वात्सल्य : लहान मुलांसाठी गुंतवणूक योजना

    17-Jan-2025   
Total Views | 38
 Vatsalya scheme

हल्ली लहान मुलांच्या भवितव्याची चिंता ही पालकांना मूल जन्मण्यापूर्वीपासूनच सतावत असते. दोन्ही पालक कमवते असो वा एखादा पालक कमविणारा असला, तरी आपल्या पाल्याचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात. सध्या सरकारी पातळीवर लहान मुलांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने काही योजना उपलब्ध असून, त्याचा पालकही मोठ्या संख्येने लाभ घेताना दिसतात. पण, काही योजना या अद्याप म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात जनसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, हे मान्य करावे लागेल. अशीच एक योजना म्हणजे, ‘वात्सल्य योजना.’ पाल्याचे वय १८ वर्षे झाल्यावर हे खाते नियमित ‘नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस)’ खात्यात परिवर्तित केले जाते. तेव्हा, ही योजना नेमकी काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

केंद्र शासनाने लहान मुला-मुलींसाठी ‘वात्सल्य’ ही योजना कार्यरत केली आहे. या योजनेत पालक त्यांच्या पाल्याचे खाते, पाल्य जन्मल्यापासून ते पाल्य १७ वर्षांचे होईपर्यंत केव्हाही उघडू शकतात. पाल्याचे वय १८ झाल्यावर हे खाते नियमित ‘नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस)’ खात्यात परिवर्तित केले जाणार. ते पाल्य मोठे होऊन कमावू लागल्यावर जिथे वात्सल्य खातेधारक नोकरीस लागेल, त्या कंपनीच्या मालकालाही त्याची रक्कम ‘एनपीएस’मध्ये भरावी लागेल. ‘एनपीएस’ योजना सुरू झाल्यापासून या योजनेत चांगला परतावा मिळत आहे. ‘एनपीएस’ ही योजना २००४ सालापासून सरकारी कर्मचार्‍यांसाठी व २००९ सालापासून सर्व कर्मचार्‍यांसाठी अमलात आली. अनिवासी भारतीय, परदेशी नागरिकत्व असलेले भारतीयदेखील त्यांच्या पाल्यांसाठी ‘एनपीएस वात्सल्य’ खाते उघडू शकतात.

पाल्याचे नैसर्गिक पालक तसेच, सांभाळकर्ते त्यांच्या पाल्यासाठी या योजनेत खाते उघडू शकतात. यासाठी भारतीयांना ‘केवायसी’ पुरावे सादर करावे लागतात. अनिवासी भारतीयांना पासपोर्ट हा पुरावा सादर करावा लागतो. परदेशी नागरिकत्व असलेल्यांना परदेशातील घराचा, वास्तव्याचा पुरावा सादर करावा लागेल. पाल्याचा जन्मदाखला, बँकेचा तपशील वगैरे पुरावे सादर करावे लागतात. हे खाते ‘एनपीएस’ पोर्टलवर उघडता येऊ शकते.

ते मूल ६० वर्षांचे होईपर्यंत यात जमलेली रक्कम ‘लॉक’ असते. ती काढता येणार नाही. ते मूल ६० वर्षांचे झाल्यावर जमलेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम काढून घेऊ शकेल व उरलेली ४० टक्के रक्कम ‘अ‍ॅन्यूटी’त जाईल. म्हणजे या रकमेवर दरमहा पेन्शन मिळणार. लहान मूल वृद्ध झाल्यावर त्याची आर्थिक सोय करणारी ही योजना आहे. पालकांनी ‘एनपीएस’ वात्सल्य खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना कर सवलत मिळत नाही. या योजनेत जमा झालेल्या निधीपैकी २५ टक्के रक्कम मुदतपूर्ती पूर्वी शिक्षण, वैद्यकीय, खर्च अपंगत्व आल्यास काढला येईल. अशा प्रकारे एकूण तीन वेळा रक्कम काढता येईल. समजा, पालकांनी दहा वर्षांच्या पाल्यासाठी दरमहा दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली व १८ वर्षांनंतर अशीच गुंतवणूक त्या मुलाने/मुलीने ६० वर्षांपर्यंत चालू ठेवली, तर साधारणपणे ते मूल ६० वर्षांचे झाल्यानंतर, त्यांच्या खात्यात साधारपणे ३ कोटी, ९१ लाख रुपये जमा असतील.

लहान मुलांसाठी काही खास म्युच्युअल फंड योजना आहेत. त्यांचा ‘लॉक-इन-पिरियड’ सुमारे पाच वर्षे असतो. ‘पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड)’ हीसुद्धा एक लहान मुलांसाठी गुंतवणूक योजना आहे. यात एका आर्थिक वर्षी कमाल दीड लाख रुपये गुंतवता येतात. सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर ७.१ टक्के दराने परतावा मिळत आहे. लहान मुलाच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक समस्येचा विचार करणारी ही योजना आहे. यात जमा झालेल्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतविली जाऊ शकते.

लहान मुलांसाठी ‘म्युच्युअल फंड’ योजनेत गुंतवूणक केल्यास ही गुंतवूणक त्यांना उच्च शिक्षणासाठी उपयोगी पडू शकते व परतावाही चांगला मिळतो. ‘वात्सल्य’तील गुंतवणूक ही वृद्धापकाळासाठी आहे. वात्सल्य खाते शपिी.पीवश्र.लेा या साईटवर जाऊन उघडता येते. ‘एनपीएस’ ‘वात्सल्य’ खात्यात वर्षाला किमान एक हजार रुपये गुंंतवावे लागतात, तर कमाल मर्यादा नाही. ‘पीपीएफ’मध्ये किमान रुपये ५०० व कमाल दीड लाख रुपये. ‘म्युच्युअल फंड’मध्ये किमान, कमाल असे काहीही नाही. ‘एनपीएस वात्सल्य’ खाते पोर्टलवर उघडावे लागते. ‘पीपीएफ’ खाते बँकेत किंवा पोस्टात उघडावे लागते. ‘म्युच्युअल फंड’ खाते वितरकामार्फत उघडावे लागते. ‘वात्सल्य’ मुदतपूर्ती ६०व्या वर्षी, ‘पीपीएफ’ १५ वर्षांनंतर, म्युच्युअल फंड कधीही. ‘वात्सल्य’ची ६० टक्के रक्कम करमुक्त, ‘पीपीएफ’ सर्व रक्कम करमुक्त, म्युच्युअल फंड १२.५ टक्के कॅपिटल गेन टॅक्स एक वर्षानंतर भरावा लागतो.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121