भारतातील कुंभमेळ्याला प्राचीन इतिहास आहे. या कुंभमेळ्याने जगभरामध्ये भारताला एक वेगळीच ओळख प्राप्त करून दिली आहे. २०१९ मध्ये झालेला कुंभमेळा हा देखील विशेष असाच होता. त्या कुंभमेळ्याच्या आयोजनातूनच दुणावलेल्या विश्वासाच्या आधारावर महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाचा घेतलेला हा आढावा...
कुंभमेळा हा जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे, जो श्रद्धा, एकता आणि मानवता यांच्या शाश्वत दैवी संबंधांचे प्रतीक आहे. पौराणिक कथांमध्ये सांगितल्यानुसार, ब्रह्मांडात झालेल्या संघर्षानंतर प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र स्थळांवर, अमरत्वाचा अमृतरस सांडल्याचे स्मरण करून देते. ज्याचा काळ चंद्र आणि गुरूच्या खगोलीय स्थानांद्वारे निर्धारित होतो. दर १२ वर्षांनी लाखो लोक, शुद्धीकरण आणि मोक्षप्राप्तीच्या शोधार्थ, पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास एकत्र येतात. कालांतराने, आधुनिक नवकल्पनांची जोड देऊन, प्राचीन परंपरांची सरमिसळ केलेल्या कुंभमेळ्याची सुरुवात झाली.
दि. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या कुंभमेळ्यात, आतापर्यंतचे सर्वात मोठे शांततापूर्ण मानवतेचे संमेलन पाहायला मिळाले. अध्यात्मात खोलवर रुजलेली ही विलक्षण घटना श्रद्धा, समुदाय आणि व्यापार यांचा उत्सव आहे. मेळावे, शैक्षणिक कार्यक्रम, संतांकडून धार्मिक प्रवचने, भिक्षुंंची सामूहिक संमेलने आणि विविधांगी मनोरंजन यांसह, कुंभमेळा भारतीय समाजाच्या चैतन्यपूर्ण सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडवतो.
प्रयागराजची २०१९ची आवृत्ती विशेष उल्लेखनीय होती. ५० दिवसांमध्ये अंदाजे २४ कोटी अभ्यागतांनी सहभाग घेतला. त्यात फक्त दि. ४ फेब्रुवारी रोजी, ३० लाख लोकांनी उपस्थिती लावली होती. गंगा, यमुना आणि प्रसिद्ध सरस्वती या नद्यांच्या संगमावर केलेल्या आयोजनामध्ये, ३ हजार, २०० हेक्टरवर पसरलेल्या ‘टेंट सिटी’चा समावेश होता. यामध्ये ४४० किमीचे तात्पुरते रस्ते, २२ तरंगते तराफा पूल, सुमारे ५० हजार एलईडी पथदिवे आणि व्यापक स्वच्छता सुविधांचा समावेश होता.
२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याला दिलेली भेट म्हणजे, ज्यांच्यामुळे हा समारंभ जागतिक स्तरावर यशस्वी झाला, त्या आयोजक आणि कर्मचारी यांच्याप्रति व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना होती. त्यांच्या या भेटीदरम्यान, त्यांनी स्वच्छता कर्मचार्यांचा सन्मान केला, त्यांचे पाय धुवून आदरभाव व्यक्त केला. ‘स्वच्छ भारत अभियाना’विषयीची भावना बळकट करत, “असामान्य सफाई कर्मचार्यांचा गौरव करत आहे. स्वच्छ भारतासाठी योगदान देणार्या प्रत्येक व्यक्तीला मी सलाम करतो,” असे प्रतिपादनही केले.
स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता यांसाठी २०१९च्या कुंभमेळ्यात, अनेक नवे मानदंड प्रस्थापित झाले. २०१३ मधील पाच हजार सार्वजनिक शौचालयांच्या तुलनेत, २०१९च्या आवृत्तीत १ लाख, २२ हजार, ५०० शौचालये उभारण्यात आली. त्याला २० हजार कचरा डबे आणि १६० कचरा वाहतूक वाहनांची जोड मिळाली. स्वच्छतेसाठी ‘वॉटर जेट स्प्रे’सारख्या, नाविन्यपूर्ण उपायांमुळे पाण्याचा अपव्यय लक्षणीयरित्या घटला आणि स्वच्छतेचे कार्यही सुलभ झाले.
शौचालयांची उपलब्धता धोरणात्मकरित्या ठरवण्यात आली होती. लिंगविशिष्ट आणि दिव्यांग अनुकूल आरेखनाचा, त्यात समावेश केला होता. महिलांसाठी गुलाबी शौचालये होती, जिथे महिला कर्मचार्यांनी सेवा बजावली, त्यामुळे त्याच्या वापराला प्रोत्साहनही मिळाले. ज्येष्ठांसाठी अनुकूल शौचालये सर्वसमावेशकता दर्शवतात. अछिद्र सांडपाण्याच्या टाक्यांमुळे, नदी प्रदुषित होण्याचा धोका टळला.
उत्कृष्ट नवोन्मेषांपैकी एक म्हणजे, दुर्गंध दूर करणारे द्रावण. याची २०१८ मध्ये माघमेळ्यामध्ये पहिल्यांदा चाचणी करण्यात आली आणि २०१९च्या कुंभसाठी त्यात वाढ करण्यात आली. विद्यार्थ्यांनी जागेवरच उत्पादित केलेल्या या द्रावणाचे, दररोज सुमारे ६५ हजार लीटर उत्पादन करण्यात आले. याव्यतिरिक्त स्वच्छता राखणे आणि शौचालयाच्या वापरास प्रोत्साहन देणे, यामध्ये स्वच्छाग्रहींचीही (स्वच्छता स्वयंसेवक) महत्त्वाची भूमिका होती. (इंटरनेट आधारित) ‘आयओ-टीसक्षम’ या मोबाईल अॅपने सुसज्ज, या स्वयंसेवकांनी विस्तीर्ण मैदानावरील ६० हजार शौचालयाचे निरीक्षण केले. तसेच तत्काळ अनेक समस्यांचे समाधानही केले. या पुढाकारामुळे कार्यसंचलन क्षमतेत फक्त वृद्धीच झाली नाही, तर अनेक तरुण आणि महिला यांचा समावेश असलेल्या स्वयंसेवकांनाही सक्षम केले.
२०१७ मध्ये ‘युनेस्को’ने कुंभमेळ्याला, ‘मानवतेचा अमूर्त वारसा’ या त्यांच्या यादीत स्थान दिले. २०१९ची आवृत्ती या सन्मानायोग्य पार पडली. त्यात भारताच्या असाधारण पातळीवरील आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन घडले.
२०२५ मध्ये प्रयागराज इथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यात, जगभरातून ३० कोटींहून अधिक यात्रेकरू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली तयारीचा विस्तार आणि महत्त्वाकांक्षा ‘न भूतो न भविष्यति’ अशीच आहे. महाकुंभचा जागतिक स्तर उंचावतानाही, त्याचे पावित्र्य जपण्याप्रति त्यांची बांधिलकी अतूट आहे. पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेण्यापासून, ते यात्रेकरूंच्या कल्याणाची खात्री करण्यापर्यंत निर्दोषअंमलबजावणीप्रति त्यांचे समर्पण प्रतिबिंबित करते. समाजाच्या सहभागावर भर देणारा मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ याविषयीच्या गुणवत्तेला मूर्त स्वरुप देणारा कार्यक्रम तयार करण्यात अविभाज्य भूमिका बजावताना, स्थानिक कलाकार, सांस्कृतिक समूह आणि स्वयंसेवकांना प्रोत्साहन देत आहे. २०१९च्या परिवर्तनशील मेळ्याच्या यशाच्या मार्गदर्शनातून, कुंभमेळ्याची ही आवृत्ती श्रद्धानिष्ठा, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांचा एकसंध मिलाप घडवून, नवीन जागतिक मानदंड स्थापित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
यंदा स्थळ आणि सुलभता यांचा विस्तार, यावर मुख्यत्वे लक्ष दिले आहे. अधिक गर्दीच्या दिवसांतही सुरक्षित आणि व्यवस्थित स्नान करता यावे, यासाठी गर्दी टाळण्यासाठी प्रगत जमाव व्यवस्थापन प्रणालीचा वापर करून, घाटांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. प्रयागराज मुख्य शहरांशी जोडण्यासाठी, विशेष गाड्या आणि सुधारित रेल्वे जाळ्यासह वाहतूक संरचनेत वृद्धी केली जात आहे. जड वाहनांच्या रहदारीचे व्यवस्थापन करण्यासाठी बहुपदरी महामार्ग, अद्ययावत इंटरसेक्शन्स (चौक) आणि विस्तारित वाहनतळ विकसित केले जात आहेत. त्याव्यतिरिक्त प्रयागराज विमानतळाचाही विस्तार केला आहे, जेणेकरून प्रवासी क्षमतेत वाढ करता होईल. तसेच, आंतरराष्ट्रीय यात्रेकरूंसाठी चार्टर्ड विमानांची, उड्डाणे सुरू करण्याची सुविधा आहे.
लाखो यात्रेकरूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सार्वजनिक सुविधा अभूतपूर्व प्रमाणात अद्ययावत करण्यात येत आहेत. ५० हजारांहून अधिक पर्यावरणपूरक शौचालये, फिरती स्वच्छता यंत्रणा, स्वच्छता आणि सुविधा निश्चित करतील. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय, सौरऊर्जेवरीलप्रकाशव्यवस्था आणि यात्रेकरूंच्या आराम आणि कल्याणासाठी वचनबद्धतेचे प्रतिबिंब असलेली, विस्तारित निवारा व्यवस्था विकसित केली जात आहे.
‘महाकुंभ २०२५’चा अनुभव परिवर्तनीय ठरण्यात, तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अति गर्दी टाळण्यासाठी, ड्रोन समर्थित कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित जमाव नियंत्रण प्रणाली, वास्तविक वेळात गर्दीच्या घनतेवर लक्ष ठेवत आहे. यात्रेकरूंना मार्ग, घाटांच्या वेळा, हवामान माहिती आणि आपत्कालीन सेवांविषयी, वास्तविक वेळेतली माहिती देणार्या समर्पित मोबाईल अॅप्सची सुविधा आहे. शिवाय, रोखविरहित अर्थव्यवस्थेला डिजिटल देयक व्यवस्थेद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे. ज्यामध्ये विक्रेते आणि यात्रेकरूंसाठी व्यवहारसुलभ, ‘युपीआय-सक्षम किओस्क’चा समावेश आहे.
२०१९ मध्ये सादर केलेल्या उपक्रमांवर आधारित शाश्वतता, २०२५च्या मेळ्याचा आधारस्तंभ आहे. व्यापक पुनर्वापर प्रणाली आणि सेंद्रीय खताच्या सुविधेसह, ‘शून्य कचरा धोरण’ कार्यचालनासाठी मार्गदर्शक ठरत आहे. प्लास्टिकच्या वापराचे काटेकोर नियमन केले आहे आणि वेष्टनाधारित आणि उपयोजिता यांच्यासाठी, जैवविघटन पर्यायांना प्रोत्साहन दिले गेले आहे. प्रगत जलशुद्धीकरण संयंत्रे आणि वास्तविक वेळ गुणवत्ता, देखरेख प्रणालीमार्फत गंगा आणि यमुना नद्यांचे पावित्र्य सुनिश्चित केले आहे. तर जमिनीची धूप कमी करणे आणि पाण्याची धारणक्षमता सुधारणे, हे नदीकाठच्या आसपास मोठ्या प्रमाणात वनीकरणाची मोहीम राबवण्यामागचे उद्देश आहेत. कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरित्या कमी होण्यासाठी, पुनर्नवीकरणीय ऊर्जास्रोत जसे सौर पॅनेल आणि जैवऊर्जा प्रणालीसारखे स्रोत, मेळ्याच्या मोठ्या भागाला ऊर्जापुरवठा करत आहेत.
सुरक्षितता आणि सुरक्षा यंत्रणा या पातळीवरच्या कार्यक्रमांसाठी प्राधान्याची आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने सक्षम चेहरा ओळखणार्या तंत्रज्ञानासह, सक्षम दहा हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे परिसराची निगराणी करत आहेत. तर रुग्णसेवा, अग्निशमन सेवा आणि आपत्ती प्रतिसाद दलासह, हजारो कर्मचारी तैनात केले आहेत. प्रगत वैद्यकीय सुविधांसह, सुसज्ज आणि टेलिमेडिसिन सेवांनी समर्थित तात्पुरती रुग्णालये आणि दवाखाने उपस्थितांसाठी वेळेवर आरोग्यसेवा सुनिश्चित करत आहेत.
‘महाकुंभमेळा २०२५’ हा देशाची संस्कृती आणि आध्यात्मिकता यांचे उपस्थितांना दर्शन घडवणार आहे. विविध समर्पित सभामंडपांमध्ये, पारंपरिक संगीत, नृत्य आणि देशभरातील कलाप्रकार यांसह आभासी वास्तविकतेच्या अनुभवाची जोड असलेले, कुंभमेळ्याचा इतिहास आणि विज्ञान यांच्यावरील प्रदर्शन सादर करण्यात येत आहे. आंतरधर्मीय संवादांमध्ये, जागतिक आध्यात्मिक नेते आणि विद्वानांचा समावेश, हे विविध धर्मांतील सुसंवाद आणि समजूत वृद्धिंगत करत आहेत. युवकांसाठी कार्यशाळा, स्वच्छता मोहीम आणि स्वयंसेवा संधींसह जबाबदारी रुजवणे आणि आध्यात्मिक विकास करणे, हा या विशेष कार्यक्रमांचा उद्देश आहे.
मेळ्याचे जागतिक आकर्षण वाढवण्यासाठी, परदेशी अभ्यागतांसाठी पर्यटन अनुकूल उपक्रम जसे बहुभाषिक माहिती केंद्रे आणि मार्गदर्शित सहली आयोजित केल्या आहेत. वारसा क्षेत्रभेटीसह, आध्यात्मिक पर्यटन पॅकेजमधून, प्रदेशाच्या समृद्ध इतिहासावर प्रकाश टाकण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी, व्हिलचेअरसह सुगम वावरासाठी आणि वैयक्तिक साहाय्यासह सर्वांसाठीच, स्वागतार्ह वातावरण सुनिश्चित केले आहे.
‘महाकुंभमेळा २०२५’ हा अभूतपूर्व प्रमाणात श्रद्धा, नवोन्मेष आणि शाश्वतता यांना जोडणारा, आध्यात्मिक आणि व्यवस्थापन चमत्कार ठरणार आहे. जगभरातील लाखो लोकांना अविस्मरणीय अनुभव देत आधुनिक प्रगतीचा स्वीकार करताना, आपल्या प्राचीन परंपरांचा सन्मान करण्याची भारताची क्षमता यात प्रतिबिंबित होत आहे.
अमिताभ कांत
(लेखक भारताच्या ‘जी२०’ परिषदेचे शेर्पा आणि ‘नीती आयोगा’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. लेखकांनी मांडलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत.)