नवी दिल्ली : क्रिडाक्षेत्रात भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंचा १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला. शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरास्कार सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय भारतीय पुरूष हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह यांना सुद्धा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमारलाही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाते. २०२४ या वर्षी तब्बल ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. या व्यतिरीक्त क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सुच्चा सिंह ( अॅथलेटीक्स) आणि मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग) यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. खेळाडूंना घडवण्यात त्यांच्या गुरुजणांचा सुद्धा तितकाच महत्वाचा वाटा आहे. सुभाष राणा यांना पॅरानेमबाजी, दीपाली देशपांडे यांना नेमाबाजी व संदीप सांगवान यांना हॉकी या खेळासाठी द्रोणाचार्य पुरस्कारने सन्मानित करण्यात आले, तसेच बॅडमिंटन या खेळासाठी एस. मुरलीधकरन आणि अर्मांडो एग्नेलो कोलाको यांना फुटबॉलसाठी द्रोणाचार्य (जीवनगौरव) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.