नामांकित शल्यविशारद डॉ. विलास जोग जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित!
14-Jan-2025
Total Views | 199
पुणे : कोथरुडमधील नामांकित शल्यविशारद आणि समाजसेवक डॉ. विलास जोग यांना मंगळवार, १४ जानेवारी रोजी दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्राच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. स्मिता जोग, माजी खासदार प्रदीपदादा रावत, डॉ. राजेंद्र हिरेमठ, मुरली कचरे, राजाभाऊ कदम, शिवानी सुतार आणि दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
"आपल्या कारकिर्दीत डॉ. जोग यांनी दिव्यांगांची मनोभावे सेवा केली. ३ हजारांपेक्षा जास्त पोलिओग्रस्त आणि सेरब्रल पाल्सीसारख्या दुर्धर आजारानं त्रस्त दिव्यांगांवर मोफत शस्त्रक्रिया करुन त्यांना पुन्हा गतिशील केले. तसेच अनेक नैराश्यग्रस्त रुग्णांवर वैद्यकीय उपचार करुन त्यांच्यात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण केली. अशा सेवाव्रती व्यक्तिमत्वाचा सन्मान करणे ही माझी सामाजिक जबाबदारी आहे," अशा भावना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.