
अहमदाबाद, दि.१६ : प्रतिनिधी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील NH-४८ वर २१० मीटर लांबीचा चौथा पूल बांधण्यात आला आहे. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियादजवळील दाभान गावात राष्ट्रीय महामार्ग-४८ (दिल्ली-चेन्नई) ओलांडण्यासाठी डिझाइन केलेला २१० मीटर लांबीचा PSC (प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट) पूल दि.९ जानेवारी २०२५रोजी पूर्ण झाला.
या पुलामध्ये ब्रिजमध्ये ४० मी + ६५ मी + ६५मी + ४० मी कॉन्फिगरेशनच्या चार स्पॅनसह ७२ प्रीकास्ट विभागांचा समावेश आहे आणि तो बॅलेंस्ड कॅन्टीलिव्हर पद्धती वापरून बांधला गेला आहे, जो मोठ्या स्पॅनसाठी योग्य आहे. हा पूल आनंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम नोव्हेंबर २०२१मध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून या प्रकल्पावर सातत्याने काम सुरू आहे. या मार्गावरील पहिला ५० किमीचा भाग - बिलीमोरा ते सुरत - ऑगस्ट २०२६पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यादरम्यान सुरत आणि बिलीमोरा बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान नवसारी जिल्ह्यात NH-48 ओलांडणारे दोन पूल आधीच पूर्ण झाले आहेत. या पुलांची लांबी अनुक्रमे २६० मीटर आणि २१० मीटर आहे.
प्रकल्प स्थिती
- २५३ कि.मी. वायडक्ट, २९०कि.मी. गर्डर कास्टिंग आणि ३५८ कि.मी. पिअरचे काम पूर्ण
- १३ नद्यांवर पूल आणि पाच स्टील पूल पूर्ण
- अंदाजे ११२ कि.मी. लांबीवर ध्वनी अडथळे
- गुजरातमध्ये अनेक ठिकाणी ट्रॅक बांधणी सुरु
महाराष्ट्र राज्यात बोगद्यांची कामे
- बीकेसी- ठाणे दरम्यान २१ कि.मी. बोगद्याचे काम सुरू
- महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एनएटीबीएमच्या माध्यमातून सात डोंगरी बोगदे बांधले जात आहेत. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात एक डोंगरी बोगदा पूर्ण झाला आहे.