आयुर्वेदात सांगितलेल्या वात, पित्त, कफ त्रिदोषांविषयी आपल्याला बरेचदा ऐकून, वाचून प्राथमिक माहिती असते. कारण, हे तीन घटक मानवी शरीरातील सर्व क्रियांसाठी कारणीभूत असतात. तेव्हा या तिन्ही दोषांचा कमीअधिकपणा शरीरात शोधणे म्हणजे थोडक्यात ‘प्रकृति परीक्षण’ होय. प्रकृति परीक्षण हे फक्त रुग्णाचेच नाही, तर स्वस्थ व्यक्तीचेही केले जाते. प्रत्येक व्यक्तीचे प्रकृति परीक्षण करून त्या व्यक्तीला कोणता आहार हितकारक आहे व कोणता नाही, हा सल्ला देण्यात येतो. ऋतुनुसार व प्रकृतिचा विचार करून वैद्य स्वस्थ व्यक्तीला व रुग्णाला आहार-विहाराचा सल्ला देतात. रुग्णाला होणारे व्याधि व त्याची चिकित्सा करण्यासंबंधी दिशादर्शक म्हणूनही प्रकृति परीक्षणाचा फायदा होतो.
आरोग्य म्हणजे काय?
सम दोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः।
प्रसन्नात्मेंद्रियमनाः स्वस्थइत्यभिधीयते॥
(सुश्रुत सूत्र १५/४८)
संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समतोल म्हणजे आरोग्य. केवळ रोग नसणे म्हणजे आरोग्य नव्हे. या ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या आरोग्याच्या व्याख्येप्रमाणेच किंबहुना अधिक समावेशक अशी आयुर्वेदातील स्वास्थ्याची व्याख्या आहे.
आयुर्वेदाचा मूळ उद्देशच स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे हा आहे. स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वतःची प्रकृति माहीत असणे आवश्यक आहे. प्रकृतिनुसार योग्य आहार-विहार पाळल्याने, प्रकृतीनुसार दिनचर्या, ऋतुचर्या पालन केल्याने, प्रकृतिनुसार व्यायाम केल्याने प्रत्येकजण निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगू शकतो.
तर ही प्रकृति म्हणजे काय, तसेच प्रकृति परीक्षण म्हणजे काय, त्या परीक्षणाचा उपयोग काय, हे समजण्यासाठी आपण आयुर्वेदातील ‘प्रकृति’ संकल्पनेविषयी थोडी माहिती करून घेऊया.
वात, पित्त, कफ यांना आयुर्वेदामध्ये त्रिदोष म्हटले आहे. हे तीन घटक मानवी शरीरातील सर्व क्रियांना कारणीभूत असतात. गर्भनिर्मितीपासूनच हे तीन घटक (वात, पित्त व कफ) शरीरात विशिष्ट प्रमाणात उपस्थित असतात. त्यांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे प्रत्येक शरीरात आपल्याला विविधता (शारीरिक व मानसिक) दिसते. हा दोषांचा कमीअधिकपणा शरीरात शोधणे म्हणजे ‘प्रकृति परीक्षण’ होय.
म्हणजे मनुष्याचा शरीर-मानस स्वभाव म्हणजे प्रकृति होय. ही प्रकृति जन्मापासून मृत्यूपर्यंत तशीच राहते. ती अपरिवर्तनीय असते. व्यवहारामध्ये आपण म्हणतो की, व्यक्ती तितक्या प्रकृति. म्हणजे प्रत्येकाची प्रकृति, त्याचा स्वभाव (शारीर व मानस) दर्शविते. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी शरीर वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये व त्याच्या शरीरात घडणार्या क्रियांसाठी कारणीभूत व आधारभूत हे शरीरातील घटक (वात, पित्त व कफ) असतात.
या शरीर घटकांपैकी (दोष-वात, पित्त व कफ) एकेकाच्या प्रबलतेमुळे तयार होणारे प्रकृतिचे प्रकार म्हणजे-वातप्रकृति, पित्तप्रकृति व कफप्रकृति होय. यांना एक ‘दोषज प्रकृति’ म्हणतात. तसेच, या त्रिदोषांपैकी कोणत्याही दोन दोषांचे प्राबल्य शरीरात असणे म्हणजे द्वंद्वज प्रकृति. जसे, वातपित्तज प्रकृति, पित्तकफज प्रकृति व वातकफज प्रकृति होय. तसेच, तिन्ही दोषांच्या साम्यावस्थेमुळे निर्माण होणारी प्रकृति म्हणते ‘समदोषज प्रकृति’ होय.
रुग्णाची चिकित्सा करताना किंवा स्वास्थ्य सल्ला देत असताना आयुर्वेदीय प्रकृति परीक्षण उपयोगी पडते. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणार्या विशिष्ट शरीर-मानस लक्षणांवरून वैद्य रुग्णाची प्रकृति ओळखतात. रुग्ण परीक्षण करत असताना ज्या दहा आयुर्वेदीय तपासण्या सांगितल्या आहेत, त्यामध्ये प्रकृति परीक्षण हे प्रथम क्रमांकावर आहे.
प्रकृति परीक्षण हे फक्त रुग्णाचेच नाही, तर स्वस्थ व्यक्तीचेही केले जाते. प्रत्येक व्यक्तीचे प्रकृति परीक्षण करून त्या व्यक्तीला कोणता आहार हितकारक आहे व कोणता नाही, हा सल्ला देण्यात येतो. व्यक्तीच्या बलाची माहितीदेखील प्रकृतीनुसार मिळते. त्यामुळे व्यक्तिसापेक्ष व्यायाम सल्ला देणे शक्य होते. ऋतुनुसार व प्रकृतिचा विचार करून वैद्य स्वस्थ व्यक्तीला व रुग्णाला आहार-विहाराचा सल्ला देतात. रुग्णाला होणारे व्याधि व त्याची चिकित्सा करण्यासंबंधी दिशादर्शक म्हणूनही प्रकृति परीक्षणाचा फायदा होतो.
उदयोन्मुख संशोधनाने प्रकृती आणि अनुवंशिक चिन्हक (जेनेटिक मार्कर्स) यांच्यातील परस्परसंबंध प्रस्थापित होत आहेत. आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरही आयुर्वेदिक सिद्धान्तांची उपयोगिता सिद्ध होत आहे. काही प्रकृति प्रकार आणि अनुवंशिक भिन्नता यांच्यातील संबंध संशोधनाने स्थापित होत आहेत.
कफ प्रकृति व्यक्तींमध्ये मधुमेह किंवा लठ्ठपणाकडे अनुवंशिक प्रवृत्ती असू शकते. पित्त प्रकृति व्यक्तींना उष्णतेचे विकार, अतिस्वेदसंबंधी विकार, त्वचाविकार होण्याची शक्यता असते, तर वात प्रकृती व्यक्तीं न्यूरोलॉजिकल किंवा डिजनरेटिव्ह विकारांना अधिक प्रवण असू शकतात.
प्रकृती आणि जीनोमिक्स दोन्ही आरोग्य परिणामांमध्ये पर्यावरण आणि जीवनशैलीच्या भूमिकेवर भर देतात. ‘एपिजेनेटिक्स’ हे आरोग्यावर परिणाम करणारे आहार, विहार (जीवनशैली) आणि दैनंदिन दिनचर्या या आयुर्वेदिक तत्त्वांशी जुळते.
सर्वांनी स्वतःची प्रकृती आयुर्वेदिक डॉक्टर/वैद्यांकडून तपासून, जाणून घ्यावी. यासाठी सध्या देशपातळीवर ‘प्रकृति परीक्षण अभियान’ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आयुर्वेद दिवसाचे औचित्य साधून दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी देशव्यापी प्रकृति परीक्षण अभियानाचे उद्घाटन केले.
आयुष मंत्री, भारत सरकार प्रताप जाधव यांनी जाहीर केल्याप्रमाणे ‘देश का प्रकृति परीक्षण’ हे अभियान दि. 26 नोव्हेंबर २०२४ला सुरू होऊन दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे.
‘देश का प्रकृति परीक्षण’ या अभियानात सक्रिय सहभागी होऊन स्वस्थ सुदृढ समाज घडविण्यात सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे. या अभियानाची सफलता आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागावरती अवलंबून आहे.
‘देश का प्रकृति परीक्षण अभियान’ ही आरोग्य जागरूकता मोहीम आहे, ज्याचा उद्देश नागरिकांचे त्यांच्या प्रकृतिनुसार आरोग्य सुधारणे, आरोग्याबद्दल शिक्षित करणे आहे. आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांना चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक तत्त्वांचा अवलंब करण्यास मदत होईल.
सध्या या अभियानांतर्गत दहा हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक डॉक्टर सहभागी झाले आहेत. या मोहिमेची ‘गिनिज बुक’मध्ये नोंद होण्यासाठी सर्वचजण मनापासून प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे भारतातील सार्वजनिक आरोग्यावर व जागरुकतेवर याचा व्यापक प्रभाव पडेल. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपले प्रकृति परीक्षण करून घ्यावे व या अभियानाला हातभार लावावा.
‘आरोग्य भारती’तर्फे ही सार्वजनिक स्तरावर याला लोकांपर्यंत पोहोचविण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. देशातील सर्वांचे प्रकृती परीक्षण व्हावे व त्याद्वारे प्रत्येकाचे स्वास्थ्य रक्षण व्हावे, हीच भगवान धन्वंतरीचरणी पार्थना.
Link for Android app:
https://play.google.com/store/apps/details?id=com.artcode.prakrutiparikshan
‘आरोग्य भारती’ देशव्यापी संघटना आहे. सर्वांचे आरोग्य चांगले सुदृढ राहावे व शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्य टिकून राहावे, यासाठी ‘आरोग्य भारती’ प्रयत्नशील आहे. प्रकृतिनुसार योग्य तो आहार-विहार आचरणात आणून स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी ‘आरोग्य भारती’ संपूर्ण भारतातील नागरिकांना आवाहन करत आहे.
डॉ. हेमंत पराडकर (सहयोगी प्राध्यापक, कायचिकित्सा विभाग आयुर्वेद महाविद्यालय, शीव)
डॉ. विजय पटाईत (सहयोगी प्राध्यापक, क्रिया शारीर विभाग आयुर्वेद महाविद्यालय, शीव)
(आरोग्य भारती, कोकण प्रांताद्वारे प्रकाशित)