वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा दावा
02-Jan-2025
Total Views | 96
मुंबई : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. बीड सरपंच हत्या प्रकरण सध्या चांगलेच तापले असून यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "बीड पोलीस स्थानकात नवीन पलंग नेण्यात आले. हे पलंग पोलिसांसाठी असल्याचे सांगण्यात आले. परंतू, पोलिस स्टेशनमध्ये यापुर्वी कधी पोलिस कॉटवर झोपल्याची माहिती नाही. त्यामुळे वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी हे पलंग नेण्यात आले का? याची चौकशी व्हायला हवी."
"मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी माहिती मला मिळाली आहे. पण पोलिसांनी मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर करू नये, अशी माझी विनंती आहे. हा बिचारा म्हणणार नाही, पण मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी याचा वापर होत असल्यास तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने मला दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात काहीही होण्याची शक्यता आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
राजन साळवींची ही लढण्याची प्रवृत्ती कमी झाली असावी!
उबाठा गटाचे नेते राजन साळवी भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते. ते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. सत्तेसाठीच जन्माला आलो आहोत, असे त्यांच्या डोक्यात असते. लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की, माणूस सत्तेच्या मार्गाने जातो. राजन साळवींची ही लढण्याची प्रवृत्ती कमी झाली असावी. त्यामुळे ते पळापळ करत आहेत. तो माजी आमदार आहे आणि हे चालतच असते," असेही ते म्हणाले.