खोटारडेपणाचीही रेवडी!

    21-Jan-2025
Total Views | 73

Arvind Kejriwal

निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात करणे ही एक गोष्ट झाली. पण, खोटारडेपणा करणे, ही गंभीर बाब मानली पाहिजे. खोट्या आश्वासनांमुळे मतदारांची दिशाभूल केली जाऊ शकते. तीन वेळा सत्तेत आलेल्या केजरीवाल यांच्या खोट्या आश्वासनांना जनता आता विटली आहे. त्यातच दिल्लीत योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारामुळे आपला पराभव दिसू लागल्यामुळे हादरलेले, केजरीवाल आता भाजपवर खोटे आरोप करीत आहेत. आपल्यावर हल्ला झाल्याची खोटीच अफवा उठवून, ते सहानुभूती मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.
 
निवडणुकांच्या काळात आश्वासनांचा सुकाळ झालेला असतो. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी, बेछूट आश्वासने देत असतात. आम आदमी पक्षाने जनतेला फुकट गोष्टी मिळण्याची सवय लावल्याने, अन्य पक्षांनाही मतदारांसाठी काहीबाही फुकट देण्याची आश्वासने द्यावी लागत आहेत. मात्र जितक्या वेगाने, आम आदमी पक्ष ही आश्वासने देतो, तितक्याच वेगात तो ती पूर्ण करण्यासही विसरतो. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात, या नेत्याच्या पक्षांना मतदारांना तोंड देणे कठीण होत आहे. भाजप आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आम आदमी पक्षाचे हे पितळ उघडे पाडले असल्याने, केजरीवाल यांना आता निवडणुकीतील विजयासाठी मतदारांची सहानुभूती मिळविण्याची गरज भासत आहे. त्यासाठी त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर बेधडक खोटे आरोप करणे आणि मतदारांना वस्तू फुकट वाटून लालूच दाखविण्यास प्रारंभ केला आहे. केजरीवाल यांनी अनेक भागात सामान्यांना फुकट खुर्च्या वाटण्यास प्रारंभ केल्याचे, भाजपच्या नेत्यांनी साधार दाखवून दिले आहे. हा निवडणुकीच्या नियमांचा आणि आचारसंहितेचा भंग आहे.
 
दिल्लीत सलग तीनदा प्रचंड बहुमत मिळवूनही, दिल्लीकरांच्या जीवनात कोणताही भरीव परिणाम साधण्यात अपयशी ठरलेल्या अरविंद केजरीवाल यांना आता, आपला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. जनतेला आश्वासने देण्याचा उच्चांक केजरीवाल यांनी गाठला आहे. त्यापैकी बहुतांश आश्वासने त्यांना पूर्ण करता आलेली नाही. यमुना नदीचे पाणी शुद्ध करणे, दिल्लीतील जनतेला नळाने घरपोच पिण्याचे पाणी उपलब्ध करणे आणि दिल्लीचे रस्ते नीट करणे, यात आपण कमी पडल्याची स्पष्ट कबुली स्वत: केजरीवाल यांनीच दिली आहे. गेल्या निवडणुकीत केजरीवाल यांनी जाहीरपणे सांगितले होते की, येत्या पाच वर्षांत यमुनेचे पाणी शुद्ध करण्यात अपयश आले, तर मला मत देऊ नका. आता ही गोष्ट मतदारांनी मनावर घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या केजरीवाल यांनी, आता रडीचा डाव सुरू केला आहे. आपल्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची अफवा त्यांनी उठवून दिली आहे. या हल्ल्यामागे, भाजपचा हात असल्याचाही शोध त्यांनी लावला आहे. कसलीही चौकशी, तपास न करता, या कथित हल्ल्याचे सूत्रधार केजरीवाल यांना शोधून काढता येत असतील, तर त्यांनी राजकारण सोडून पोलीस खात्यात भरती झाले पाहिजे. निदान त्यामुळे खरे गुन्हेगार तरी लगेच पकडले जातील.
 
आश्वासनांची पूर्ती न करणे हा एक मुद्दा झाला. पण, केजरीवाल यांनी त्यावरही कडी केली आणि जनतेच्या पैशाचा चक्क अपहार केला. जनतेच्या पैशातून त्यांनी, स्वत:साठी एक आलीशान शीशमहाल बांधून घेतला. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या घरातही नसतील, अशा एकेक महागड्या वस्तूंनी त्यांनी हा शीशमहाल सजविला आहे. या महालातील एक एक पडदाच लाखो रुपये किंमतीचा आहे. स्वयंपाक घराला स्वयंचलित उघडमिट करणारा दरवाजा आहे. या महालातील शौचालयात लक्षावधी रुपयांची उपकरणे बसविली आहेत. यासारख्या आणखीही बर्‍याच सुरस आणि चमत्कारिक सुविधांच्या कथांनी, हे शीशमहाल प्रकरण जनतेत चघळले जात आहे. आपण दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून कधीही हटणार नाही, अशी केजरीवाल यांची गोड गैरसमजूत झाली असावी. त्यामुळे एखाद्या बादशहाच्या थाटात जीवन जगण्यासाठी, त्यांनी जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी केली आहे. याची त्यांनाही जाणीव आहे, म्हणूनच इतकी सार्वत्रिक टीका होऊनही आजपर्यंत त्यांनी या शीशमहालावर आपल्या तोंडातून एक चकार शब्दही काढलेला नाही. यावरून त्यांच्या मनातील अपराधी भाव सिद्ध होतात.
 
केवळ जनतेच्या पैशाची उधळपट्टीच नव्हे, तर मद्यविक्री धोरणात मनमानी बदल करून, त्यांनी कोट्यवधी रुपये आपल्या खिशात घातले आहेत. त्या संदर्भात त्यांच्यावर खटला भरण्यात आला असून, त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत, न्यायालयाने त्यांच्याबाबत अपवाद करून केवळ प्रचारासाठी त्यांना जामीन दिला. पण, या काळात त्यांना मुख्यमंत्री म्हणून कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास मज्जाव करण्यात आला होता. इतकी मानहानी आजवर लालू प्रसाद यादव यांचीही झालेली नाही. अर्थात त्यास केजरीवालच जबाबदार आहेत. या मद्यविक्री घोटाळ्यात त्यांच्यासह आम आदमी पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी असल्याने, या नेत्यांना आता सुरक्षित मतदारसंघांचा आश्रय घ्यावा लागत आहे.
 
पंजाबात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून, त्या राज्यात खलिस्तानी चळवळीला उत्तेजन मिळाल्याचे दिसते. आम आदमी पक्षाचे अनेक नेते हे उघडपणे, खलिस्तानची बाजू लावून धरताना दिसतात. केजरीवाल पंजाबात प्रचारासाठी जातात, तेव्हा खलिस्तान समर्थकांची भेटच घेतात असे नव्हे, तर ते त्यांचा पाहुणचारही स्वीकारतात. थोडक्यात, केजरीवाल आणि त्यांचा पक्ष, हा देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक बनला आहे. देशाच्या अन्य राज्यांतील देशविरोधी प्रवृत्तींशी, आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे जवळचे संबंध आहेत.
 
देशभरात काँग्रेसची पीछेहाट होत असून, ही मोकळी झालेली जागा व्यापण्याचा प्रयत्न आम आदमी पक्ष करीत आहे. मात्र, केजरीवाल यांना त्यासाठी आपला पक्ष दुसरा काँग्रेस करण्याची गरज नाही. दुर्दैवाने केजरीवाल काय किंवा त्यांच्या पक्षाचे अन्य नेते काय, ते काँग्रेसच्याच सर्व चुकांची पुनरावृत्ती करीत असून, काँग्रेसचे सर्व दुर्गुण त्यांनी आत्मसात केले आहेत. दडपून खोटे बोलणे, सत्तेचा दुरुपयोग करणे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून त्यातून स्वत:चे खिसे भरणे, समाजात फूट पाडणे, मतदारांना खोटी आश्वासने देणे यांसारख्या सर्व गोष्टी आम आदमी पक्षाचे नेते सर्रास करताना दिसतात. केजरीवाल हे अर्थातच या खोट्या गँगचे शिरोमणी आहेत. दिल्लीच्या मतदारांची गेली दहा वर्षे त्यांनी, भरपूर दिशाभूल केली. पण, दिल्लीच्या मूलभूत समस्या काही सुटलेल्या दिसत नाहीत. पंजाबसारख्या राज्यात मतदारांना अनेक वस्तू आणि सुविधा फुकट देण्याच्या आश्वासनांची पूर्तता करण्यात केजरीवाल यांना अपयश आले असले, तरी दिल्लीत त्यांनी पुन्हा एकदा फुकट गोष्टी देण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजे रेवडीच्या राजकारणात खोट्या आश्वासनांचाही त्यांनी समावेश केलेला दिसतो.


अग्रलेख
जरुर वाचा
IPL सामना अनपेक्षितपणे रद्द; प्रिटी झिंटाकडून चाहत्यांची माफी धर्मशाळा स्टेडियममध्ये काय घडलं?

IPL सामना अनपेक्षितपणे रद्द; प्रिटी झिंटाकडून चाहत्यांची माफी धर्मशाळा स्टेडियममध्ये काय घडलं?

हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील HPCA (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन) स्टेडियममध्ये गुरुवारी एक अनपेक्षित घटना घडली. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला IPL सामना अवघ्या 10.1 षटकांतच अचानक थांबवण्यात आला. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेले हजारो प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या सगळ्या परिस्थितीत अभिनेता आणि पंजाब किंग्जची सह-मालक प्रिटी झिंटा हिने मोठ्या संयमाने आणि जबाबदारीने परिस्थिती हाताळली. यानंतर तिने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून आपल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121