नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, येत्या ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे. आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या तीन पक्षांमध्ये ही लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाने शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी भाजपने आपले संकल्पपत्राचे अनावरण केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव जे पी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये यशस्वी झालेली लाडकी बहिण योजना दिल्लीमध्ये भाजप राबवणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रानुसार गरीब महिलांना महिन्याला २५०० रूपये दिले जाणार आहेत. त्याच बरोबर एलपीजी सिलेंडर वर ५०० रूपये सबसिडी दिली जाणार आहे. तसेच होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. मातृत्व वंदन योजनेच्या अंतर्गत गर्भवती महिलांना २१ हजार रूपये दिले जातील, तसेच ६ न्युट्रीश्नल कीट दिले जातील. त्याच बरोबर विधवा आणि निराधार महिलांचे पेन्शन देखील ३००० रूपयांपर्यंत वाढवण्यात येईल. त्याच बरोबर अटल कँटीनच्या अंतर्गत, सर्व झोपडपट्टयांमध्ये ५ रूपयात पौष्टीक थाळी देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे.
आम आदमी पक्षाची पोलखोल!
दिल्ली विधानसभेच्या संकल्पत्राचे अनावरण करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात विविध विभागांमध्ये भ्रष्टाचार झाला होता. मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने ३०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला होता. भाजपचे सरकार सत्तेत आल्यास या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. दिल्लीमध्ये भाजपचे सरकार बनल्यावर सगळ्या योजना भ्रष्टाचारमुक्त करण्यात येतील अशी माहिती नड्डा यांनी दिली. महिलांचा सम्मान आणि सशक्तीकरण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्राथमिकता राहिली आहे. भाजपच्या सगळ्याच योजना या महिलांच्या सशक्तीकरणासाठी समर्पीत आहे.