ज्ञानदानासारखे पुण्य नाही असे म्हणतात. समोर येणार्या प्रत्येक अडचणींचा सामना करत विद्यादानाचे कार्य अविरत करणार्या वैभव ठाकरे यांच्याविषयी.
आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून आपल्या कमाईतील एक हिस्सा सामाजिक कार्यावर खर्च करणारे कल्याणमधील वैभव रोहिदास ठाकरे यांनी, शैक्षणिक क्षेत्रातही आपला चांगलाच ठसा उमटविला आहे. गेल्या दोन दशकात कल्याण आणि भिवंडी परिसरात ‘गुरूकुल विज्ञान क्लासेस’च्या माध्यमातून विद्यादानाचे काम वैभव करत आहेत.
वैभव यांचा जन्म आताच्या पालघर आणि पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ऐनशेत या गावी झाला. वैभव यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असला तरी त्यांचे वडील हे सरकारी नोकरीत असल्याने घरी शैक्षणिक वातावरण होते. त्याचे शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांचा विकास आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून त्यांनी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे काम हाती घेतले. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी नोकरी करण्याच्या उद्दिष्टाने कल्याण शहर गाठले. सन १९९९ मध्ये त्यांनी डोंबिवली येथे एका शैक्षणिक संस्थेमध्ये नोकरी स्वीकारली. कार्यालयीन कामकाजाचा अनुभव घेत असतानाच, त्यांनी व्यक्तिमत्त्व विकास, इंग्लिश स्पीकिंग, व्यवस्थापन कौशल्य आदीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले. या संस्थेत दोन वर्षे अनुभव घेतल्यानंतर वैभव यांनी कल्याण पश्चिम येथे ठाण्यातील एका नामवंत शैक्षणिक संस्थेची शाखा सुरू केली. सुरुवातीच्या काळात अनेक आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. त्यामुळे संस्थेच्या विस्तारातही अनेक मर्यादा आल्या. अशा परिस्थितीत बँकेचे कर्ज घेण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. आपले सर्व कौशल्य पणाला लावून, आपल्या व्यवसायाला मजबूत करण्याची पराकाष्ठा वैभव यांनी लिलया पेलली. नंतर त्यांनी व्यवसाय करत असतानाच ‘पथिक’ या संस्थेतून, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण घेतले.
दरम्यानच्या काळात, वैभव यांचा विवाह भिवंडी येथील भाग्यश्री पाटील यांच्याशी झाला. वैभव यांना दोन मुली आहेत. त्यांची थोरली मुलगी वेदिका नवी मुंबईत प्रथम वर्ष आर्किटेकचे शिक्षण घेत आहे. तर, धाकटी मुलगी हार्दिका कल्याणच्या के.सी. गांधी विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. भाग्यश्री यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत, वैभव यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मोठी साथ दिली. संस्थेचा प्रशासकीय कारभार भाग्यश्री यांनी समर्थपणे पेलला. हे करत आपल्या दोन्हीही मुलींचे संगोपन करताना, त्यांनी आईची भूमिका ही समर्थपणे पेलली.
कल्याण शहरात व्यावसायिक जम बसू लागल्यावर, आपण स्वत:ची संस्था सुरू करू शकतो असा विश्वास वैभव यांच्या मनात निर्माण झाला. त्यातूनच ‘गुरूकुल सायन्स क्लास’ या संस्थेचा उदय झाला. कल्याणमधील सुप्रसिद्ध याज्ञवलक्य वास्तूमध्ये, गुरूकुल या त्याच्या स्वत:च्या संस्थेची सुरुवात झाली. उत्तम दर्जाचे शिक्षण, नामांकित शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद या सचोटीवर, वर्षागणिक गुरूकुलचा यशाचा आलेख कायम उंचावत गेला. वैभव यांनी कल्याणमधील खडकपाडा आणि भिवंडी येथे गुरूकुलच्या शाखा सुरू करून, व्यवसायाचा विस्तार केला. वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम करायचे सूत्र जोपासून, त्यांनी आपल्या संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
आपल्या व्यवसायाची कमान सांभाळत त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून , ‘रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईड’ या संस्थेशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला. या संस्थेत भरीव योगदान दिल्यामुळे, वैभव यांच्याकडे अध्यक्ष पदाची धुरा आली. या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. वैभव यांनी ‘गुरूकुल चॅरिटेबल ट्रस्ट’ या आपल्या संस्थेमार्फत, पालघर जिल्ह्यातील वाडा आणि जव्हार तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. यात शैक्षणिक साहित्याचे वाटप, करिअर गाईडन्स शिबिरे, वैद्यकीय तपासणी शिबिरांचा समावेश होतो. तसेच, ‘रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईड’च्या माध्यमातून वाडा, मुरबाडसारख्या भागात रुग्णवाहिका दिल्या आहेत. आपल्या कामाचा विस्तार सांभाळत त्यांनी आपल्यातील विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता जागृत ठेवला. त्यांनी सहकार क्षेत्रातदेखील आपले योगदान दिले. वाडा तालुक्यातील नामवंत पतसंस्थेत, संचालक पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. वैभव यांना शिक्षणाची असलेली आवड यामुळे त्यांनी पुढे मार्केटिंगमध्ये ‘एम.बी.ए’ केले. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वैभव यांची आजही आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. सुट्टीच्या दिवशी वाडा तालुक्यातील आपल्या मूळ गावी जाऊन त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने फळबागेची शेतीदेखील केली. शेतीच्या माध्यमातूनही त्यांनी एक चांगला आर्थिक स्त्रोत निर्माण केला आहे. कल्याणसारख्या शहरी भागात व्यावसायिक जम बसवताना, आपल्या गावातील सर्व प्रकारचे सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमाचा त्यांनी समतोल राखला. वैभव यांनी घेतलेला सामाजिक कार्याचा वसा ते आजही जपत आहे. वैभव यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!