पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर

नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण, इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार

    13-Jan-2025
Total Views | 80
 
PM MODI
 
मुंबई : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी सुमारे १०.३० वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आय एन एस सुरत, आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता त्यांच्या हस्ते खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
 
आयएनएस सूरत (पी१५बी) हे क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून, जगातील सर्वात मोठ्या, सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी आहे. अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी ते सुसज्ज आहे. आयएनएस निलगिरी (पी१७ए) 'स्टेल्थ फ्रिगेट' प्रकारातील पहिले जहाज असून, भारतीय नौदलाने त्याची निर्मिती केली आहे. त्यात संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता आहे. सागरी सुरक्षा (सीकीपिंग) आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत, जे स्वदेशी फ्रिगेट्सच्या आधुनिक प्रकाराचे प्रतिबिंब दर्शवितात. आयएनएस वाघशीर (पी७५) स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी आहे. पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे ती प्रतिनिधित्व करते. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे.
 
भारताच्या सांस्कृतिक वारशाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान उद्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर, खारघर, नवी मुंबई येथील इस्कॉन प्रकल्पाचेही उद्घाटन करतील. नऊ एकरांवर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. विश्वबंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढवणे हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121