मुंबई, दि.२१ : देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याअनुषंगाने स्थानिकांना रोजगार मिळावा याहेतूने राज्यभरात 'जिल्हा तिथे मत्स्यालय' हा अभिनव उपक्रम राज्याच्या मत्स्यविभागामार्फत हाती घेण्यात येणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी दै. मुंबई तरुण भारतला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. या मत्स्यालयाच्या उभारणीसाठी विभागामार्फत मुंबई उपनगरे आणि पुण्यातही जागांचा शोध सुरू झाला आहे.
दरम्यान, मुंबईची ओळख असलेले तारापोरवाला मत्स्यालय गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांसाठी बंद आहे. तारापोरवाला मत्स्यालयाची इमारत जवळपास ७५ वर्षे जुनी आहे. तर बाजूची इमारतही ५० वर्षांहून अधिक जुनी आहे. मत्स्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचला असून त्या धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात नमूद करण्यात आले. राज्यात मत्स्यविभागाअंतर्गत केवळ मुंबई शहरात 'तारापोरवाला मत्स्यालय' हे एकमेव मत्स्यालय आहे. लवकरच या मत्स्यालयाच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्यात येणार आहे. ही वस्तू शून्यापासून उभी करण्याची जबाबदारी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागावर आहे. अशावेळी हे मत्स्यालय सिंगापूर, थायलंड, दुबई, मलेशिया, युके, लंडन अशाठिकाणी असणाऱ्या मत्स्यालयासारखेच जागतिक दर्जाचे असावे असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
तारापोरम मत्स्यालय हे जगातील सर्वोत्तम मत्स्यालयापैकी एक गणले जावे, अशारितीने बांधले जाणार आहे. यासाठी जगातील पातळीवरून डिझाईन मागविण्यात आले आहेत. सर्व डिझाईन आले की मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या इमारती उभारण्यात येतील. जेणेंकरून भावी पिढयांना याचा आनंद घेता येईल आणि या मत्स्यालयाचा नावलौकिक वाढविण्यात येईल, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
----------
"मुंबईप्रमाणेच, मुंबई उपनगरे आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जागतिक दर्जाची मत्स्यालय उभारता येतील का? याचा अभ्यास आम्ही करत आहोत. जागेचा शोधही सुरु आहे. आरे कॉलनीमध्ये मस्त्यव्यवसाय विभागाची जागाही मिळाली आहे. पुण्यातही एका जागेवर अभ्यास सुरु आहे. 'जिल्हा तिथे मत्सालय' अशी योजना आम्ही आणणार आहोत. विदर्भात आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवगळे मासे भेटतात. प्रत्येक जिल्ह्यात जर आम्ही मत्स्यालय उभारू शकलो तर पर्यटन, रोजगार आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालय या तिघांची सांगड घालून आम्ही आमच्या विभागाचे काम तळागाळात पोहोचवू शकतो. यातून स्थानिकांना रोजगार, उत्पादनात वाढ आणि पर्यटनास चालना मिळेल."
- नितेश राणे,मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे