ये भगवा रंग : तामिळनाडूचे हिंदूद्वेष्टे राजकारण

    19-Jan-2025   
Total Views |
Tamilnadu

‘ये भगवा रंग, मुझे चढ गया भगवा रंग रंग’... हे गीत ऐकले की, उत्साहित न होणारा हिंदू शोधून सापडणार नाही. या भगव्या रंगाची भीती ‘ब्रेकिंग इंडिया’वाल्यांना किती म्हणावी? तर तामिळनाडूमध्ये ज्या प्रतिमेमध्ये संतकवी तिरूवल्लुवर यांनी भगवे वस्त्र परिधान केले, त्या प्रतिमेचे तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी हिंदू पद्धतीने पूजन केले. या घटनेवरून काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. काँग्रेस आणि समविचारी पक्षांचा तामिळनाडूमध्ये हा भगवा द्वेष का? याचा आढावा घेणारा हा लेख...

काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांनी तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांना केंद्र सरकारने तत्काळ हटवावे, अशी मागणी नुकतीच केली. का? तर तामिळमधील थोर कवी तिरूवल्लुवर यांनी भगवे वस्त्र परिधान केलेल्या प्रतिमेचे पूजन राज्यपाल रवी यांनी केले म्हणून! तसेच, यावेळी राज्यपाल म्हणाले की, “मी भारतीय सनातन परंपरेचे श्रद्धेय कवी, महान दार्शनिक आणि प्रतिभाशाली संत तिरुवल्लुवर यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.” ज्यांचा जन्म तामिळनाडूच्या आध्यात्मिक भूमीमध्ये झाला, त्या तिरूवल्लुवर यांना ‘भारतीय सनातन परंपरेचे’ म्हटले म्हणून लगेचच, तिरूवल्लुवर यांचे भगवेकरण होत असल्याचे आरोप करण्यात आले. भगव्या वस्त्रातील तिरूवल्लुवर यांच्या प्रतिमेचे पूजन करणे म्हणजे, तामिळनाडू, संत तिरूवल्लुवर आणि तामिळ जनतेचा अपमान आहे, असे काँग्रेससह ‘द्रविड मुनेत्र कळगम (डीएमके)’ आणि ‘पटाली मक्कल काची (पीएमके)’ या पक्षांचे म्हणणे. डीएमकेचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणतात की, “तिरुवल्लुवर यांना आर्यांच्या पोषाखात (म्हणजे भगव्या वस्त्रात) दाखवले आहे. भाजपचे हे राजकारण आहे, हे कधीही खपवून घेतले जाणार नाही.” आता काय म्हणावे? त्याग आणि शौर्याचे प्रतीक असलेला भगवा रंग हा केवळ हिंदू समाजाला पवित्र वाटतो. परंतु, तामिळनाडूमध्ये भगव्या रंगाच्या वस्त्राविरोधात उतरलेला काँग्रेस आणि डीएमके, पीएमके पक्ष आणि त्यांच्या या भीतीचे कारण काय?

तर जवळजवळ ९० टक्के हिंदू असलेल्या तामिळनाडूमध्ये संतकवी तिरुवल्लुवर यांना राज्याचा आदर्श मानले जाते. तसेच, तामिळनाडूचे सांस्कृतिक नीतिमानाचे धरोहर म्हणून संतकवी तिरुवल्लुवर यांच्या विचारांना मानले जाते. संतकवी तिरुवल्लुवर यांना ‘थेवा पुलवर’, ‘वल्लुवर’ आणि ‘पोयामोड़ी पुलवर’ अशा नावांनीही तामिळनाडूमध्ये ओळखले जाते. तामिळनाडूची जनता त्यांच्यावर अगदी जीव ओवाळून टाकते. त्यांचे विचारदर्शन, संस्कृती, नियम हे तामिळ जनतेला एकत्र सूत्रात बांधून ठेवतात. संतकवी तिरुवल्लुवरांच्या शब्दाबाहेर जनता नाही. त्यामुळे या संतकवी तिरुवल्लुवर यांच्या नावाने तामिळनाडूमध्ये वर्षानुवर्षे राजकारण सुरुच आहे.

तामिळनाडूमध्ये बहुसंख्य नागरिक हिंदू आहेत. ती हिंदू जनता ज्यांना प्राणप्रिय मानते, ते संतकवी तिरुवल्लुवर हे हिंदू नाहीत, असे भासवण्याची आणि दाखवण्याची चढाओढ काँग्रेस, डीएमके आणि पीएमके पक्षांमध्ये सध्या लागलेली दिसते. पण, मग या पक्षांना ही भीती का वाटावी? तर २०१४, २०१९ आणि २०२४ साली भारतातील हिंदू जनतेने हिंदू विचारसरणीशी बांधील असलेल्या भारतीय जनता पक्षाला देशाची सत्ता बहाल केली. मात्र, तामिळनाडू राज्यात भाजपला समर्थन मिळाले नाही. कारण, इथे स्वातंत्र्यानंतर वर्षोनुवर्षे जनतेला ‘आर्य विरूद्ध द्रविड’ या संघर्षामध्ये गुंतवून ठेवले गेले. तामिळनाडूची जनता द्रविड आहे आणि बाकी उत्तरेकडचे लोक आर्य आहेत, आर्य बाहेरून आले असल्याने उत्तर आणि उर्वरित भारताशी आपले काही सांस्कृतिक नाते नाही, असा खोटा भ्रामक समज तामिळनाडूच्या जनतेमध्ये पेरला गेला. त्यात आर्य-द्रविड वादात हिंदी भाषेलाही ओढले गेले. आपण द्रविड म्हणून आपली भाषा उत्तरेकडील लोकांसारखी हिंदी नाही, असा वाद पेटवला गेला. हिंदूंमध्ये जातीपातीची विषमता दाखवत ‘सवर्ण विरूद्ध तथाकथित मागासवर्गीय’ असाही भेद करून हिंदू जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे.

या अशा पार्श्वभूमीवर संतकवी तिरुवल्लुवर हे हिंदू होते, असे जनतेसमोर आले, तर तामिळनाडूची जनता इतर सगळे भेद विसरून, वाद विसरून हिंदू म्हणून एकत्र येईल, अशा भयगंडाने काँग्रेससह डीएमके आणि पीएमके हे पक्ष ग्रस्त आहेत.
त्यामुळेच संतकवी तिरुवल्लुवर यांच्या भगव्या वस्त्रात परिधान केलेल्या प्रतिमेला आहे, म्हणून काँग्रेस आणि डीएमके, पीएमके पक्ष विरोध करतो. त्यामुळेच राज्यपाल रवी यांनी भगव्या वस्त्रातील संतकवी तिरुवल्लुवर यांचे पूजन केले, म्हणून राजीनामा द्यावा, अशा या पक्षांची तथ्यहीन मागणी.

राहुल गांधी जानवे घालून स्वत:चे गोत्रबित्र सांगून आपण कसे ब्राह्मण आहोत, हे सांगत फिरतात. ‘संविधान बचाव-बिचाव’ म्हणतही ओरडत असतात. पण, तामिळनाडूमध्ये राज्यपालांसारख्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने कुणाचे पूजन कसे करावे, यावरही त्यांच्या पक्षाचा आक्षेप आहे. त्यांच्या मते, संतकवी तिरुवल्लुवर हे हिंदू होते, असे कुठेही लिहिलेले नाही. मग त्यांना हिंदूंच्या भगव्या पोषाखात का दाखवता? पण, संतकवी तिरुवल्लुवर मुस्लीम किंवा ख्रिश्चन होते, असेही कुठे लिहिलेले नाही. संत तिरुवल्लुवर कसे हिंदू नव्हते, हे सांगण्यासाठी नेहमीप्रमाणे डाव्या चळवळी आणि त्यांच्या वळचणीला जाऊन काँग्रेस किंवा काही स्थानिक प्रांतवादी पक्ष आघाडीवर आहेत. त्यासाठी ते वकार्ल ग्रौल या तथाकथित अभ्यासकाचे दाखले देतात. वकार्ल याने १८५५ साली संत तिरुवल्लुवर यांच्या ‘तिरुवल्लुवर’ या साहित्यकृतीला ‘बौद्ध पंथाची एक कृती’ या रूपात चित्रित केले. त्याने जैनधर्मीयांनाही बौद्ध धर्माच्या अंतर्गत एक पंथ म्हणून सम्मेलित केले. (पण, बौद्ध काय जैन काय धार्मिक ऐतिहासिक सत्यानुसार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार, हे दोन्ही धर्म कायद्याच्या आणि संस्कृतीच्या कक्षेत हिंदू धर्माचेच भाग आहेत. हे मात्र हे लोक सोयीस्कर दुर्लक्ष करतात) संतकवी तिरुवल्लुवर कोण होते? त्यांच्या तिरुवल्लुवरमध्ये त्यांनी जे विचार उद्धृत केले, ते तर भारतीय संस्कृतीचे मानक आहेत. त्यांची जीवनचर्या कौटुंबिक परिस्थिती ही भारतीय आदर्श हिंदू समाजानुसारच होती. तीच जीवनचर्या होती, जी असेतू हिमालय हिंदू लोकांची आहे, अगदी तीच! ईश्वर, नीती, सत्य याबाबत त्यांची मांडणी हिंदू तत्त्वज्ञानाचे सार आहे. पण, तरीही संतकवी तिरुवल्लुवर हे प्राचीन सनातन धर्माचे सुपुत्र आहेत असे म्हणूच नये, असे काँग्रेससह समविचारी पक्षांना वाटते. त्यांच्या मते, भगवा रंग हिंदू धर्माचे प्रतीक आहे. विशिष्ट धर्माचे उदात्तीकरण नको, असे म्हणत तिथल्या हिंदुत्ववादी विचारसरणी विरोधात उतरलेला काँग्रेस पक्ष आणि डीएमके, पीएमके पक्ष मात्र इतर धर्माच्या लांगूलचालनाबद्दल अगदी अग्रेसर आहे.

याच तामिळनाडूमध्ये एका संपूर्ण गावावर ‘वक्फ बोर्डा’ने मागे उभा दावा सांगितला होता. विशेष म्हणजे, या गावात १ हजार, ५०० पूर्वीचे एक मंदिर आहे. मंदिराच्या अधिपत्याखाली जमीनही आहे. मात्र, मंदिरासकट सगळ्या गावावर ‘वक्फ बोर्डा’ने दावा सांगितला. याच तामिळनाडूमध्ये कडतूर परिसरात मुस्लीम बहुसंख्य राहतात म्हणून, हिंदूंनी त्यांच्या धार्मिक प्रथेनुसार, देवादिकांची मिरवणूक काढू नये. त्यामुळे मुस्लिमांच्या श्रद्धा दुखावतात, अशी याचिका न्यायालयात दाखलही करण्यात आली होती. याच तामिळनाडूमध्ये ‘तौहिद जमात’ या मुस्लीम संघटनेने फतवा काढला की, “हिंदूंना गाय पवित्र आहे, आपल्या इस्लाममध्ये ती पवित्र नव्हे. त्यामुळे ‘पतंजली’च्या उत्पादनावर बहिष्कार घाला. कारण, त्यांच्या काही उत्पादनामध्ये गोमुत्राचा वापर केला जातो.” २०१६ साली याच ‘तौहिद जमात’ संघटनेने एक मोठी रॅली काढली होती. भारतामधून मूर्तिपूजा नष्ट करण्याची शपथ या रॅलीमध्ये घेतली गेली. या रॅलीमध्ये मुस्लीम नेता अब्दुल रहीम याने म्हटले की, “संविधानाने स्वधर्म श्रद्धेचे पालन करण्याचे सांगितले आहे. मूर्तिपूजा ही इस्लामच्या मूळ स्वरूपाविरोधात आहे. त्यामुळे मूर्तिपूजा नष्ट करणे ही मुस्लिमांच्या धर्मनिष्ठेशी संबधित श्रद्धा आहे. त्यामुळे मुस्लिमांना मूर्तिपूजा नष्ट करण्याला कुणी रोखत असेल, तर ते संविधान विरोधी आहे.” या विघातक रॅलीला परवानगी देऊ नये, यासाठी तामिळनाडूच्या हिंदू संघटनांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वांना धर्म, श्रद्धा जपण्याचा अधिकार आहे, असे म्हणत तामिळनाडूमध्ये या रॅलीला परवानगी देण्यात आली. तेव्हा काँग्रेस, डीएमके आणि पीएमके हे पक्ष मूग गिळून गप्प होता. कारण, इथे मुस्लीम केवळ पाच टक्के असले, तरीसुद्धा त्यांना विरोध केला असता, तर त्या विरोधात बहुसंख्य हिंदू जनतेचे एकत्रीकरण झाले असते. संतकवी तिरुवल्लुवर यांचे कुळ, जात, धर्म शोधत ते हिंदू नाहीत, असा तथ्यहीन पुरावा हीन प्रचार करणारा काँग्रेस, डीएमके आणि पीएमके पक्ष हे पक्ष संत तिरुवल्लुवर यांच्या आडून हिंदू संस्कृती आणि विचारांना मुख्यत: हिंदूंना विरोध करत आहे. हा विरोध म्हणजेच, हिंदूंच्या ऐक्याची भीती आहे. तामिळनाडूमध्ये सनातन हिंदू जनरितीचा पाया संतकवी तिरुवल्लुवर यांनी रचला. त्या अनुषंगाने भविष्यात तामिळनाडूचे हिंदू त्यांच्या सामाजिक आणि राजकीय ऐक्याने तामिळनाडूमध्ये हिंदूविचार सत्तेचा कळस रचतील, अशी आशा आहे; नव्हे तो दिवसही नक्कीच येईल, ज्यादिवशी तामिळचे हिंदू म्हणतील ‘ये भगवा रंग ये भगवा रंग, मुझे चढ गया भगवा रंग, ये भगवा रंग...।’

९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121