सीरियामध्ये गेल्या महिनाभरात ११६ बालके मृत्युमुखी पडली. म्हणजे, दिवसाला सरासरी चार बालके! पण, या बालकांवर कुणीही हल्ला केला नव्हता. हळूहळू सीरिया गृहयुद्धातून बाहेर पडतो आहे. मात्र, या गृहयुद्धातील न वापरलेली किंवा न फुटलेली विस्फोटके अजूनही सीरियाच्या भूमीत विखुरलेली आहेत. परिसरातील सुप्त अवस्थेतील बॉम्ब, विस्फोटक शेल्स, ग्रेनेड किंवा क्लस्टर म्युनिशनच्या स्फोटाने ही बालके मुत्युमुखी पडली. ‘युनिसेफ’सह संपूर्ण जगाने याबाबत शोक आणि चिंता व्यक्त केली आहे. आधीच अनेक दशके सुरू असलेल्या सीरियामध्ये लाखो लोक मरण पावले आणि तितकेच सीरियातून विस्थापितही झाले. ही हिंसा ५३ वर्षे सीरियामध्ये अबाधित सत्ता गाजवणार्या अल असद घराण्याची एकहाती राजवट उलथवण्यासाठी झाली होती. ती सत्ता उलथली. ‘एचटीएस’ म्हणजे ‘हैयत (हयात) तहरीर अल-शाम’ या विद्रोही संघटनेने सत्ता काबीज केली. देशात अनेक दशक हिंसेला एक उपक्रम म्हणून राबविणारी संघटनाच सत्तेशी बांधील झाली. त्यामुळे देशात हिंसेला पूर्णविराम नसला, तरी स्वल्पविराम लागला असे चिन्ह होते. नेमके याच काळात या बालकांचा मृत्यू झाल्याने सीरियामध्ये अस्वस्थ वातावरण आहे.
गृहयुद्धातून बाहेर पडलेल्या आणि तरीही अस्वस्थ असलेल्या सीरियाच्या समस्येबद्दल सौदी अरेबियाने दि. १३ जानेवारी रोजी १७ देशांची परिषद आयोजित केली होती. या परिषदेचे दोन भाग होते. पहिल्या भागात इस्लामिक राष्ट्रांची सीरियासंदर्भात बैठक, तर दुसर्या भागात पाश्चिमात्य राष्ट्रांची बैठक होती. या परिषदेला सीरियाचे परराष्ट्र मंत्री असद अल-शिबानी उपस्थित होते. जॉर्डन, लेबेनॉन, इजिप्त, इराक, तुर्कीए सोबतच अमेरिका, ब्रिटेन, स्पेन, इटली, जर्मनी, युरोपीय संघ आणि संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. या परिषदेमध्ये रशिया आणि इराण या दोन राष्ट्रांना आमंत्रण नव्हते.
या दोन राष्ट्रांना आमंत्रण का नव्हते, याचा मागोवा घेताना जाणवते की, सीरियामध्ये मानवी वस्ती सात लाख सालापासून आहे, असे दिसून आले. इजिप्त, सुमेरिया, हित्ती, मितानी, बॅबिलोन, पर्शिया, ग्रीक, रोम संस्कृती या देशात नांदल्या. मात्र, पुढे इस्लामी देशावर कब्जा केला. त्यानंतर १९२० साली सीरिया फ्रान्सच्या अधीन झाला. मात्र, १९४६ साली सीरिया स्वतंत्र राष्ट्र झाले. या देशातील बहुसंख्य जनता सुन्नी मुसलमान. मात्र, ५३ वर्षे सत्ता गाजवणारे बशर अल असद हे शिया मुसलमान. बशर अल असदच्या सत्तेला इराणसारख्या शिया मुस्लीम देशाचे सर्वार्थाने समर्थन होते. याच काळात ‘इसिस’ आणि ‘अल कायदा’ या संघटना दहशतवादी कारवाया करू लागल्या. या दोन्ही संघटनांतून फुटलेल्या एका गटाने स्वतंत्ररित्या सीरियामध्ये हल्ले करायला सुरुवात केली. या गटाचे नाव ‘हैयत (हयात) तहरीर अल-शाम.’ आज या गटाचा नेता अल-शरा हा सीरियाचा सर्वेसर्वा आहे.
असो. सीरियामध्ये सत्तांतर झाल्यावर सीरियाचे पूर्वीचे सत्ताधारी बशर अल असद यांना रशियाने आसरा दिला. त्यामुळे अल असदवर पूर्णत: मात करायची, तर रशियासारखा बलाढ्य देश त्याच्या बाजूने उभा आहे, हे सत्य सीरियाचे नवे सत्ताधारी दुर्लक्ष करू शकत नाहीत. त्यातच सीरियातील ‘इसिस’ आणि ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटना सीरियाच्या सत्ताधारी ‘एचटीएस’च्या विरोधात आहेत. कारण, या दोन संघटनांतून फुटूनच ‘एचटीएस’ गट तयार झाला होता. त्यामुळे बशर अल असद, सीरियातील दहशतवादी संघटना आणि रशिया यांना शह देण्यासाठी सीरियाच्या नवनिर्वाचित सत्ताकेंद्राला कुणीतरी सोबत हवे होते. या आयामात सौदी अरेबिया हेच सीरियासोबत मैत्रीसाठी योग्य राष्ट्र होते. कारण, सौदी अरेबिया इस्लामिक राष्ट्र आहे आणि अमेरिकेशी, युरोपियन देशाशी जवळीक असणारे राष्ट्र आहे. सौदीची अमेरिकेशी दोस्ती असल्याने साहजिकच बशर अल असदला आसरा देणार्या रशियाशी सौदीचे सौख्य नाही. त्यामुळे सध्या सौदी अरेबिया आणि सीरियाची मैत्री रंगली. दुसरीकडे इराणच नाही, तर आपणही मुस्लीम राष्ट्रांसाठी पुढाकार घेतो, हे दाखवण्यासाठी सौदी अरेबियानेही सीरियाला सर्वार्थाने सहकार्य करण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळेच तर सौदी अरेबियाने सीरियासाठी १७ देशांची परिषद घेतली. पाश्चिमात्य राष्ट्रांनी नव्या सीरियाच्या उभारणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. सीरिया रक्तरंजित गृहयुद्धाने होरपळला आहे. येणारा काळच ठरवेल की, नवा सीरिया कट्टरपंथीयांचा देश बनेल की, उदार मानवतावादींचा देश.
९५९४९६९६३८