मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याला दोन दिवस उलटले असून हल्लेखोर अजूनही पोलिसांच्या तावडीत आलेला नाही. पण 'त्या' रात्री वांद्रेतील सदगुरू शरण इमारतीच्या १२ व्या मजल्यावर नेमके घडले तरी काय? अश्या बऱ्याच प्रश्नांची चर्चा केली जात असताना एलियामाने दिलेला 'प्रथम माहिती अहवाल' (एफआयआर) समोर आला आहे.
'एलियामा' यांनी दिलेल्या एफआयआर नुसार ती गेल्या चार वर्षांपासून सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्याकडे काम करते. घरात सैफ याचे कुटुंब ११ व्या आणि १२ व्या माळ्यावर राहतात. ११ व्या मजल्यावर तीन खोल्या आहेत. त्यातील एक खोली सैफ आणि करीनाची आहे. दुसऱ्या खोलीत 'तैमूर' आणि त्याची देखभाल करणारी आया 'गीता' राहते. तिसऱ्या खोलीमध्ये लहान मुलगा जहागीर उर्फ 'जयबाबा' आणि त्याच्या देखभालीसाठी 'एलियामा' आणि 'जुनू' राहतात.
"१५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता मी जेहबाबाला खाऊ घातले. जुनू आणि मी खालच्या पलंगावर झोपले असताना १६ जानेवारीच्या मध्यराञी २ च्या सुमारे कुठल्या तरी आवाजाने मी उठले . तेव्हा बाथरूमचे लाईट सुरू असल्याचे आणि दरवाजा उघडा असल्याचे मी पाहिले. करीना कपूर मुलाला पाहायला आल्या असतील असे मला वाटत असतानाच बाथरूमच्या दरवाज्यावर मी टोपी घातलेल्या व्यक्तीची सावली पाहिली. असे 'एलियामा' ने तिच्या एफआयआर मध्ये म्हटले आहे.
त्या आवाजाने जहागीर जागा झाला. तेव्हा हल्लेखोराने त्यांना गडबड न करण्याची धमकी दिली. पण जुनू ही 'आया' ओरडत हॉलकडे पळाली. त्या आवाजामुळे सैफ धावत खोलीच्या दिशेने आला. आरोपीच्या एका हातात लाकडी वस्तू तर दुसऱ्या हातात हेक्सा ब्लेड होता. याच हेक्सा ब्लेडने सैफ याच्यावर हल्ला केला गेला. गीता सैफ खानला वाचवायला गेली असताना आरोपीने तिच्यावरही हल्ला केला. सैफ जखमी असतानाही त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तो संघर्ष करत होता. या सर्व गोंधळामुळे हल्ला करणार व्यक्ति सावध झाला आणि त्याने तिथून लागलीच पळ काढला.
ही सर्व मंडळी लागलीच १२ व्या माळ्याकडे धावली. तोपर्यंत इतर स्टाफ पैकी रमेश, रामु आणि पासवान हे खालच्या माळ्यावर धावले,खोलीचा तपास घेईपर्यंत आरोपी तिथून फरार झाला होता. त्यानंतर तातडीने सैफ यांना रिक्षाने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या पाठीत रूतलेला चाकूचा तुकडा शस्त्रक्रियेने काढण्यात आला. या सर्व घटनेचा तपशील सैफ याच्या घरातील नर्स 'एलियामा फिलीप' यांनी दिला.