पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वृक्षलागवड, जैवविविधता संवर्धन, सौरऊर्जा, जलसंधारण प्रकल्प अशा माध्यमातून सर्वस्वी ‘जीवनदायिनी’ ठरलेल्या डॉ. विनिता आपटे यांच्याविषयी...
पुण्यातच जन्म, बालपण आणि शिक्षण घेतलेल्या डॉ. विनिता आपटे यांची वाटचाल अचंबित व्हावं, अशीच. शिक्षणानंतर विनिता यांनी एका नामांकित बँकेत नोकरी सुरु केली. पण, नोकरी करतानाच पर्यावरणाचा होणारा र्हास पाहून त्या व्यथित झाल्या. मग ही परिस्थिती बदलण्यासाठी जिद्द आणि उद्दिष्ट मनाशी बाळगून पर्यावरण संरक्षणाच्या ध्यासातून त्यांनी स्वतःला या कार्यात अक्षरशः झोकून दिले. त्यासाठी नोकरीवरही पाणी सोडले. पॅरिसमधील कार्य सोडून आपल्याच मायदेशी या कार्यासाठी वाहून घेण्याची त्यांची मनीषा मातृभूमीवरील प्रेम प्रदर्शित करते. पण, विनिता यांना केवळ झाडे लावून थांबायचे नाही, तर पुढील पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या देशात त्यांना जंगले जगवायची आहेत. अशी ही मोठी स्वप्ने बघणारी महिला सर्वार्थाने जीवनदायिनीच म्हणावी लागेल.
वृक्षारोपण, शिक्षण, सक्षमीकरण आणि नवकल्पना यांसारख्या उपक्रमांद्वारे डॉ. आपटे आजच्या पर्यावरणीय आव्हानांना संबोधित करीत आहेत आणि शाश्वत भविष्याचा पायाही रचत आहेत. २०२४ मध्ये प्रभावशाली महिलांच्या श्रेणीत झळकलेल्या डॉ. आपटे यांनी असंख्य लोकांना आपल्या वसुंधरेसाठी कृती करण्यास प्रेरित केले आहे. त्यांच्या कार्याने हे दाखवून दिले आहे की, पृथ्वी हे आपल्या विशाल ब्रह्मांडातील एकमेव घर आहे आणि त्याच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे.
यासाठी त्या ‘तेर पॉलिसी सेंटर’ (टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च अॅण्ड रिहॅबिलिटेशन फॉर द एन्व्हायर्नमेंट) ही संस्था पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी स्थापन केली. या कार्यात सहकार्य करणार्या चमूचा त्या आवर्जून उल्लेख करतात. या सहकार्याशिवाय हे एवढे मोठे कार्य यशस्वी करता येत नाही, हे मान्यच करावे लागेल, असे त्या नमूद करतात. २००९ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन आणि पुनर्वसनाचा उपयोग करून शाश्वत भविष्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे. डॉ. आपटे यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या बँकिंग कारकिर्दीतून बाहेर पडून २००८ मध्ये ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम’साठी पॅरिसला प्रयाण केले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
आज त्यांचे उपक्रम महत्त्वपूर्ण पर्यावरणीय विषयांवर परिणामकारक ठरले आहेत, ज्यात हवामानबदल, ओझोन थर संरक्षण, विषारी रसायनांबद्दल जागरूकता आणि जैवविविधता संवर्धन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ’तेर’च्या नेतृत्वाखाली त्यांनी विविध अग्रगण्य प्रकल्प हाती घेतले आहेत. विशेषतः वृक्षारोपण उपक्रमांतर्गत त्यांनी भारतभरात पाच लाखांहून अधिक स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली, ज्यातील जवळपास चार लाख झाडे यशस्वीपणे वाढली आहेत. आणखी एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील रायगडपासून केरळ आणि आंध्र किनारपट्टीपर्यंतचे मँग्रोव्ह पुनर्वसन. म्हणजे खारफुटीच्या जंगलांचे संवर्धन! हे केवळ कार्बन शोषणातच साहाय्य करीत नाहीत, तर जैवविविधता वाढविण्यात आणि स्थानिक परिसंस्थांचे सक्षमीकरण करण्यास देखील मदत करतात.
महाराष्ट्रात डोलवी, काराव, कोथले, कोडीत, मावडी, जांभळी कर्नाटकमध्ये गुंडेलपेट, छपोली, आसाममध्ये दिपू, आंध्र प्रदेशमध्ये घटाई, गुजरातमध्ये सानंद, याशिवाय लखनौ, पंतनगर, जामनगर याठिकाणी नागरी वने निर्माण करण्यात आली आहेत.
हे काम करताना निश्चितच मोठी आव्हाने आहेत. महिलांना रोजगार मिळवून देण्याचे समाधान असले, तरी आजदेखील राज्यातील ग्रामीण भागात पुरुष अतिशय निष्क्रीय आणि मद्याच्या आहारी गेल्याची शोकांतिका धक्कादायक असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. आजकाल वाढत जाणार्या प्रदुषणावर मात करण्यासाठी मोठ्या झाडांशिवाय पर्याय नाही, असे त्या आवर्जून सांगतात. लागवड केलेली ९७ टक्के झाडे त्यांनी जगविली आहेत. जंगलनिर्मिती करणे आवश्यक असल्याचा डॉ. विनिता यांचा आग्रह आहे. आपले हे संवर्धन कार्य जुई, वाशी, पुलिकत-चेन्नई येथे सुरू आहे. या कार्यक्रमांमधून अनेक महिलांना रोजगार, शेतकर्यांना उत्पन्न त्यांनी मिळवून दिले आहे. सागरी जैवविविधता संवर्धनासाठी मुळात समुद्राचा सामान्यांना परिचय व्हावा म्हणून संस्थेतर्फे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते. त्यात तज्ज्ञांशी चर्चा आणि मार्गदर्शनाचाही समावेश आहे. यामध्ये आजपर्यंत जवळपास ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
प्रत्यक्ष उपक्रमांबरोबर, शिक्षण आणि जागरूकता ‘तेर’च्या रणनीतीचा एक प्रमुख भाग आहे. डॉ. आपटे यांनी राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन पर्यावरणीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्याकामीही पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेमुळे २.३ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले आहे, पर्यावरणीय मुद्द्यांविषयी जागरूकतेची पिढी तयार करत आहे. ’तेर ऑलिम्पियाड’मध्ये १२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि ‘डॉ. अब्दुल कलाम फेलोशिप’ने गेल्या पाच वर्षांत सहा हजारांहून अधिक अर्ज प्राप्त केले आहेत, ज्यामध्ये जवळपास ५० अर्जदारांना फेलोशिप मिळाली आहे.
’तेर’चे प्रयत्न केवळ पर्यावरणीय नाही, तर सामाजिक गरजांकडेही ते लक्ष देतात. त्यांनी अल्पसंख्याक भागात सौर दिव्यांचे वाटप केले आहे आणि जलसंधारण प्रणालीही विकसित केली आहे, ज्यामुळे दोन हजार कुटुंबांचे जीवन सकारात्मकपणे बदलले आहे. या उपक्रमांनी सामाजिक उन्नतीला पर्यावरणीय शाश्वततेसोबत एकत्रित करून तेर’चा सर्वसमावेशक दृष्टिकोन पुढे आणला आहे. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौरऊर्जेसाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे सांगताना आम्हीदेखील सौरऊर्जा प्रकल्पांबाबत सक्रिय असल्याचे त्या आवर्जून अधोरेखित करतात.
डॉ. आपटे यांच्या नेतृत्वाखाली ‘तेर’ने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत, ज्यात ’डखअच उडठ पुरस्कार २०१९’ आणि ’महिला उत्कृष्टता पुरस्कार, २०२०’ यांचा समावेश आहे. ‘तेर’च्या पॉलिसी शाखेने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आययुसीएन’ आणि ‘युएनएफसीसी’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२२ मध्ये झी टीव्हीच्या ‘उंच माझा झोका’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
‘तेर पॉलिसी सेंटर’ ही संस्था जंगल वाढविणे, विहिरींचे पुनरुज्जीवन करणे, पर्यावरण शिक्षण व पर्यावरण जागृतीसाठी प्रयत्नशील असणारी संस्था आहे. संस्थेने आजपर्यंत पुण्यासह महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आसाम, भुवनेश्वर, गोवा, राजस्थान अशा विविध राज्यांत सहा लाखांपेक्षा जास्त वृक्ष लावून त्यांची जोपासना केली आहे. संस्थेच्या सर्वच उपक्रमांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. कॉर्पोरेट कंपन्या मदत करतात. त्यामुळे कामाचा उत्साह वाढतो, असे डॉ. विनिता आपटे यांनी सांगितले.
‘तेर पॉलिसी सेंटर’ ही संस्था जंगलनिर्मितीसाठी विशेष प्रयत्नशील आहे. आजवर संस्थेच्या माध्यमातून लाखो वृक्षांची लागवड करुन त्यांनी ची जगवलीदेखील आहेत. दरवर्षी या संख्येत वाढ होते. त्यामुळे जितके स्पर्धक सहभागी होतात, त्या संख्येइतकी आणखी झाडे त्या हंगामात लावून जगवली जातात, हे या ‘एनव्हायरोथॉन’चे वैशिष्ट्य आहे. डॉ. विनीता यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.
अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२२०९१५३७)