अलाहाबादच्या (आताचे प्रयागराज) ‘आनंदभवन’ या भव्य आणि राजेशाही वास्तूमध्ये सुरू असलेल्या पार्टीमध्ये आपल्या आईचा म्हणजेच कमला नेहरू यांचा आपल्या आत्याकडून-विजयालक्ष्मी पंडित यांच्याकडून झालेला अपमान लहानगी इंदिरा पाहते. त्याची तक्रार घेऊन राजकारणात व्यस्त असलेल्या आपल्या वडिलांकडे म्हणजे पं. नेहरू यांच्याकडे जाते. तेथे काही दाद मिळत नाही. मग ती जाते आपले आजोबा मोतीलाल नेहरू यांच्याकडे. तिथेही दाद मिळत नाहीच. तेथे आजोबा मोतीलाल नेहरू यांच्याकडून राजकारणाचे आणि सत्ता म्हणजे काय, ती मिळाल्यास कशी राबवावी, याचे मौलिक धडे मात्र मिळतात. तेथेच सत्ता किती महत्त्वाची असते, हे लहानग्या इंदिरेच्या मनावर ठसते.
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जीवनपट मांडणार्या कंगना राणावत अभिनित आणि दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ या सिनेमाची ही सुरुवात अतिशय प्रभावी म्हणावी लागेल. संपूर्ण सिनेमा बघितल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील भावनिक स्त्री, कुशल राजकारणी, सत्ता प्राप्त होऊन त्याचे रुपांतर लोकशाही संपविण्यासाठी करणारी एक हुकूमशहा, अशा सर्व पैलूंचा उगम कोठेतरी त्यांच्या अस्वस्थ बालपणातच असल्याचे जाणवते. दिल्लीचे राजकारण दीर्घकाळ पाहणार्या ज्येष्ठ राजकीय पत्रकार कुमी कपूर यांचे ‘इमर्जन्सी’ आणि इंदिरा गांधी यांच्या खास सखी पुपूल जयकर लिखित ‘इंदिरा गांधी-एन इंटिमेट बायोग्राफी’ या दोन भरभक्कम पुस्तकांवर आधारित असलेला हा सिनेमा भारतीय राजकारणातील ‘फेनामेना’ ठरलेल्या इंदिरा गांधी यांचा ‘आनंदभवन, अलाहाबाद’ ते ‘१, सफदरजंग रोड, नवी दिल्ली’ असा प्रवास मांडण्यात बर्यापैकी यशस्वी ठरला आहे.
सिनेमातील सर्वच पात्रांची निवड मात्र कमालीची योग्य ठरली आहे. इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार्या कंगना राणावत यांनी त्या उत्तम अभिनेत्री आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. इंदिरा गांधी यांचा समग्र प्रवास साकारण्यापूर्वी त्यांनी इंदिरा गांधी यांचे चरित्र सखोलपणे अभ्यासल्याचे जाणवते. एकाचवेळी करारी राजकारणी आणि त्याचवेळी संजय गांधींसमोर सपशेल शरणागती पत्करणार्या इंदिरा गांधी, आणीबाणी लावल्यावर भयभीत होणे, जनतेला सामोरे जाण्यास घाबरणे, राजकारणात पुन्हा विजय मिळवून जुन्या चुका टाळणार्या इंदिरा गांधी उभ्या करणे राणावतला चांगल्यापैकी जमले आहे.
अनुपम खेर यांनी जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेस अतिशय योग्य न्याय दिला आहे. जयप्रकाश नारायण यांचे करारी, तेवढेच मृदू व्यक्तिमत्त्व त्यांनी उत्तम वठविले आहे. श्रेयस तळपदे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिकाही उत्तम साकारली आहे. त्याचप्रमाणे सतीश कौशिक यांनी बाबू जनजीवन राम यांच्या भूमिकेत चांगलेच रंग भरले आहेत. अभिनेता विशाक नायर यांनी संजय गांधी यांची भूमिका मात्र तंतोतंत वठविली आहे. काहीही झाले तरीही आपल्या आईच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणारा संजय, ‘शॅडो पंतप्रधान’ बनलेला संजय, आणीबाणीमध्ये धुमाकूळ घालणारा संजय आणि अखेरीस आपल्या आईच्या अंगावर धावून जाणारा संजय, हे व्यक्तिमत्त्वातील अधःपतन विशाक नायर यांनी यशस्वी केले आहे. महिमा चौधरी यांनी पुपूल जयकर उत्तम साकारल्या आहेत. चित्रपटाचा वेग आणि संगीतही कालखंडास अगदी साजेसे.
या सिनेमाचे साधारणपणे तीन भाग करता येतील. पहिल्या भागात इंदिरा गांधी यांचे बालपण ते बांगलादेश मुक्तिसंग्राम, दुसर्या भागात देशभरात काँग्रेसची निर्विवाद सत्ता, सत्ता डोक्यात जाणे, कायदेशीर खटले, संजयचा वाढता हस्तक्षेप आणि आणीबाणी, तर तिसर्या भागात आणीबाणी उठविल्यानंतर प्रथम लोकसभा निवडणुकीत पराभव, पुन्हा विजय, खलिस्तानी भिंद्रनवालेस जन्मास घालणे आणि मृत्यू असा आहे.
चिनी आक्रमणाने गलितगात्र झालेल्या नेहरूंनी ‘माय हार्ट गोज विथ पीपल ऑफ आसाम’ असे सांगून शस्त्र टाकल्यावर संतप्त झालेल्या इंदिरा गांधी आसामी जनतेसाठी तेथे धावून जातात. पुढे चीनच्या एकतर्फी युद्धबंदीमुळे आसाम भारतातच राहतो. मात्र, यामध्ये इंदिरा गांधी यांची सक्रियता नेहरूंना आवडत नाही आणि येथूनच दोघांमधील संघर्ष अधिक वाढण्याचा प्रसंग उत्तम रंगविला आहे. त्याचवेळी चिनी आक्रमणामुळे हताश झालेल्या नेहरूंचे ‘पराभूत झालेला व्यक्ती यशस्वी व्यक्तीस सहन करू शकत नाही’ असे यथार्थ वर्णन करणार्या इंदिरा गांधी पुढे बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या नायिका ठरतात. त्यामुळे इंदिरा गांधींमध्ये हा करारीपणा आपल्या हताश वडिलांसारखे व्हायचे नाही, या हट्टातून आल्याचे सिनेमात चपखल दाखविले आहे.
सिनेमात नेहरूंच्या मृत्यूनंतर काँग्रेसमध्ये झालेली यादवी, त्यात इंदिरा गांधी यांनी सर्व ज्येष्ठांना डावलून पंतप्रधान होणे, ही घटना जरा घाईतच उरकल्याचे दिसते. मात्र, बांगलादेश मुक्तिसंग्रामात झळाळून निघालेले इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व सिनेमात प्रभावी ठरते. एकाचवेळी देशास युद्धास तयार करणे, त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेणे आणि त्याचवेळी अमेरिकेच्या निक्सन-किसिंजर जोडगोळीस फाट्यावर मारण्याचे चित्रण भेदक ठरले आहे.
आणीबाणीचा काळा कालखंड अतिशय सविस्तरपणे दाखवण्यात कंगना राणावत यशस्वी ठरल्या आहेत. राजनारायण खटला, निवडणूक रद्द होणे आणि त्यानंतर संजय गांधींच्या साथीने आणीबाणी लादण्याचा प्रसंग प्रभावी ठरतो. विरोधी पक्षांच्या नेत्यांचा तुरुंगवास, अनन्वित अत्याचार, संजय गांधीने दिल्लीतील तुर्कमान गेट येथील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली लोकांना बेघर करणे, जबरदस्ती नसबंदी कार्यक्रम राबविणे, पुढे जनता पक्षाची स्थापना, जनता पक्षातील यादवी आणि इंदिरा गांधी यांचे राजकीय पुनरागमन हा काळ यशस्वीपणे उभा करण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे पंजाबात राजकीय यश मिळविण्यासाठी भिंद्रनवालेस कसे जन्माला घातले आणि त्याचा खात्मा कसा केला, हेदेखील चांगल्या पद्धतीने दाखविले आहे.
कोणत्याही राजकीय नेत्यावर सिनेमा बनविताना केवळ त्याच्या चुकाच अथवा त्याची स्तुतीच दाखवून उपयोग नसतो, तर त्या नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणार्या अगदी लहान लहान घटना, प्रसंगदेखील दाखविणे अतिशय गरजेचे असते. ते दाखविण्यात कंगना राणावत यांना यश आले आहे. आणीबाणीच्या काळात अखेरीस जी. कृष्णमूर्ती यांच्याकडे जाऊन आत्मपरीक्षण करणार्या इंदिरा गांधी, संजयला त्याची जागा दाखवून देणार्या इंदिरा गांधी आणि देशास स्वतःची जहागीर समजण्याचा गांधी-नेहरू कुटुंबाचा दुर्गुणही असलेल्या इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध कंगोरे कंगना राणावत यांनी मोठ्या पडद्यावर उत्तम रंगविले आहेत.
त्याचवेळी इंदिरा गांधी यांना आपण ‘दुर्गा’ म्हटले नाही, असे खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले असतानाही तो प्रसंग चित्रपटात घुसडण्यात आला आहे, असे वाटते. त्याचप्रमाणे राजनारायण आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या व्यक्तिरेखांवर अधिक जोर आवश्यक होता. चित्रपटामध्ये कोठेतरी इंदिरा गांधी यांना ‘व्हिक्टीम’ ठरविण्याचा सूक्ष्म प्रयत्नही जाणवतो. आणीबाणीसाठी पूर्णपणे संजय गांधी यास जबाबदार ठरविण्यात आल्याचे चित्रपट पाहताना जाणवते.
चित्रपटातील आणखीन एक संस्मरणीय व्यक्तिरेखा म्हणजे इंदिरा गांधी यांचे खासगी सचिव आर. के. धवन यांची. ही भूमिका साकारली आहे ती दर्शन पांड्या यांनी. किरमिजी रंगाचा सफारी आणि डोळ्यांवर काळा गॉगल लावून इंदिरा गांधींसोबत कायम सावलीसारखे सोबत राहणे, आपला नेता चुकत आहे, हे कळत असूनही आपली मर्यादा न ओलांडणे आणि आपल्या नेत्याचे सदैव हित चिंतणारे धवन दर्शन पांड्या यांनी चांगल्याप्रकारे साकारले आहेत.
एकूणच इंदिरा गांधी यांचा जीवनपट उलगडणारा हा चित्रपट विशेषकरुन आजच्या पिढीला इतिहासात डोकावण्याची संधी देणारा आणि ७०-८०च्या पिढीतील इंदिरापर्व अनुभवलेल्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा म्हणता येईल.
चित्रपटाचे नाव : इमर्जन्सी
दिग्दर्शक : कंगना राणावत
कलाकार : कंगना राणावत, अनुपम खेर, सतिश कौशिक, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी
संगीत : जी. व्ही. प्रकाश कुमार