हत्येच्या दिवशी कराड, घुले आणि चाटे यांच्यात १० मिनिटे संभाषण
15-Jan-2025
Total Views | 56
बीड : मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा घेतल्यानंतर बुधवार, १५ जानेवारी रोजी त्याला बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. मकोकाच्या विशेष न्यायालयात इन कॅमेऱा ही सुनावणी पार पडली. यावेळी केवळ न्यायाधीश, तपास अधिकारी, आरोपी, आरोपीचे वकील आणि सरकारी वकील उपस्थित होते. दरम्यान, एसआयटी अधिकारी, सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी दुपारी ३ वाजून २० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात १० मिनिटे फोनवर संभाषण झाले. देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांमधील संभाषणाची वेळ मिळतीजुळती असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. यासोबतच वाल्मिक कराडवर आधी दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांची यादीसुद्धा कोर्टात सादर करण्यात आली.
वाल्मिक कराडच्या पोलिस कोठडीसाठी एसआयटीने न्यायालयासमोर ९ महत्वपूर्ण बाबी मांडल्या. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून त्याला लपवण्यासाठी इतर आरोपींनी मदत केली का? घुले आणि चाटेसुद्धा अनेक दिवस फरार असताना त्यांना कोणी मदत केली? तीन आरोपींमध्ये १० मिनिटे नेमके काय संभाषण झाले हे तपासायचे आहे, असा युक्तीवाद एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी केला. तसेच यावेळी वाल्मिक कराडच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दरम्यान, न्यायालयाने कराडला ७ दिवसांची कोठडी सुनावली असून २२ जानेवारीपर्यंत तो पोलिस कोठडीत असले.
दुसरीकडे, कोणत्याही आरोपीने या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे नाव घेतलेले नाही. तसेच या गुन्ह्यात वाल्मिक कराडच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा दिसत नाही. त्यामुळे वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर फक्त फोन कॉलवर वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आले का? असा सवाल कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना केला.