
नाशिक जिल्ह्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातून महायुतीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिल्यानंतर, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मविआची नौका किनार्याला लागण्यापूर्वीच बुडण्याच्या मार्गावर आहे. एक-एक करुन मविआतील तिन्ही घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत असून, उबाठा आणि काँग्रेसला चांगलीच गळती लागली आहे. ज्यांची पूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली, अशा उत्तम कांबळे यांचा मुलगा जॉय कांबळे यांनी नुकताच काँग्रेसचा ‘हात’ सोडत, हाती शिवबंधन बांधले. त्यांच्या पाठोपाठ ३० वर्षांपासून काँग्रेसचा नाशिकमध्ये एकहाती किल्ला लढवलेल्या, पक्ष प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटीलही काँग्रेस सोडण्यावर ठाम आहेत. त्यादृष्टीने त्यांनी एका पक्षाच्या पदाधिकार्यांची भेट घेत, पक्षप्रवेशासाठी कानोसा घेतला. नाशिक मध्यमधून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे उंबरठे झिजवले. मात्र, आश्वासनाखेरीज पदरी काहीच न पडलेल्या पाटील यांनी, नाशिक काँग्रेसमधील अंतर्गत लाथाड्यांना कंटाळून पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उबाठा गटाला धक्क्यावर धक्के देत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर उबाठा गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांनी, पक्षाची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यापूर्वी प्रभाग-२६ मधील माजी नगरसेवक भागवत आरोटे, माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता दोन दिवसांपूर्वी दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील उबाठा गटातील अनेक पदाधिकार्यांनी, धनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला. निफाड उबाठा गटाला खिंडार पाडत २१ पदाधिकार्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा निफाड पंचायत समिती माजी सभापती राजेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, किरण लभडे, सुजित मोरे, उबाठा तालुकाध्यक्ष सुधीर कराड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी, उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिली. निफाड पाठोपाठ दिंडोरी तालुक्यातील ३६ पदाधिकार्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात प्रवीण जाधव, नाना मोरे, रघुनाथ आहेर, अरुण कड, कैलास पगारे अशा प्रमुख पदाधिकार्यांचा समावेश आहे. घटकपक्षांना लागलेल्या गळतीवरून नाशिकमध्ये मविआ करपल्याचे दिसून येत आहे.
सिंहस्थापूर्वी टायरबेस मेट्रो
शहरात उड्डाणपुलासह ‘टायरबेस मेट्रो’ प्रकल्प सिंहस्थापूर्वी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ‘मेट्रो निओ’साठी ३१ किमी लांबीचे दोन एलिव्हेटेड मार्ग तयार केले जाणार आहेत. त्यासाठी दोन एलिव्हेटेड कॉरिडोर उभारले जातील. पहिला दहा किमी लांबीचा असून, त्यात गंगापूर, जलालपूर, गणपतनगर, काळेनगर, जेहान सर्कल, थत्तेनगर, शिवाजीनगर, पंचवटी, सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानके असतील. तर दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड असा २२ किमी लांबीचा असून, त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिकनगर, एमआयडीसी, मायको सर्कल, सीबीएस, सारडा कॉर्नर, द्वारका, गांधीनगर, नेहरूनगर, दत्तमंदिर, नाशिक रोड अशी स्थानके असतील. सीबीएस मध्यवर्ती स्थानक असणार असून, या ‘टायरबेस मेट्रो’साठी एकूण २९ स्थानके असणार आहेत. याशिवाय दोन फिडर कॉरिडोर असतील. त्यापैकी एक सातपूर कॉलनी, गरवारे, मुंबई नाका दरम्यान, तर दुसरा नाशिक रोड, नांदूर नाका, शिवाजीनगर दरम्यान चालेल. तत्पूर्वी २०१७ सालच्या मनपा निवडणुकांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, देशातील पहिला ‘टायरबेस एलिव्हेटेड मेट्रो निओ प्रकल्प’ नाशिकमध्ये राबविण्याची घोषणा केली. मात्र, उबाठा सरकारमुळे प्रकल्पाची गती मंदावली. त्यानंतर आता मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू झाला आहे. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय तसेच, संबंधित मंत्रालयाकडून प्रस्तावाचे मूल्यांकन केल्यानंतर सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडून, हा प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. सार्वजनिक गुंतवणूक मंडळांनी दि. २४ मार्च २०२१ रोजीच्या बैठकीत, या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेट सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडे प्रस्ताव गेला. अलीकडेच, या प्रस्तावाच्या फेरआढाव्यासाठी पंतप्रधान कार्यालय आवास व शहरी कार्य, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय रेल्वे बोर्ड, ‘महा मेट्रो’ आणि नाशिक मनपाच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक झाली. यात पंतप्रधान कार्यालयाने काही सूचना सुचवल्यामुळे, ‘महामेट्रो’द्वारे ‘नाशिक मेट्रो निओ प्रकल्पा’चा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला. मंत्री महाजन यांनी सांगिल्याप्रमाणे कुंभमेळ्यापूर्वी नाशिक शहरात ‘निओ मेट्रो’ धावणार हे नक्की.
विराम गांगुर्डे