माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर विदेशात ‘न्यू ईयर’ साजरे करण्यासाठी रवाना झालेले राहुल गांधी नुकतेच मायदेशी परतले. मग कुणी तरी त्यांना दिल्लीची निवडणूक तोंडावर आहे, आपण जागे व्हायला पाहिजे बरे, असे हलवलेले दिसते. विदेश दौर्याचा सगळा शीण अद्याप गेलेला नसतानाही, मग रडतखडत राहुल गांधींनी राजकीय तोफ डागायला घेतली. निवडणुका दिल्ली विधानसभेच्या म्हटल्यावर, सत्ताधार्यांवर तुटून पडण्याचा चंगच त्यांनी बांधला. मग काय, एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी राहुल गांधी चक्क मोदी आणि केजरीवाल यांची तुलनाच करुन मोकळे झाले. ‘ज्याप्रमाणे मोदी अदानी प्रकरणावर तोंडातून अवाक्षरही काढत नाही, त्याप्रमाणे केजरीवालही अदानी प्रकरणावर मौन बाळगून आहेत. दोघांनाही (केजरीवाल आणि मोदी) दिल्लीच्या जनतेची काळजी नसून, दिल्लीकरांच्या समस्येबद्दल दोघेही उदासीन आहेत,’ असा एकूणच राहुल गांधींच्या टीकेचा सूर.
पण, नेहमीप्रमाणे राहुल गांधी यांची ही टीकाही त्यांच्या घोर अज्ञानाचे प्रकटीकरण करणारीच ठरली. कारण, अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी अदानी यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. “अदानींना दिल्लीतील ऊर्जा कंपनीचे कंत्राट न दिल्यामुळे मला तुरुंगात डामण्यात आले,” असा अजब दावा केजरीवालांनी केला होता. तसेच “अदानी हा फक्त चेहरा आहे, अदानींचा सगळा पैसा मोदींचाच आहे,” असे तथ्यहीन विधानही केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत केले होते. त्यामुळे राहुल गांधींप्रमाणे केजरीवालांनाही ‘अदानीं’च्या नावाने पोटशूळ उठतो, हे सर्वविदित. पण, तरीही आपल्या अजेंड्यावरील मुद्द्यांभोवतीच राजकारणाने पिंगा घालावा, अशी मनीषा बाळगणार्या राहुल गांधींनी विनाकारण अदानींच्या मुद्द्याला छेडले. एवढेच नाही तर दिल्लीच्या प्रश्नांपेक्षाही जातीय जनगणना, उपेक्षित-वंचितांचे भले यांसारख्या जुन्या मुद्द्यांवरच राहुल यांचा भर दिसला. त्यामुळे दिल्लीकरांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, प्रदूषणाचे संकट वगैरे कळीचे मुद्दे सोडून राहुल गांधी त्याच त्याच मैदानावर बॅटिंग करण्यातच धन्यता मानताना दिसतात. असो. अरविंद केजरीवालही हे आता मुरब्बी राजकारणी. त्यांनी “राहुलजींची लढाई काँग्रेस वाचवण्याची आहे आणि माझी लढाई देश वाचण्यासाठी” अशी फिल्मी डायलॉगबाजी करत अज्ञानात सुख मानणार्या राहुल गांधींना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
मंगल देशा, पवित्र देशा...
आपल्या महाराष्ट्राला निसर्गाचे वरदान लाभलेले. हिरवेगार गर्द जंगल, सह्याद्रीच्या रम्य डोंगररांगा, निळाशार पहुडलेला समुद्र, गोदावरी-कृष्णासारख्या महानद्या, शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा, अष्टविनायकांचा आशीर्वाद आणि साडेतीन शक्तिपीठांची आध्यात्मिक अनुभती. त्यामुळे पर्यटनासाठी सर्वांगीण अनुकूल परिस्थिती महाराष्ट्रात फार पूर्वीपासूनच. पण, दुर्देवाने या पर्यटनाच्या संधीचे सोने करण्यात आपण कमी पडलो. नाही म्हणायला, महाबळेश्वर, इगतपुरी, मालवण आणि अशी काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी पर्यटनस्थळे राज्यात विकसित झालीही. त्यामुळे हजारोंना व्यवसाय-रोजगाराच्या संधीही मिळाल्या. पण, अजूनही महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर बरीचशी स्थळे विकसित झाल्यास, राज्याच्या अर्थव्यवस्थेला सर्वांगीण चालना मिळू शकते, हे निश्चित.
नुकत्याच झालेल्या पर्यटन विभागाच्या बैठकीत यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्री आणि अधिकार्यांना तसे निर्देशही दिले. तसेच, काही फिरते तंबू शहर, विटेंज कार संग्राहलये, थीम पार्क, मत्स्यालये वगैरेंचीही घोषणा करण्यात आली. हे प्रकल्प आगामी काळात आकारास आल्यास, निश्चितच मोठ्या संख्येने स्थानिकांच्या हातांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील पर्यटकांची पावलेही प्रथम राज्यांतर्गत पर्यटनस्थळांकडे वळतील. यासाठी संबंधित पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी सर्व पायाभूत सोयीसुविधांचा बारकाईने विचार करावा लागेल. यामध्ये पर्यटकांच्या राहण्याची चांगली सोय, रेस्टॉरेन्ट्स, मनोरंजनस्थळे यांना प्राधान्य द्यावे लागेल. तसेच, पर्यटनस्थळांचा विकास करताना कनेक्टिव्हिटी आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेलाही केंद्रस्थानी ठेवणे क्रमप्राप्त. कारण, चारचाकींचे मालक नसलेले आणि गाड्या भाड्यावर घेऊनही पर्यटनाला बाहेर न पडणार्या वर्गाचाही विचार करावा लागेल. त्यामुळे कुठल्याही पर्यटनस्थळाचा, तेथील सोयीसुविधांचा विचार हा सर्वांसाठी परवडणार्या दृष्टिकोनातूनच करणे हे क्रमप्राप्त ठरेल. तसेच, फडणवीसांनी यावेळी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस तैनात करणार असल्याची केलेली घोषणाही महत्त्वाची. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र पर्यटनदृष्ट्या राज्यांतर्गत तसेच देशविदेशातील पर्यटकांनाही अधिक मोठ्या संख्येने आकर्षित करेल, यात शंका नाही.