सैफच्या हल्लेखोराला पकडल्याने किरीट सोमय्यांनी मानले पोलिसांचे आभार!
19-Jan-2025
Total Views | 45
मुंबई : सैफ अली खानवर ( Saif Ali Khan ) हल्ला केलेल्या आरोपीला दि. १८ जानेवारीच्या मध्यरात्री पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेतले. यावर माजी खासदार, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांचे आभार मानले. आरोपी हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे निदर्शनास आले असून यावर पोलिस अधिक चौकशी करणार आहेत.
सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला. आरोपीने चाकूने सहा वार केले. त्यानंतर आरोपी पसार झाला. ही घटना घडताच सैफ अली खानला त्वरित लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री आरोपीला ठाण्यामध्ये पकडण्यात आले असून अधिक चौकशीसाठी त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे.
यावर किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "सैफ अली खानवर हल्ला कारणारा मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद हा घुसखोर बांगलादेशी आहे. त्याची अटक मुंबई पोलिसांनी केली आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्र पोलिसांना मी आवाहन करतो की, त्यांनी या बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात तीव्र कारवाई करावी. या सगळ्यांना पुन्हा बांगलादेशात पाठवावं."
पोलिसांनी आरोपीबद्दल दिलेल्या माहितीत असे समजले आहे की, आरोपी मोहम्मद शहजाद हा ३० वर्षाचा आहे. सैफ अली खानवर हल्ला व चोरीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. यानंतर त्याला न्यायालयात हजर करुन पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे. मगच पुढील तपास करण्यात येईल. प्राथमिक चौकशीनुसार आरोपी चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरी शिरला होता. पुढील चौकशीत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.