आत्मविश्वासू चित्रकार

Total Views | 41
Anuradha Thakur

अहिल्यानगरच्या ग्रामीण भागातून चित्रकलेला सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेलेल्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्याविषयी.

निसर्गातून मिळणारी ‘सकारात्मकता आणि आत्मविश्वास’ हाच मूळ गाभा जपत,वनवासींचे जीवन कॅनव्हासवर उतरविणार्‍या अहिल्यानगरच्या आंतरराष्ट्रीय चित्रकार अनुराधा ठाकूर. ‘राहुरी फॅक्टरी’ या छोट्या ग्रामीण भागात शिक्षण पूर्ण केल्यावर देशभरात प्रवास करत, अनुराधा यांनी ग्रामीण जीवनाचा मागोवा घेतला. आपल्यातील चित्रकलेची अनुराधा यांनी मनोभावे सेवा केली. कलेप्रति अभ्यास आणि जाण यांतून निर्माण झालेल्या चित्रशैलीमुळे, अनुराधा यांना जागतिक व्यासपीठावर ओळख मिळाली.

अनुराधा यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण आणि संपूर्ण बालपण हे अहिल्यानगरमधील राहुरी साखर कारखाना येथे झाले. अनुराधा यांचे वडील साखर कारखान्यात इलेक्ट्रिकल इंजिनिअर असल्याने, त्यांचे वास्तव्य फॅक्टरी परिसरातच होते. याच शाळेत शिक्षण घेत असताना, शाळेतील वायचळ सरांनी अनुराधा यांच्यातील कलागुण हेरले. फाईन आर्ट या विषयात उच्च शिक्षण घेण्याचा सल्ला सरांनी दिला. त्याकाळात कलाविषयात शिक्षण घेण्याबाबत, फारसे सकारात्मक वातावरण नव्हते. तसेच, आपल्या मुलानांही पुणे, मुंबईमध्ये शिक्षणासाठी पाठवण्याची पालकांची तयारी नसायची. त्यामुळे पुण्यातील अभिनव या नामांकित महाविद्यालयात, अनुराधा यांचा प्रवेश झाला.

अभिनवमध्ये शिक्षण घेत असताना अनुराधा यांना जाणवले की, फाईन आर्ट अभ्यासक्रमात केवळ पाश्चिमात्य कलांच्या अभ्यासावर भर दिला जातो. महाविद्यालयीन शिक्षण तर अनुराधा यांनी पूर्ण केले, मात्र पाश्चिमात्य चित्रकलांमध्ये त्या फार काळ रमल्या नाहीत. अनुराधा यांना विश्वास होता की, कलेमध्ये समाज घडविण्याची ताकद आहे. अनुराधा यांनी महिला, लहान मुले, गृहिणी, ग्रामीण भागातील मुले, अशा समाजातील विविध घटकांसाठी, कलेच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार केला.
त्यानंतर लगेचच त्यांनी अत्यंत कमी उत्पन्न गटातील शालेय मुलांसाठी, त्यांनी एक उपक्रम हाती घेतला. ही मुले शाळेत तर येत होती, मात्र कुटुंबातील हलाखीची परिस्थिती आणि आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे, अनेक मुले अत्यंत आक्रमक झाली होती. अनुराधा यांच्यावर या मुलांना, चित्रकला हा विषय शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली. सुरुवातीला सवयीप्रमाणे मुलांनी वर्गात प्रचंड दंगा केला. मात्र, कालांतराने दुकानांतील रद्दीत जाणारी रंगीबेरंगी मासिके, मातीतून मुले आकर्षक कलाकृती घडवू लागली. वर्गातील मुलांच्या हातातील रंगीत कोलाज, चित्रे एका कॅमेरामनने आपल्या कॅमेरात कैद केले. दुसर्‍या दिवशी हे फोटो एका वृत्तपत्रात छापून आले. ज्या मुलांचे नाव शाळेत कायमच दंगेखोर म्हणून घेतले जायचे, त्याच मुलांमुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले होते. चित्रकलेतून त्या मुलांचा आत्मविश्वास वाढला. तसेच पुढे त्या वर्गाचा निकालही वाढला. अनुराधा यांच्या ’चित्रकलेतून गुणात्मक विकास आणि वर्तन बदल’ या प्रकल्पाला, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९२ साली ‘राज्य शैक्षणिक संशोधन मंडळा’ने अनुराधा यांना, या पुरस्काराने सन्मानित केले.

२००३च्या सुरुवातीला अनुराधा यांनी गडचिरोलीतील, गौंड समाजातील मुलांसाठी कार्यशाळा घेतली. या भागातील वनवासींचे जीवन अनुराधा यांना भावले. या भागातील पुरुष आणि महिलांची जीवनपद्धतीचे चित्रण अनुराधा यांनी कॅनव्हासवर उतरविले. ’ऑटम हार्मोनी’ नामक ही चित्रमालिका, जागतिक स्तरावर अत्यंत गाजली. या कामी डॉ. अभय बंग यांची अनुराधा यांना खूप मदत झाली. इथेच अनुराधा यांना आपल्या कलेतील सूर गवसला. अनुराधा यांची वनवासी जीवनपद्धती सांगणारी चित्रशैली जगप्रसिद्ध आहे. अनुराधा यांनी या चित्रशैलीच्या विकासासाठी, देशभरात अनेक आदिवासी भागांना भेटी दिल्या आहेत.

गुजरातमधील कच्छ, मध्य प्रदेश, राजस्थानमधील झाबुआ, नागालॅण्ड, आसाम, मेघालय आणि जम्मू काश्मीरच्या नायनाट दुर्गम आणि छोट्या खेड्यांत त्यांनी प्रवास करून, त्या भागातील जीवनशैली जाणून घेतली. ही चित्रशैली जगभरात अनुराधा ठाकूर यांच्याच नावाने ओळखली जाते. अनुराधा यांच्या चित्रशैलीला ३० हून, अधिक राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आले. यात महिला आणि बालविकास विभागाच्या १०० प्रतिभावान महिलांच्या यादीतही, अनुराधा यांनी आपले स्थान मिळवले आहे. सर्वात सन्मानाचा क्षण म्हणजे अनुराधा ठाकूर यांनी काढलेले ’एथनिक सेरेंडीपीटी’ हे चित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात लावण्यात आले असून, अनुराधा यांचा फोटो त्यासह काढण्यात आला हा अनुराधा यांच्यासाठी सर्वोच्च सन्मानाचा क्षण होता.

अनुराधा या उत्तम चित्रकार असण्यासोबतच, उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी प्रसिद्ध वृत्तपत्रात लेखन केले आहे. याचाच संग्रह करून पुढे ’अनुभूतीच्या स्पंदनरेखा’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाला पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. याच पुस्तकाचा पुढे ’स्केचेस ऑफ रिदमिक एक्सपीरियन्सेस’ नावाने, इंग्रजी अनुवाद करण्यात आला. अनुराधा यांचे अनुभव आकाशवाणीच्या ’चिंतन’ या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आले आहेत. अनुराधा यांच्या मार्गदर्शनात, आर्किटेक्चर आणि डिझाईन संस्थांमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलांनीही भारतात आणि परदेशात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनुराधा यांचा हा कलावारसा त्यांच्या मुलीनेही अत्यंत प्रभावीपणे स्वीकारला आहे. अनुराधा यांची नातही सरस चित्रकार आहे. अनुराधा यांनी पेरलेले कलेचे बीज आता, जगभर विस्तारले आहे. त्यांची तिसरी पिढीही त्यांचा हा वारसा अमूर्तपणे जपेल, यात शंका नाही. अनुराधा ठाकूर यांच्या पुढील कलाप्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121