांची टक्केवारी वाढेल, अशी आशा काँग्रेसला वाटत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत, मुस्लीम इत्तेहादुल मुस्लिमन हा ओवेसी यांचा पक्षही उतरला आहे. या पक्षाने, २०२० सालच्या दिल्ली दंगलीतील आरोपी असलेल्या ताहीर हुसेन यास तिकीट दिले आहे. हा ताहीर हुसेन ‘आप’मध्ये होता तसेच, तो दिल्ली महानगरपालिकेचा माजी नगरसेवकही होता. आता त्याने आपल्या समर्थक आणि कुटुंबीयांसह ‘एमआयएम’मध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेस पक्ष आसाममध्ये, बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीर घुसखोरीस अनुमती देत आला होता. आपली मतपेढी भक्कम व्हावी या एकमात्र हेतूने, ही बेकायदेशीर घुसखोरी आसाममध्ये होत होती. आता दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष तेच तंत्र वापरात आहे. दिल्लीमध्ये असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना, बनावट आधार कार्ड, मतदार ओळखपत्रे दिली गेली असल्याचा आरोप ‘आप’ वर होत आहे. मुस्लीम कार्डचा वापर करून, निवडणुका जिंकणे हा हेतू त्यामागे असल्याचे चर्चिले जात आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करून दिल्लीमध्ये सत्तेवर आलेल्या, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आदी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आहेत. ‘आप’चे काही नेते तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. मुख्यमंत्री असताना केजरीवाल यांनी, आपल्या निवासस्थानावर केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या उधळणीचीही चर्चा होत आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागा असून, त्यातील १२ जागा राखीव आहेत. येत्या दि. ५ फेब्रुवारी रोजी तेथे मतदान होत आहे. दिल्लीमध्ये एकूण एक कोटी मतदार असून, त्यातील सुमारे एक लाख मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल (आप), परवेश वर्मा (भाजप) आणि संदीप दीक्षित (काँग्रेस) यांच्यात लढत होणार आहे. तर काल्काजी मतदारसंघात आतिशी (आप), रमेश बिधुरी (भाजप), अलका लांबा (काँग्रेस) यांच्यात लढत होत आहे. जंगपुरा मतदारसंघात मनीष सिसोदिया (आप), तरविंदरसिंह मारवाह (भाजप), फरहाद सुरी (काँग्रेस) यांच्यात लढत होत आहे. मालवीय नगरमध्ये सोमनाथ भारती (आप), सतीश उपाध्याय (भाजप) आणि जितेंद्र कुमार कोचर (काँग्रेस) यांच्यात लढत होत आहे. रोहिणी मतदारसंघात प्रदीप मित्तल (आप) विजेंदर गुप्ता (भाजप) आणि सुमेश गुप्ता (काँग्रेस) यांच्यात लढत होत आहे. तर प्रतापगंज मतदारसंघात अवध ओझा (आप), रविंदर सिंह नेगी (भाजप) आणि अनिल चौधरी (काँग्रेस) यांच्यात लढत होत आहे. पायाभूत सुविधांचा विकास, कायदा आणि व्यवस्था, आरोग्य व शिक्षण, गृह निर्माण व नगरविकास, भ्रष्टाचार आणि शासन, आर्थिक मुद्दे आणि नोकर्या आदी मुद्दे, या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
पण, प्रारंभी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसने मुस्लीम मतपेढीच्या बळावर एकट्याने निवडणूक लढण्याचे ठरविले आहे, तर अनेक गोष्टी दिल्लीकरांना मोफत दिल्याने मतदार आपल्यामागे उभा राहील असे ‘आप’ला वाटत आहे. पण, ‘आप’च्या नेत्यांनी केलेला भ्रष्टाचार, दंगलखोर नेत्यांना दिलेली साथ जनता विसरलेली नाही. ते सर्व लक्षात घेता, दिल्लीची जनता कोणाच्या पारड्यात आपले दान टाकेल हे येत्या दि. ८ फेब्रुवारी रोजी दिसून येईल.
हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट?
भारत आणि भारतातील हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट, अनेक दहशतवादी संघटनांकडून रचला जात असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः इस्लामी दहशतवादी गटांकडून ही योजना केली जात आहे. ‘इंडियन अमेरिकन मुस्लीम काऊन्सिल’, ‘खलिस्तान समर्थक दहशतवादी गट’, ‘दाऊद सिंडिकेट’ आणि ‘अल-इसाबाह मीडिया’ यांची नावे या संदर्भात घेतली जात असून, या गटांनी हिंदू नेत्यांची ‘हिटलिस्ट’ तयार केली असल्याचे चर्चिले जात आहे. ‘अल-इसबाह मीडिया’ ही संघटना, ‘अन्सार-उत ताव्हीद फिर बिलाद अल-हिंद’ या संघटनेची शाखा आहे. हा दहशतवादी गट इस्लामवादी असून, भारत आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्याची त्या गटाची योजना आहे. या गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्य वितरित केले जात आहे. तर ‘इंडियन अमेरिकन मुस्लीम काऊन्सिल’ ही संघटना, अनेक दहशतवादी गटांशी संबंधित आहे. या गटाने जी ‘हिटलिस्ट’ केली आहे, त्यामध्ये योगी आदित्यनाथ, हिमंत विश्व सरमा, जे. साई दीप, पुष्कर धामी आणि अन्य अनेक हिंदू नेत्यांचा समावेश आहे.
यासंदर्भात ‘खलिस्तान समर्थक गट’ आणि ‘डी गॅन्ग’ही सक्रिय आहे. ‘डी गॅन्ग’ने उत्तर प्रदेशातील हिंदू नेत्यांची यादी करण्यास, आपल्या हस्तकांना सांगितले आहे. ‘डी गॅन्ग’ने भाजप आणि विहिंप नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी, गुजरातमध्ये अशीच एक ‘हिटलिस्ट’ बनविली होती. खलिस्तान समर्थक दहशतवादीही यामध्ये मागे नाहीत. या गटाने पंजाबमध्ये आपल्या चळवळीस विरोध करणार्या, अनेक हिंदूंच्या हत्या केल्या होत्या. खलिस्तान समर्थक दहशतवादी पंजाबमध्ये डोके वर काढण्याचा प्रयत्न, पुन्हा करीत आहेत. या गटांचे कॅनडा आणि अमेरिकेतील नेते त्यांना मदत करीत आहेत. भारत आणि भारतातील हिंदू नेते यांना लक्ष्य करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवर किती दहशतवादी गट आणि संघटना सक्रिय आहेत, त्याची थोडीशी कल्पना यावरून यावी!