ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन

    21-Jan-2025
Total Views | 19

किसनमहाराज साखरे
 आळंदी : ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन झाले आहे. सोमवारी रात्री त्यांनी पिंपरी चिंचवड इथल्या रुग्णालयात वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे. आज दुपारी आळंदीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
 
आळंदी येथील साधकाश्रमात गुरु-शिष्य परंपरेचा अंगीकार करून साखरे महाराजांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान आणि व्याकरणशास्त्राचे अध्ययन केले. १९६० मध्ये साधकाश्रमाची धुरा त्यांनी हाती घेतली. तेव्हापासून साधकाश्रमात ज्ञानार्जनासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले. कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन अनेक वर्षे घडविले. कीर्तन, प्रवचन करणारे हजारो विद्यार्थी त्यांनी घडविले. श्री क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती.
 
ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली आहे. संस्कृत आणि मराठीतून एकूण ११५ ग्रंथ साखरे महाराजांनी लिहिले आहेत. सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद, सोहम योग, ज्ञानेश्वर महाराज चरित्र आदी ग्रंथसंपदा त्यांच्या लेखणीतून साकार झाली. एकूण ५०० ताम्र पटांवर त्यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली आहे. साखरे महाराज यांना महाराष्ट्र सरकारतर्फे २०१८ मध्ये 'ज्ञानोबा- तुकाराम' पुरस्कार प्रदान करण्यात आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी. लिट या सर्वोच्च पदवीने त्यांना सन्मानित केले होते.
अग्रलेख
जरुर वाचा