मुंबई : बॉलीवूड अभिनेता ‘सैफ अली खान’ यांच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी १६ जानेवारी २०२५ रोजी पहाटे २:३० वाजता अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. त्या वेळी घरातील इतर सदस्य झोपेत होते. हल्लेखोराने सैफ यांच्यावर सहा वेळा चाकूने वार केले, ज्यात दोन जखमा गंभीर आहेत आणि एक जखम त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ आहे.
सैफ यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे न्यूरोसर्जन ‘नितीन डांगे’ आणि कॉस्मेटिक सर्जन ‘लीना जैन’ यांच्या नेतृत्वाखाली त्यांची शस्त्रक्रिया सुरू आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने घरात प्रवेश करून सैफ यांच्या नोकराशी वाद घातला. सैफ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. सध्या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या अनेक टीम कार्यरत आहेत. सैफ यांच्या पत्नी करीना कपूर खान यांनी माध्यमे आणि चाहत्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "सैफ यांच्या हाताला जखम झाली आहे, ज्यासाठी त्यांची रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. बाकी कुटुंब सुरक्षित आहे. आम्ही माध्यमे आणि चाहत्यांना विनंती करतो की, कृपया संयम राखा आणि कोणत्याही तर्कवितर्कांना थारा देऊ नका. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आपणा सर्वांच्या काळजीसाठी धन्यवाद."सैफ अली खान यांच्या प्रकृतीसाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे, आणि त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.