जिवां मानवा हेंचि कैवल्य साचें॥

    19-Jan-2025   
Total Views | 169
Shree Ram

आधुनिक भारताच्या इतिहासातील अविस्मरणीय असा दिवस म्हणजे पौष. शु. द्वादशी (प्रतिष्ठा द्वादशी) दि. २२ जानेवारी २०२४. हिंदू समाजाची आराध्य देवता याच दिवशी त्यांच्या मंदिरातील गर्भगृहात प्रतिष्ठित झाली, असा ऐतिहासिक आनंदी दिवस. या गर्भगृहात नुकतेच दर्शनासाठी जाता आले, यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. खूप महिन्यांची इच्छा पूर्ण झाली आणि गर्भगृहातील बालक रामाचे दर्शन म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण होता. खरे तर गर्भगृहात त्या विग्रहाकडे सतत बघत राहावे, इतकी देखणी आणि नितांत सुंदर श्रीरामललाची मूर्ती आहे. सहा वर्षीय तो बाल राम बघून वाटते की, त्याला सतत बघतच राहावे. त्याचे डोळे इतके बोलके आहेत की, शब्दांत त्या भावना मांडताही येत नाही. तेथून निघताना मनात असंख्य आठवणी होत्या आणि त्या ऐतिहासिक भूमीतील संघर्षही नकळत आठवणीत आला. त्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

आयोध्येची बखर’ वाचत असताना त्याचे पुरातन संदर्भ आणि आधुनिकता यांबद्दल समजले. अत्यंत प्राचीन काळापासूनच अयोध्या ही भारतातील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुण्यशील तीर्थनगरी आहे. अयोध्या नगरीची स्थापना कुठल्या वर्षी झाली, हे सांगणे मात्र अशक्य आहे. वेद, पुराणे आणि संस्कृत साहित्यातील अयोध्या अनेक तज्ज्ञांच्या मते महाभारतीय युद्ध इसवी सन पूर्व तीन हजार वर्षे झाले. रामायणाचा काळ हा याही पूर्वी काही शतके होता, असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे. एवढ्या जुन्या गोष्टींचा अचूक तपशीलवार इतिहास जगात इतरत्रही अभावाने बघायला मिळेल. ‘अयुद्ध’ या शब्दापासून ‘अयोध्या’, म्हणजे जिंकून घेण्यास कठीण, हा शब्द वाचनात आला. अयोध्येचा प्रथम उल्लेख अथर्ववेदात आहे.

अष्टाचक्रा नवद्वारा देवानां पूरयोध्या।
तस्यां हिरण्यः कोशः स्वर्गो ज्योतिषावृतः॥ अथर्ववेद (१०.२.३१)

अर्थात, देवनिर्मित, पुरुषदेहरुपी, अष्टाचक्रा आणि नवद्वारा अयोध्या (अजिंक्य) नगरीमध्ये सुवर्णनिधी आणि ज्ञानपूर्ण स्वर्ग साठवला आहे.

प्रभाजमानां हरिणीं यशसा संपरिवृताम्।
पुरं हिरण्यमयीं ब्रह्मा विवेशापराजिताम्॥ (अथर्ववेद १०.२.३३)

अर्थात, तेजस्वी, सुखमय आणि यशपूर्ण अशा सुवर्णमय, अपराजित नगरीमध्ये ब्रह्म निवास करतात. अर्थात, हे वर्णन शरीर नामक नगरीचे असण्याचीही शक्यता आहे. परंतु, ‘अयोध्या’ नावाचा उल्लेख जरूर आहे, हे नाकारता येणार नाही. अयोध्येला इतरही अनेक नावे होती आणि आहेत. शिवसंहितेत उल्लेख आल्याप्रमाणे ‘अयोध्या’, ‘नन्दिनी’, ‘सत्यनामा (सत्या)’, ‘साकेत’, ‘कोसल राजधानी’, ‘ब्रह्मपुरी’, ‘अपराजिता’ इत्यादी नावे अयोध्येचीच आहेत. वाल्मिकी रामायणाच्या बालकांडात शरयू नदीच्या तीरावर धनधान्याने भरलेली अशी लोकप्रसिद्ध अयोध्या नगरी आहे, असा अयोध्येचा उल्लेख आला आहे. भारतवर्षातील सहा अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या नगरींमध्ये अयोध्या क्रमांक एकवर आहे. एकात्मता स्तोत्रातील हा श्लोक त्याचेच महत्त्व विशद करणारा आहे.

अयोध्या मथुरा माया काशी काञ्चि अवन्तिका।
एताः पुण्यतमाः प्रोक्ताः पुरीणामुत्तमोत्तमा॥
(ब्रह्माण्ड पुराण ४:४०:९१)

अर्थात, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका या उत्तमात उत्तम व पुण्यदायक अशा नगरी आहेत. इक्ष्वाकु वंशीयांनी अयोध्येला आपली राजधानी केले. या वंशात मांघातृ, अंबरीष, हरिश्चंद्र, सगर, भगीरथ, दिलीप, रघु, अज, दशरथ, प्रभू रामचंद्र इत्यादी अतुल पराक्रमी आणि नीतिमान सम्राट होऊन गेले. रामायणात शरयू नदीचा उगम मानसरोवरातून झाला असल्याचे वर्णिले आहे. हे पुरुषश्रेष्ठ रामा, कैलास पर्वतावर ब्रह्मदेवाने मनाच्या योगाने एक उत्कृष्ट सरोवर निर्माण केले व ते मनानेच निर्माण केलेले असल्याने ‘मानस’ याच नावाने प्रसिद्ध झाले. त्या सरोवरापासून जी नदी निघाली ती अयोध्येसमीप वाहत आहे. ती सरोवरापासून निघाल्यामुळे ‘सरयू’ या नावाने प्रसिद्ध झाली. (रामायण, बालकांड, २४/८-१०) याच संस्कृतातील सरयूला मराठीत ‘शरयू’ म्हणतात. शरयूचा उल्लेख अतिप्राचीन अशा ऋग्वेदात प्रथम आढळतो.

सरस्वती सरयुः सिन्धुरुर्मिभिर्महो महीसखा यन्तु वक्षणीः।
(ऋग्वेद १०/६४/९)

अर्थात, सरस्वती, शरयू आणि सिंधू या भक्तरक्षक नद्या, तसेच मातृतुल्य उदक देवता आम्हास मधुर जल देवो. (१) ७६.७.
वाल्मिकी रामायणापासून सर्व हिंदू धर्मग्रंथांमध्ये अयोध्यानगरीचा उल्लेख आहे. महाभारतातील वनपर्वातसुद्धा ‘रामोपाख्यान’ म्हणून एक प्रकरण असून त्याद्वारे रामकथा संक्षिप्तपणे आलेली आहे. सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये श्रीरामाची चर्चा विष्णूचा एक अवतार या स्वरुपात झालेली आहे. कालिदास विरचित ‘रघुवंश’ महाकाव्यात राम आणि सीता पुष्पक विमानातून अयोध्येला येत असतानाचे वर्णन आहे. अशी ही अयोध्या युगानुयुगे वैभवशाली आणि परिपूर्ण आहे. अशा अयोध्येत पूर्ण पुरुषोत्तम श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण झाले आणि कार्य प्रगतिपथावर आहे, पण रामजन्मभूमीवरील मंदिर दर्शनासाठी सुरू आहे. करोडो रामभक्त श्रीरामललाचे दर्शन घेत स्वतःला धन्य मानत आहेत.

या अवघ्या जगाचा जो संपूर्ण आनंद तो आनंदसिंधु म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. गोस्वामी तुलसीदास म्हणतात-
जो आनंद सिंधु सुखरासी।
सीकर ते त्रैलोक सुपासी॥

त्या आनंदसिंधूच्या एका बिंदूवर हे सगळे जग वेडे झाले आहे. मग त्या आनंदसिंधूची कल्पना करा. वेदांनी, उपनिषदांनी आणि सगळ्या शास्त्रांनी श्रीरामांबद्दल जर कुठला अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरला असेल, तर तो ‘आनंद’ आहे. राजा दशरथ अर्थात आपल्या पित्यासाठी रामचंद्रांनी पुत्रत्वाचा कोणता दिव्य आदर्श उत्पन्न केला, हे रामकथेच्या वाचकाला सांगायला नको. ते स्वतःच एके ठिकाणी यासंबंधाने कृतार्थाचे उद्गार काढताना म्हणतात,

न सर्वे भ्रातरस्तात भवन्ति भरतोपमाः।
मद्विधा वा पितुः पुत्राः सुहृदो वा भवद्विधाः॥
(वाल्मिकी रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १८)

माझ्यासारखा पुत्र मागे झाला नाही व पुढे होणार नाही. भावनेच्या पाण्याने पुत्रकर्तव्याचा रामचंद्रांच्या अंतःकरणातील बंध शिथिल करण्यासाठी भरत चित्रकुटावर आपल्या नेत्रांतून अश्रूंचा पूर वाहावत असताना रामांनी दिलेले अखेरचे उत्तर त्यांच्या जीवनपटातील या विशिष्ट बाजूवर संपूर्ण प्रकाश टाकणारे आहे.

लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत्।
अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः॥
(वाल्मिकी रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ११२)

अर्थात, लक्ष्मी चंद्राला सोडून जाईल अथवा हिमालय आपली शीतलता सोडील. समुद्र मर्यादेचे उल्लंघन करील, पण मी माझ्या पित्याची प्रतिज्ञा कधीही भंग पावू देणार नाही. कर्तव्य मार्गाचा भरताला उपदेश करीत असताना राम उलटे भरतालाच असे म्हणतात,

सोऽहं वनमिदं प्राप्तो निर्जनं लक्ष्मणान्वितः।
सीतया चाप्रतिद्वन्द्वः
सत्यवादे स्थितः पितुः॥
भवानपि तथेत्येव पितरं सत्यवादिनम्।
कर्तुमर्हसि राजेन्द्र क्षिप्रमेवाभिषेचनात्॥
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः पितन्यः पाति सर्वतः॥
एष्टव्या बहवः पुत्रा गुणवन्तो बहुश्रुताः।
तेषां वै समवेतानामपि कश्चिद्गयां व्रजेत्॥
एवं राजर्षयः सर्वे प्रतीता रघुनन्दन।
तस्मात्त्राहि नरश्रेष्ठ पितरं नरकात्प्रभो॥
(वाल्मिकी रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १०७)

केवळ पित्याची आज्ञा पाळण्यासाठीच लक्ष्मण आणि सीता यांसह मी निर्जन वनात आलो आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळणे हे तुझेही कर्तव्यच नाही काय? पिता सत्यवादी व्हावा, यासाठी माझ्याकडे सोपविलेल्या त्यांच्या एका आज्ञेचे मी जसे परिपालन केले, तसेच तूही त्याच्या दुसर्‍या आज्ञेचे परिपालन केले पाहिजे. सत्यवादी पित्याने तुला राज्याभिषेक करून घेण्याची आज्ञा दिलेली आहे. पिता सत्यवादी ठरावा म्हणून ताबडतोब राजसिंहासनाचा अंगीकार करणे हेच तुझे कर्तव्य आहे. नरकापासून जो पित्याला वाचवितो आणि सर्व प्रकारे अधःपतनापासून त्याचे संरक्षण करतो, त्यालाच ‘पुत्र’ असे म्हणतात. पुष्कळ गुणवान् पुत्र उत्पन्न करावे, म्हणजे निदान त्यांतला एकतरी गयेला जाऊन पित्याला सद्गति देईल व आपले पुत्रकर्तव्य बजावील, असे सर्व राजर्षि म्हणतात. इतर कोणाकरिता नाही, तरी निदान माझ्याकरिता तू आपल्या पित्याला अधःपतनापासून वाचव व त्यासाठी तरी राज्याचा स्वीकार कर. भरताने त्यांना मी वनवास करतो व आपण राज्य करा, म्हणजे विनिमयाने पित्याच्या आज्ञेचे परिपालन होईल, असे सूचविल्यावर रामचंद्रांनी जे धीरोदात्त उत्तर दिले आहे, ते त्यांच्या पितृआज्ञा परिपालनाच्या कल्पना किती नाजूक व उदात्त होत्या, हे दर्शविते. ते म्हणतात,

उपाधिर्न मया कार्योंवनवासे जुगुप्सितः।

अर्थात, रामविनिमयाची कल्पनाच त्यांच्या अभिजात चारित्र्याला अत्यंत अपमानास्पद वाटते. ज्याला जी आज्ञा दिलेली आहे, त्याच आज्ञेचे त्याने परिपालन केले पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. श्रीरामांच्या हृदयातल्या पित्याविषयीच्या त्यांच्या खर्‍या उत्कट भावना वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकाण्डाच्या १८व्या सर्गात उचंबळून आलेल्या आहेत. कारण, तेथे त्यांच्या भावनांना मोकळे करण्यात आले आहे.

राम वनवासात निघताना कैकेयीला राजा दशरथ म्हणतात,

नालं द्वितीयं वचनं पुत्रो मां प्रतिभाषितुम्।
स वनं प्रव्रजेत्युक्तो बाढमित्यैव वक्ष्यति॥
यदि मे राघवः कुर्याद्वनं गच्छेति चोदितः।
प्रतिकूलं प्रियं मे स्यान्न तु वत्सः करिष्यति॥
(वाल्मिकी रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १२)

अर्थात, माझ्या शब्दांवर राम एक अक्षरदेखील बोलणार नाही, अशी माझी खात्री आहे. मी ‘वनात जा’ असे म्हटल्याबरोबर ‘होय’ असेच तो म्हणेल. मी वनात जावयास सांगितल्यावर राम जर माझे न ऐकता, प्रतिकूल वर्तन करील, तर माझे अत्यंत प्रिय होईल. पण, तो तसे करणार नाही (हीच अत्यंत दुःखाची गोष्ट आहे). राजाचा हा विश्वास किती यथार्थ होता! सर्व विश्वाच्या नियमनाची प्रचंड शक्ती असूनही एखाद्या गवताप्रमाणे राज्यलक्ष्मीला लाथाडून रामांनी वनवासाचा मार्ग पत्करला. पित्यासाठी पुत्राने आपल्या महान जीवनाचा नंदादीप स्वयंप्रेरणेने जाळला. केवढा हा पुत्रधर्माचा उदात्त आदर्श आहे. अशा आदर्श पुत्राचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले आणि या ५०० वर्षांच्या अथक संघर्षानंतर या राष्ट्र मंदिरात जाताना प. पू. बाळासाहेब देवरस, मोरोपंत पिंगळे, अयोध्या आंदोलनाचे भीष्माचार्य परमहंस रामचंद्र दास, अशोक सिंघल, आचार्य धर्मेंद्र अशा अनेकांचे स्मरण झाले आणि वाटले की, आज हे सर्वजण असते, तर यांना हे भव्य मंदिर बघून किती आनंद झाला असता! पण, काळापुढे कुणाचे चालते? अशा या मंदिरातील गर्भगृहात श्रीरामलला यांचा विग्रह बघून श्री समर्थांच्याच ओळी ओठांवर आल्या,

बहु चांगले नाम या राघवाचे। अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे।
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे।
जिवां मानवा हेंचि कैवल्य साचें॥

जय श्रीराम
८६६८५४११८१

सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक, सुरुवातीला 'नागपूर तरुण भारत' येथे दोन वर्ष स्तंभ लेखन. दै. 'सोलापूर तरुण भारत'मध्ये 'गाभारा' ही मंदिरावर आधारित लेखमाला प्रकाशित. महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी या वृत्तपत्रांसाठी विविध विषयांवर लेखन. इंदूरहून निघणाऱ्या 'मराठी गौरव' या पाक्षिकासाठी लेखन. 'प्रज्ञालोक' या त्रैमासिकात लेखन तसेच 'प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय'. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या 'कालजयी सावरकर' या नावाने प्रकाशित सावरकर विशेषांकात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' या विषयावर लेखन. अनेक दिवाळी अंकांसाठीही लेखन. 'साप्ताहिक विवेक'मध्ये गेली दोन वर्षे झाले 'पद्मगौरव' स्तंभ सुरू. आकाशवाणी व इतरही माध्यमातून सतत लेखन.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121