मुंबई (विशेष प्रतिनिधी) - साताऱ्यात शाही चक्रवाक (काॅमन शेल्डक - Common Shelduck) या बदकाच्या प्रजातीचे प्रथमच दर्शन झाले आहे (Common Shelduck). स्थलांतरी असणारे हे पक्षी साताऱ्यातील पाणथळ प्रदेशात दाखल झाले आहेत. शाही चक्रवाक हा हिवाळ्यात महाराष्ट्रातील मोजक्याच भागात स्थलांतर करुन येत असून त्याच्या तुरळक नोंदी आहेत. (Common Shelduck)
हिवाळ्याच्या आगमनाबरोबर राज्यात स्थलांतरी पाणपक्ष्यांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक बदक जातीचे पक्षी पाणथळ प्रदेशात दाखल झाले आहे. शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी रायगडमधील पक्षीनिरीक्षक वैभव पाटील आणि विशाल ठाकूर साताऱ्यात पक्ष निरीक्षणाकरिता गेले होते. त्यावेळी त्यांना वीर धरणावर बदकाच्या प्रजातीमधील एक वेगळा बदक निदर्शनास आला. छायाचित्र टिपल्यानंतर हा पक्षी शाही चक्रवाक असल्याचे निदर्शनास आले. सातारा जिल्ह्यात हा पक्षी आढळत असल्याची ही पहिलीच नोंद ठरली आहे. जिल्ह्यात मायणी सारखे स्थलांतरी पक्ष्यांसाठी ओळखले जाणारे संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. असे असताना देखील मायणी व्यतिरिक्त इतर पाणथळ प्रदेशात या पक्ष्याचे दर्शन होणे महत्त्वाचे ठरत आहे. महाराष्ट्रासाठी हा पक्षी भटका प्रवासी असून राज्यात दरवर्षी येणाऱ्या त्याच्याच कुळातील चक्रवाक (ruddy shelduck) जातीच्या बदकांसोबत तो याठिकाणी भटकून आल्याची शक्यता वैभव पाटील यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्रात यापूर्वी याच्या रायगड, ठाणे, नाशिक, पुणे, धुळे, सोलापूर अशा ठिकाणी मोजक्याच नोंदी आहेत.
शाही चक्रवाकच्या विणीच्या नोंदी या कझाकिस्तान, मंगोलिया, उझबेकिस्तान, युक्रेन ते आइसलँडपर्यंत आढळतात. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव आहे 'टॅडोमा टॅडोमा' आहे. या पक्ष्याची मादी नरापेक्षा आकाराने काहीशी लहान असते. नर आणि मादी हे त्यांच्या चोचीतल्या फरकामुळे लक्षात येतात. नराची चोच ही अधिक बाकदार आणि त्यावर उभार असतो. त्यामुळे सातऱ्यात दिसलेला पक्षी ही मादी आहे. पूर्ण वाढ झालेल्या शाही चक्रवाकची मान ही हिरवट काळ्या रंगाची असते आणि छातीवर तपकिरी रंगाचा पट्टा असतो तर अप्रौढ पक्षांमध्ये याचा अभाव असतो. हे पक्षी प्रामुख्याने अपृष्ठवंशी प्राणी, वनस्पती पदार्थ, बिया आणि जलीय वनस्पती खातात.