‘कम्युनल वॉयलेन्स इन बांगलादेश’

    19-Jan-2025   
Total Views | 50
Sahar Zaand

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्याच्या घटना अद्याप थांबलेल्या नाही. तेथील स्थानिक माध्यमांमुळे त्या हळूहळू समोरही येत आहेत. ब्रिटिश-इराणी पत्रकार सहार झांड यांनी त्यांच्या बांगलादेश दौर्‍यादरम्यान, तेथे होत असलेला जातीय हिंसाचार आणि त्यामुळे हिंदूंची झालेली दुर्दशा याचा आढावा घेतला. त्यासंदर्भातला एक ‘रेडिओ माहितीपट’ नुकताच युट्यूबवर प्रदर्शित झाला असून, त्यातून विविध गोष्टींचा खुलासा झाला आहे. त्या माहितीपटाविषयी...

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर, बांगलादेशाततील हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रकरणांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजीपासून सुरू झालेल्या या मालिकेला, अद्याप पूर्णविराम लागलेला नाही. पहिल्याच तीन दिवसात हिंदू मंदिरे, दुकाने आणि स्थानिक व्यवसायांवर किमान २०५ हल्ले झाल्याची माहिती आहे. बांगलादेशातील इस्लामिक कट्टरपंथींनी एकूण ६० हिंदू शिक्षक, प्राध्यापक आणि सरकारी अधिकार्‍यांना त्यांच्या पदांचा राजीनामा देण्यास भाग पाडले. येथील अल्पसंख्याक समुदायाला आता ‘जमात-ए-इस्लामी’ मध्ये सामील होण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा खुलासाही, अलीकडेच मानवाधिकार कार्यकर्ते आणि निर्वासित बांगलादेशी ब्लॉगर असद नूर यांनी केला. आतापर्यंत हिंदूविरोधी हिंसाचाराला ‘बनावट’, ‘अतिरंजित’ किंवा ‘राजकीय प्रेरित’ म्हणून, त्याचे गांभीर्य कमी करण्याचे अनेक प्रयत्न झाले. या एकूण परिस्थितीचा आढावा, तेथील प्रकरणांची तपासणी आणि अहवाल हा एका ‘रेडिओ माहितीपटातून’ मांडण्यात आला आहे. ‘वॉईसेस ऑफ चेंज’ या बांगलादेशी युट्यूब चॅनलवर ‘कम्युनल वॉयलेन्स इन बांगलादेश : द प्लाईट ऑफ हिंदूज इन बांगलादेश’ (बांगलादेशात जातीय हिंसाचार : हिंदूंची झालेली दुर्दशा) या शीर्षकाखाली, नुकतीच चार भागांची मालिका प्रदर्शित करण्यात आली. ‘वॉईसेस ऑफ चेंज’ हे उपेक्षित समुदायांच्या कथा, संघर्ष आणि यशाचा विस्तार करण्यासाठी समर्पित व्यासपीठ आहे. या मालिकेत ब्रिटिश-इराणी पत्रकार सहार झांड यांनी, बांगलादेशी हिंदू समुदायाच्या दुर्दशेचे दस्तावेजीकरण केले आहे. मालिकेचा प्रत्येक भाग १३ ते १४ मिनिटांचा आहे.

बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या म्हणण्यानुसार, सरकार सत्तेत आल्यापासून येथील अल्पसंख्याकांवर हल्ले झालेले नाहीत. त्यांचा हा दावा पत्रकार झांड यांनी या मालिकेच्या माध्यमातून खोडून तर काढलाच आहे पण, बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची सद्यस्थितीची माहिती घेताना आलेले अनुभवही यात मांडले आहेत. मालिकेच्या कामासाठी त्यांनी स्थानिक हिंदू कार्यकर्ते बनमाली आणि सुकांतो यांची मदत घेतल्याचे कळते. पत्रकार झांड यांनी सर्वप्रथम एका हिंदूबहुल गावाला भेट दिली. त्या गावात कट्टरपंथींच्या जमावाने, एका हिंदू कुटुंबाचे धान्याचे भांडार जाळले होते. इतकेच नाही, तर एक जळलेले कोठार, जळलेला पेंढा आणि पिके त्यासोबतच कोसळलेले छप्पर अशा विदृप झालेल्या गोष्टी त्यांनी तिथे पाहिल्या. पत्रकार झांड यांच्या म्हणण्यानुसार, गावात कोणीही जखमी झाले नसले, तरी कोठाराच्या मालकासाठी हे नुकसान भयंकर आहे. जवळजवळ एक वर्षाच्या साठवलेल्या उत्पन्नाची, एका क्षणात नासधूस झाल्याने ते अद्यापही त्याच धक्क्यात जगत आहेत. पत्रकार झांड यांना एक गोष्ट लक्षात आली की येथील पीडित, कट्टरपंथी जमावाच्या सूडाच्या भीतीने मोकळेपणाने माध्यमांशी बोलत नसल्याचे दिसते.

मालिकेच्या एका भागातून अशी माहिती मिळाली की, उत्तर बांगलादेशात दर आठवड्याला सात ते आठ हल्ल्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. स्थानिक हिंदू कार्यकर्ते बनमाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू समुदायावर दररोज हल्ले होत असून, एकट्या उत्तर बांगलादेशात दर आठवड्याला सात ते आठ प्रकरणांची नोंद होतेच होते. यामध्ये बलात्कार, खंडणी, घरे-मंदिरांची नासधूस आणि अगदी खून यांचाही समावेश आहे. त्यामुळे बहुतेक लोक देश सोडण्याच्या विचारात आहेत. बांगलादेशातील प्रत्येक हिंदूंची ही योजना आहे. त्यांना असे वाटते की, या देशात त्यांच्यासाठी काहीही उरले नाही. स्थानिक हिंदू कार्यकर्ते सुकांतो यांच्या माहितीनुसार, बांगलादेशातील हिंदूंनी जेव्हा भारतात पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सीमेवरील कडेकोट बंदोबस्तामुळे त्यांना परतावे लागले.

या मालिकेत एका १४ वर्षीय हिंदू मुलगा जयंताबाबत घडलेल्या घटनेचा उलगडा झाला आहे. ज्याला ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’च्या जवानांकडून, भारतात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मारण्यात आले. जयंताच्या आईलासुद्धा असे वाटले की, तो सीमेवरूनच परत येईल मात्र तो परत आलाच नाही.

सहार झांड यांनी बांगलादेशात दौर्‍यादरम्यान, कट्टर इस्लामिक धर्मगुरू महमुदुल हसन गुनोवी यांच्याशीदेखील संवाद साधल्याचे मालिकेतून स्पष्ट होते. ते म्हणाले, “अलीकडच्या काळात बांगलादेशात इस्लामी अतिरेकी वाढताना दिसत आहेत. अनेकजण अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचा निषेध करत असताना, काही इस्लामिक धर्मगुरूंवर हिंसाचार भडकवण्याचा, जातीय तणाव वाढवल्याचा आरोप आहे.” या उद्देशाने झांड यांनी, ती महमुदुल हसन गुनोवी या इस्लामिक धर्मगुरूशी छोटेखानी मुलाखत घेतली. जो ‘हेफाजत-ए-इस्लाम बांगलादेश’ या अतिरेकी गटाचा सदस्य आहे. हसीना यांचे सरकार पडण्यापूर्वीच त्यांची, जामिनावर सुटका झाली होती. मालिकेतून महमुदुल हसन गुनोवी याचे वक्तव्य समोर आले. मोहम्मद पैगंबराचा अपमान करणार्‍या व्यक्तीला ठार करून एका जमावाने खरे तर न्यायच मिळवून दिला. त्यामुळे लोकांना कळेल की, हा इस्लामचा कायदा आहे. जर कोणी पैगंबराचा अपमान केला, तर तो मारण्यायोग्य आहे. अशा प्रकारचा काहीसा अर्थच त्यातून स्पष्ट होतो. बनमाली आणि सुकांतो यांनी निदर्शनास आणून दिले की, महमुदुल हसन गुनोवीच्या प्रक्षोभक वक्तृत्वामुळे आणि इतर मौलवींच्या हिंदूविरोधी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

पत्रकार सहार झांड यांनी एका शिव मंदिराला भेट दिली. जे इस्लामिक कट्टरपंथींनी केलेल्या हल्ल्यामुळे उद्ध्वस्त झाले असून, सध्या भग्नावस्थेत आहे. त्यांनी पीरगंज येथील सतीदा हिंदू स्मशानभूमीचे अध्यक्ष शंकर राय यांची भेट घेतली. त्या भेटीतही कट्टरपंथींनी केलेल्या उन्मादाच्या कथा बाहेर आल्या. शंकर राय यांच्या म्हणण्यानुसार, कट्टरपंथींची इतकीच इच्छा होती की, हिंदूंनी जमीन त्यांच्या ताब्यात देऊन बांगलादेशातून निघून जावे.

याच भेटीदरम्यान, पत्रकार सहार झांड आणि त्यांच्या सहकार्‍यांवर माहिती संकलन करत असताना झालेल्या हल्ल्याबाबत सांगितले. त्यांचा साथीदार गाडीच्या दिशेने जात असताना, एका जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गाडीच्या चाकाखाली दडग-वीटा अडकल्यामुळे, त्यांना तेथून पळही काढता आला नाही. जवळजवळ तीन तास ते गाडीतच बसून होते. जमावातील काहीजण गाडीवर थुंकत होते, काहीजण गाडीवर मारत होते. नंतर पोलीस आल्यावर प्रकरण शांत झाले. बांगलादेशात अशा घटना रोज कुठे ना कुठे घडत असूनही, बनमाली आणि सुकांतो बांगलादेश सोडण्यास तयार नाहीत आणि स्वबळावर समुदायासाठी लढण्यास तयार आहेत.

बांगलादेशात गेल्या काही महिनांत स्वामी चिन्मय कृष्ण दास यांना झालेली अटक, त्यांच्या बाजूने लढणार्‍या हिंदू वकिलांवर झालेले हल्ले, हिंदू धर्माच्या प्रतिकांवर होत असलेले जिहादी हल्ले, अशा विविध घटना बांगलादेशात आजही घडत आहेत. या घटनांविरोधात संघटित होऊन, युनूस सरकार विरोधात आवाज उठवण्याचे धाडस येथील हिंदू आता करू लागलेत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आपली जबाबदारी आहे. भारतानेही याबाबत संयमाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातून युनूस सरकार काहीतरी धडा घेईल आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना योग्य न्याय देईल, हीच अपेक्षा.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121