मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात दुर्मीळ ब्लॅक पॅंथर म्हणजेच काळा बिबट्याचे दर्शन झाले आहे (black panther in devgad). तालुक्यातील मुणगे गावात स्थानिकांना या बिबट्याचे दर्शन घडले (black panther in devgad). यापूर्वी देखील देवगड तालुक्यातील किनारी भागात काळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. (black panther in devgad)
मुणगे गावातील कारिवणेवाडीतील निषाद परुळेकर हे मंगळवार दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या काजूबागेकडे जात होते. त्यावेळी बागेबाहेरुन जाणाऱ्या रस्त्यावर काळा बिबट्या बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच आपल्या मोबाईलमध्ये या बिबट्याचे छायाचित्र टिपले. हा काळा बिबट्या निमवयस्क होता. यापूर्वी देखील मुणगे गावात ब्लॅक पॅंथरचे दर्शन घडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधील जंगलांमध्ये काळ्या बिबट्याचा अधिवास आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये कोकणातील किनारपट्टी भागातही काळे बिबटे दिसण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
ब्लॅक पॅंथर हा बिबट्या असून शरीराचे रंग ठरवणारे 'मेलानीन' रंगद्रव्य वाढल्यामुळे बिबट्याच्या शरीरावरील काळे ठिपके (राॅझेट पॅटर्न) पूर्णतः शरीरभर काळे किंवा अधिक काळे होतात. उलटपक्षी 'मेलानीन' कमी झाल्यामुळे 'ल्युकिझम' (Leucism) म्हणजेच पांढरा बिबट्या ही दिसू शकतो. जरी काळा रंग जास्त प्रमाणात असला तरी ठिपके बऱ्याच वेळेला दिसतात. ही एक अनुवांशिक अवस्था आहे. हा कोणत्याही प्रकारचा रोग नाही. 'ब्लॅक पँथर' या नावाचा विचार केला तर ती एक संयुक्तिक संकल्पना म्हणता येईल. यात भारत आणि आफ्रिकेत मिळणारा काळा बिबट्या, साऊथ अमेरिकेतले काळे जग्वार यांचा समावेश होतो. यांचे लॅटिन भाषेतील कुळ 'पॅंथेरा' असल्यामुळे ही व्याख्या रूढ झाली असावी. मात्र, प्रत्यक्षात ही वेगळी प्रजाती नसून काळया रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जग्वार हाच 'ब्लॅक पँथर' नावाने ओळखला जातो. भारतात फक्त बिबट्याच आढळत असल्याने आपल्याकडचा काळया रंगाचा बिबट्या म्हणजेच 'ब्लॅक पँथर' होय.
यापूर्वीच्या घटना
- कुडाळ तालुक्यातील गोवेरी गावामधील पाण्याच्या टाकीत ब्लॅक पॅंथरचे पिल्लू पडल्याचे निदर्शनास आले होते. वन विभागाने या पिल्लाची त्याच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणली होती.
- आंबोलीमध्ये रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक सहलीदरम्यान काळ्या बिबट्याचे दर्शन घडले होते.
- दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे गावात आणि वाईल्डवन फिल्ड स्टेशनच्या आवारात काळा बिबट्या दिसला होता.