मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांग्लादेशमधील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हा विषय दुसरीकडे वळवण्यात येत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे सैफचा हल्लेखोर बांगलादेशी निघाल्याने रोहित पवारांना पोटशूळ उठल्याचे बोलले जात आहे.
रोहित पवार म्हणाले की, "या विषयाला दुसरीकडे घेऊन जाऊ नका. हल्ला करणाऱ्याला पकडण्यात आले असून त्यावर काय करतात हे बघावे लागेल. बाबा सिद्दीकींचा विषयसुद्धा भलतीकडेच घेऊन गेले होते. मारेकरी दुसरे कुणीतरी आहेत, त्यांना पकडा अशी विनंती त्यांचा मुलगा करत होता. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणालासुद्धा वेगळ्याच दिशेने नेण्यात येत आहेत. इथे कलाकार, नेते सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर हल्ला आणि गोळीबार होतो. त्यामुळे जर हे व्हीआयपी लोकच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय होणार? यावर चर्चा होण्यापेक्षा पोलिसांनी वेगळी भूमिका घेतली आहे. राजकीय नेत्यांचा आदेश घेऊन ते या सगळ्या गोष्टींना वेगळ्या दिशेने नेत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्या असल्याने हा विषय बांग्लादेशकडे नेण्यात येत आहे," असे ते म्हणाले.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात १९ जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या संशयित बांगलादेशी घुसखोराला ठाण्याहून अटक केली. हा आरोपी ३० वर्षांचा आहे असून तो दरोड्याच्या उद्देशाने घरात घुसला होता. तसेच आरोपी हा मूळचा बांगलादेशी असून ५ ते ६ महिन्यांपूर्वी मुंबईत राहायला आला होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.