मुंबई,दि.२१: प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर बसविण्याची कामे नियोजित असल्याने बुधवार दि.२२ ते २४ दरम्यान दुपारी १२ ते १ यावेळेत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्राफिक ब्लॉक घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)ने दिली आहे.
दरम्यान,एमएसआरडीसी ने दिलेल्या माहितीनुसार, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव / कुसगांव मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गडर्स बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात येणार आहे. बुधवार, दि.२२ जानेवारी ते दि.२४ जानेवारी दरम्यान दुपारी १२ ते १ या कालावधीमध्ये हे काम नियोजित आहे. हे काम करताना मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे मार्गावरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र.48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. तसेच, या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरु राहणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी १ वाजेनंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल.
हे पाहता, द्रुतगती मार्गावरील प्रवाशांनी नियोजन करावे व वरील तीन दिवस या कालावधीत द्रुतगती मार्गावरील पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा. या दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक- 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.