मुंबई, दि.१५ : प्रतिनिधी मुंबई मधील गेटवे ऑफ इंडियाला लागून रेडिओ क्लब नजीक प्रवासी वाहतूक जेट्टी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या कामासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली व मस्त्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत विधान भवनात मंगळवार दि. १४ आढावा बैठक पार पडली. यावेळी या प्रकल्पाला स्थानिक रहिवाश्यांचा विरोध असल्याने हा प्रकल्प प्रिन्सेस डॉक या पर्यायावर देखील चर्चा करण्यात आली. मात्र, स्थानिकांना विश्वासात घेत प्रकल्पाची माहिती देत प्रकल्प समजावून सांगण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी मेरीटाईम बोर्डाला दिले आहेत. तसेच, याभागात ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी करून घेण्यासंदर्भात सूचनाही दिल्या आहेत.
या बैठकीच्या सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले तसेच प्रकल्पासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. मात्र हा प्रक्ल्प पूर्ण झाल्यावर रेडिओ क्लब येथे ट्रॅफिकची समस्या उद्भवेल असा स्थानिकांचा अंदाज आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याचे निदर्शनात आणून दिले. यावेळी रेडिओ क्लब जेट्टीला प्रिन्सेस डॉक म्हणजेच भाऊचा धक्का हा पर्याय सुचविण्यात आला. मात्र भाऊच्या धक्क्यावर मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. त्या ठिकाणी नेहमी मासेमारी बोटी थांबलेल्या असतात. तसेच प्रिन्सेस डॉक येथून मुंबई ते मांडवा ही रो रो फेरी सेवा चालू आहे. ही फेरी बोट मोठी असल्यामुळे त्या बोटीसाठी लागणारी टर्निंग रेडियस जास्त आहे आणि त्या ठिकाणी तेवढीच जागा उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणाहून ज्यादा प्रवासी बोट चालवणे शक्य नाही. ही बंदर मुंबई बंदर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत आहे. याठिकाणी रस्तेमार्गेही खूप कमी कनेक्टिव्हिटी आहे. अपुऱ्या बससेवेमुळे प्रवाशांना ये जा करायला नाहक त्रास होऊ शकतो, अशी माहिती मेरीटाईम बोर्डाने सादर केली.
या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा होऊन आढावा घेतल्यावर मंत्री नितेश राणे यांनी, रेडिओ क्लब येथील स्थानिकांना प्रकल्प समजावून सांगत विश्वासात घ्यावे. स्थानिकांच्या मागणीनुसार, याभागात ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी करावा तसेच बीएमसी सोबत या ठिकाणच्या वाहतूक वळविण्याबाबत चर्चा करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी अधिकार्यांना दिले. यावेळी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता आर. एम. गोसावी, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बधिये, अधिक्षक अभियंता श्रीकांत बांगर, कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे उपस्थित होते.
दरवर्षी लाखो पर्यटकांची गेट वे ऑफ इंडियाला भेट
दरम्यान, मुंबई मधील गेटवे ऑफ इंडिया हे महत्वाचे पर्यटनस्थळ असून याभागातून दरवर्षी सुमारे ३० ते ३५ लक्ष इतकी प्रवासी आणि पर्यटन वाहतुक होते. गेटवे येथील अस्तित्वातील जेट्टी सुविधा प्रवाशांकरिता अपुरी पडत असून काही वेळेस प्रवाशांना विशेषतः वृध्द व्यक्ती, स्त्रिया आणि लहान मुले यांना खूप अडचणी निर्माण होतात, प्रवाशांच्या सोयीकरीता गेटवे ऑफ इंडिया येथे जेट्टी बांधणे व त्यालगत सुविधा निर्माण करणे प्रस्तावित होते. परंतु त्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने नौसेनेने आक्षेप घेऊन प्रस्तावित जेट्टी रेडिओ क्लब नजीक बांधण्यात यावी, अशा सूचना नौदलाने केल्या. तसेच,मेरिटाईम बोर्डाने या प्रकल्पांसाठी आवश्यक सर्व परवानग्या घेतली आहेत. मात्र, हेरिटेज विभागाची परवानगी अद्याप बाकी असून आवश्यकता पडल्यास ती पण घेतली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत सादर केली.