राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धेत यूपीच्या तिरंदाजांचा डंका
02-Jan-2025
Total Views | 38
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vanvasi Krida Pratiyogita) छत्तीसगडच्या रायपूर येथे वनवासी विकास समिती अंतर्गत 'राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धेत' नुकतीच संपन्न झाली. यंदा या क्रीडा प्रतियोगिताचे २४ वे वर्ष होते. दरम्यान २५ राज्यांतील ८०० हून अधिक जनजाती खेळाडू तिरंदाजी आणि फुटबॉल या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. पूर्व उत्तर प्रदेशातील तिरंदाजांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. कर्नाटकच्या महिला तिरंदाजांनी तितकीच उत्तम कामगिरी केली. ट्रॉफी आणि पदकांसोबतच खेळाडूंनी यावेळी अनेकांची मने जिंकून घेतली. जरी पूर्व उत्तर प्रदेशातील तिरंदाजांना कोणत्याही प्रकारात सुवर्णपदक मिळू शकले नसले तरी एकूण बारापैकी चार पदके त्यांनी जिंकली आहेत. ज्युनियर मुले व सब-ज्युनियर मुले गटात खेळाडूंनी रौप्य व कांस्यपदक पटकावले.
ज्युनियर मुलांच्या तिरंदाजी स्पर्धेत राजस्थानच्या हिमेश बरंडा याने ६४३ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. पूर्व उत्तर प्रदेशच्या आदित्य सिंगने ६३७ गुण मिळवून रौप्यपदक तर हीरा सिंगने ६२६ गुण मिळवून कांस्यपदक मिळवले. सब-ज्युनियर मुलांच्या गटात उत्तर बंगालच्या सकनॉन लेपचाने ६६४ गुणांसह सुवर्णपदक, पूर्व उत्तर प्रदेशच्या दीपकने ६६१ गुणांसह रौप्यपदक आणि इंद्रदेव कुमारने ६५१ गुणांसह कांस्यपदक पटकावले.
ज्युनियर मुलींच्या गटात ओरिसाच्या मंजुलताने ५६३ गुण मिळवून सुवर्णपदक, छत्तीसगडच्या रामशिला नेतामने ४९३ गुण मिळवून रौप्यपदक तर ओरिसाच्या मीना तिरियाने ४६० गुण मिळवून कांस्यपदक पटकावले. सब-ज्युनियर मुलींच्या गटात कर्नाटकच्या मुलींनी वर्चस्व राखले. कर्नाटकच्या भाग्यश्रीने ५९९ गुणांसह सुवर्णपदक तर अन्नपूर्णाने ५६३ गुणांसह रौप्यपदक मिळवले. राजस्थानच्या दर्शी दामोरने ५४१ गुण मिळवत कांस्यपदक जिंकले. राष्ट्रीय वनीकरण क्रीडा स्पर्धेत मुले-मुली-ज्युनियर-सब-ज्युनियर गटात सुमारे ४०० जनजाती तिरंदाजांनी भाग घेतला. तिरंदाजीच्या सर्व स्पर्धा राज्य धनुर्विद्या अकादमीच्या मैदानावर झाल्या.