मुंबई, दि.१८ : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा २१ किमी लांबीच्या बोगद्याचे खोदकाम सुरू आहे. यामध्ये भारतातील पहिल्या ७ किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्यासह १६ किलोमीटरच्या बोगद्याचा समावेश आहे. या बोगद्याच्या कामाची पाहणी शनिवार दि.१८ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती पाहून अत्यंत आनंद वाटतो आहे. भारतात पहिल्यांदा समुद्राखालील बोगदा बांधण्यात येत आहे. यापूर्वी आपण नदीपात्रातून जाणारा बोगदा बांधलेला आहे. हा बोगदा एक तांत्रिक अविष्कार आहे. या बोगद्यातून एकाच वेळी २ ट्रेन २५०च्या स्पीडने धावतील. अशापद्धतीने या बोगद्याचे डिझाईन करण्यात आले आहे. या टनेलमध्ये जाऊन मी आढावा घेतला आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ३४० किलोमीटरचे काम प्रगतीपथावर आहे. नदीवर बांधण्यात येत असलेले पूल प्रगतीपथावर आहे. बीकेसीतील कामेही वेगात सुरु आहे. जपानमधील तज्ज्ञही येऊन पाहणी करून गेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे की, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात जलद वाहतुकीच्या पर्यायांची उपलब्धता करून देणे. हे स्वप्न बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करणार आहे. केवळ अडीच तासात मुंबई अहमदाबाद प्रवास बुलेट ट्रेनमुळे शक्य होणार आहे,"अशी माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली.
तीन तासात होणार मुंबई-अहमदाबाद प्रवास
ही एकूण मार्गिका ५०८ किलोमीटर लांबीची आहे. ५०८ किलोमीटरपैकी गुजरात आणि दादरा नगर हवेलीमध्ये ३५२ किमी तर महाराष्ट्रात १५६ किमी लांबीचा मार्ग असेल. ५०८ किमी लांबीच्या प्रकल्पांच्या कामांचे ११ नागरी पॅकेजमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या बुलेट ट्रेनचा वेग अंदाजे ३२० किलोमीटर प्रतितास इतका असून मुंबई-अहमदाबाद हे अंतर तीन तासात पार होणार आहे. बुलेट ट्रेनने बीकेसी ते ठाणे हे अंतर १० मिनिटांत, बीकेसी ते विरार २४ मिनिटे, बीकेसी ते बोईसर ३९ मिनिटांत पार केले जाईल. पीक अवर्समध्ये २० मिनिटे आणि नॉन-पीक अवर्समध्ये ३० मिनिटांच्या वारंवारतेसह दररोज एका दिशेने ३५ ट्रेन असतील. यामुळे या दोन्ही क्षेत्राच्या औद्योगिक आणि भौगोलिक विकासाला चालना मिळेल.
महाराष्ट्र : प्रगती ठळक मुद्दे
मुंबई (वांद्रे-कुर्ला) स्थानक :
- १८ पैकी ११ लाख घनमीटर खोदकाम पूर्ण
- बेस स्लॅबचे कास्टिंग सुरू
बोगद्यांची कामे
- ३९४ मीटर लांबीचा एडीआयटी बोगदा मे २०२४मध्ये पूर्ण
- शिळफाटा येथे शाफ्ट २, शाफ्ट ३साठीचे खोदकाम पूर्ण
- 'एनएटीएम'च्या तीन बाजूंपासून भुयारीकरण सुरू
- टनेल सेगमेंट कास्टिंग सुरू झाले (2 मीटर रुंद रिंग्स)
महाराष्ट्रातील १३५ किमी लांबीचे व्हायाडक्ट पॅकेज (सी 3):
- फाउंडेशन : २५ किमीचे काम पूर्ण
- पियर : १५ किमी पूर्ण
- ७ पैकी ५ डोंगरी बोगद्यांचे काम सुरू